Blog: कर्मातील कौशल्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagavad Gita self confidence growth

Blog: कर्मातील कौशल्य

श्रुती आपटे

समत्वबुद्धी साध्य झालेला मनुष्य या जगात सुकृत आणि दुष्कृत दोन्हींचाही त्याग करतो.

म्हणजे पाप-पुण्य दोन्हींपासून मुक्त असतो. म्हणून तू समत्वयोगानुसार आचरण कर हेच कर्मातील कौशल्य आहे.

बालमित्रांनो, बुद्धी हे मानवाला मिळालेलं एक वरदान आहे. बुद्धीच्या जोरावरच मानवाने आपले आयुष्य सुखावह केलेले दिसते.

ज्ञानाच्या क्षेत्रात, विज्ञानाच्या क्षेत्रात, कलेच्या क्षेत्रात अत्युच्च प्रगती बुद्धीच्या सामर्थ्यानेच झाली. आपली बुद्धी हे एक इंद्रियच आहे‌.

त्याचा उपयोग सत्कार्यासाठी, कल्याणसाठी व्हायला हवा. त्यासाठी बुद्धी सुसंस्कारित असायला हवी. चांगलं काय, वाईट काय हे कळण्याची क्षमता हवी. यासाठी कोणत्या प्रकारची बुद्धी असायला पाहिजे ते पाहूया.

बालमित्रांनो, समत्वबुद्धी किंवा निश्चयात्मिका बुद्धी म्हणजे काय ते पाहू. आपल्यामध्ये जाणून घेण्याची विचार करण्याची जी क्षमता असते, तिला बुद्धी म्हणतात. बुद्धीच्या कार्याचे तीन प्रकार आहेत- संशय, विपर्यय, निश्चय.

अंधारात पडलेली दोरी बघून ती दोरी आहे का साप असा प्रश्न पडतो, त्याला संशय असं म्हणतात. दोरीला साप समजणे हा झाला विपर्यय; आणि जवळ जाऊन प्रकाशात पाहिले असता तो साप नसून दोरीच आहेे हे समजणे म्हणजेच खरे ज्ञान होणे.

हाच बुद्धीचा निश्चय. म्हणूनच आपला संशय दूर करून विपर्ययापासून वाचून, योग्य काय अयोग्य काय ते दाखवणारी बुद्धी म्हणजेच निश्चयात्मिका बुद्धी.

अज्ञानी माणसांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात, तर ज्ञानीजनांची बुद्धी निश्चयात्मिका असते.

निश्चयात्मिका बुद्धी आपल्याला आनंदप्राप्तीचा मार्ग दाखवते. योग्य काय आणि अयोग्य काय याचा निर्णय तिच्यामुळे शक्य होतो.

व्यवहारातसुद्धा दहावी बारावीनंतर कुठली शाखा निवडावी याचे नियोजन करण्यासाठी आपल्या बुद्धीचा निश्चय व्हावा लागतो.

नाहीतर अनेकांचे सल्ले आणि खोट्या अपेक्षा यांच्या मागे लागलं, तर निर्णय चुकू शकतो आणि आयुष्यभरासाठी निराशा पदरी पडू शकते.

म्हणूनच भगवान श्रीकृष्ण म्हणतात, की बुद्धीला शरण जा आणि बुद्धीचा कौशल्यपूर्ण उपयोग म्हणजेच कर्मयोग.

टॅग्स :Blogmarathi blogs