राजगुरू, सुखदेव आणि भगतसिंग...आणि त्यांची गौरवगाथा

ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध त्यांनी सशस्त्रलढा पुकारल्यामुळे तरूण वयातच इंग्रजांनी त्यांना फाशीची शिक्षा दिली.
Bhagat Singh Sukhdev and Rajguru are Gaurav Gaatha
Bhagat Singh Sukhdev and Rajguru are Gaurav Gaatha

“प्राण हे सर्वांना सारखेच प्रिय असतात. परंतु प्राणाहूनही प्रिय असते स्वधर्म आणि स्वराष्ट्राची भावना...आणि जेव्हा या भावना दडपण्याचा निर्लज्ज प्रकार राजसत्ता करते तेव्हा अंतःकरणातील प्राण हे बलीवेदीचा खेळ खेळण्यास तयार होतात.”

आज देशभक्त राजगुरू, सुखदेव आणि भगतसिंग यांचा स्मृतीदिन. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे तिघेही महान भारतीय क्रांतिकारक होते. ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध त्यांनी सशस्त्रलढा पुकारल्यामुळे तरूण वयातच इंग्रजांनी त्यांना फाशीची शिक्षा दिली.

भगतसिंग यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ रोजी पंजाबच्या ल्यालपुर जिल्ह्यातील बंगा या छोट्याश्या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव विद्यावती तर वडिलांचे नाव किशनसिंग होते. भगतसिंग यांचे वडील, किशनसिंग आणि काका, सरदार अजितसिंग हे दोघेही लोकप्रिय स्वातंत्र्य सेनानी होते.

हुतात्मा भगतसिंग यांच्यासोबत शिवराम हरी राजगुरू व सुखदेव थापर यांना देखील फाशी देण्यात आले. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू हे पुणे जिल्ह्याची खेड म्हणजेच आजचे राजगुरुनगर येथील राहणारे होते. सुखदेव थापर यांचा जन्म पंजाबमधील लुधीयांना इथला.

पंजाबात सायमन कमिशनच्या विरोधात आंदोलन करताना लाला लजपतराय ब्रिटिशांनी त्यांच्यावर लाठीमार केला. या मारहाणीमुळे काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा आणि ब्रिटिशांच्या या जुलूमशाहीचा सूड उगवण्यासाठी पंजाबमधील तरुणांनी उठाव केला.

लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग व चंद्रशेखर आजाद यांनी पोलिस अधिकारी सॉंडर्स गोळ्या मारून वध केला. या घटनेनंतर इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली. तेव्हा त्यांचा ससेमिरा चुकवण्यासाठी भगतसिंग व चंद्रशेखर आजाद दोघेही हावडा येथे गेले.

याच्या काही काळानंतर इंग्रजांना भारतीयांची शक्ती दाखवून देशवासीयांना जागृत करण्यासाठी या क्रांतिकारकांनी विधानसभेत बॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला. ठरलेल्या योजनेनुसार ते आपले सहकारी बटुकेश्वर दत्त यांच्यासोबत विधान सभेच्या सत्रात पोहोचले व त्यांनी बॉम्ब फेकला. या हल्यात कोणीही ठार होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. बॉम्ब फुटल्यानंतर त्यांनी ‘इन्कलाब झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. यानंतर त्यांनी स्वत: पोलिसांमोर हजर झाले.

या कृत्याबद्दल त्यांच्यावर खटला चालवून आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली गेली. परंतु जेव्हा इंग्रजांना कळले की भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांनीच पोलिस अधिकारी सॉंडर्स वध केला तेव्हा तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

हे तिघेही देशभक्त देशासाठी एक दिलाने लढत होते. त्यांच्या शिक्षेसाठी २४ मार्च हा दिवस ठरवण्यात आला होता. मात्र जनक्षोभ एवढा होता ब्रिटिशांनी त्यांना आदल्याच दिवशी फाशी देण्याचे ठरविले. आपल्या फाशीच्या दिवशी हे तिघे क्रांतीवीर इन्कलाब झिंदाबाद, भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा देत होते. लाहोरच्या मुख्य तुरुंगात २३ मार्च १९३१रोजी तिघांना एकत्र फाशी देण्यात आले. फाशी दिल्यानंतर तिघांनाही एकाच चितेवर अग्नी देण्यात आला. अशाप्रकारे हे तिघेजण देशभक्त अंतिम क्षणी देखील एकाच चितेवर एकरूप होत भारतमातेच्या चरणी विलीन झाले.

हुसैनीवाला, पंजाब येथे त्यांना अग्नि देण्यात आला. आज या ठिकाणी राष्ट्रीय हुतात्मा स्मारक उभारलेले आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून २३ मार्च हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.

- चंद्रकांत शहासने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com