Bharat Jodo Yatra : चालता चालता अशोकरावांचे 'वाढले वजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Jodo Yatra

Bharat Jodo Yatra : चालता चालता अशोकरावांचे 'वाढले वजन

कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा आज मराठवाड्यातून नाना पटोले यांच्या विदर्भात जाणार आहे. राहुल गांधी यांच्यासोबत कॉंग्रेसचे राज्यातील दिग्गजही चालत आहेत. सुरुवातीला देगलूरमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांनी या पदयात्रेत काही अंतरापर्यंत सहभाग घेतला. श्री. पटोले देगलूरपासून चालत आहेत. शिंदे यांच्या कन्या प्रणिती याही चालत आहेत. बाळासाहेब थोरात, भाई जगताप यांचाही सक्रिय सहभाग आहे. लातूरच्या देशमुख बंधुंनी हिंगोलीत जोरदार स्वागत केले पण, या सगळ्यांमध्ये चालता-चालता पक्षात वजन वाढले ते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे.

महाराष्ट्रात अशोकरावांनी या यात्रेचे उस्फूर्त स्वागत केले. देगलूर येथे यात्रेच्या स्वागतासाठी ४०-५० हजारांची गर्दी होती. नांदेड जिल्ह्यात सर्वत्र दहा-पंधारा फुटांच्या अंतरावर मोठे स्वागत फलक दिसत होते. त्यावर अशोकरावांसह त्यांच्या कन्येचेही छायाचित्र होते. देगलूर ते नांदेड रस्त्यावर असलेल्या कृष्णूर येथे तर कॉर्नर सभेसाठीही ५० हजारांची गर्दी होती. ते बघून राहुल यांचा उत्साह वाढला. ते ३१ मिनिटे बोलले.

कॉर्नर सभा जाहीर सभा झाली. नांदेड येथे झालेल्या जाहीर सभेत राहुल यांचे भाषण सुरू असताना मागे मोठ्या स्क्रीनवर अशोकराव यांचे राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासोबतची छायाचित्रे झळकत होती. एकूणच काय तर भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून अशोकरावांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मुलगी सुजया यांनाही राजकारणाची वाट दाखवली. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अशोकराव कॉंग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असू शकतात. असा अंदाज बांधला जात आहे. शिवाय अशोकराव यांचा यात्रेत असलेला सक्रिय सहभाग बघता ते भाजपमध्ये जाणार या चर्चेला पूर्णविरामही मिळाला आहे.

सुरुवातीला सावध भूमिका; शेवटी जोरदार हल्ला

या यात्रेदरम्यान देगलूर ते नांदेडपर्यंत तीन कॉर्नर सभा आणि नांदेड येथे एक जाहीर सभा झाली. पहिल्या तीन सभेत भाषण करताना अशोकरावांनी भाजपवर सौम्य टीका केली. त्यामुळे अशोकरावांच्या या सावध भूमिकेमुळे त्यांच्या मनात चाललेय तरी काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. त्यानंतर मात्र नांदेड येथे झालेल्या जाहीर सभेत अशोकरावांनी भाजपवर जोरदार हल्ला केली. राज्य-केंद्र शासन यांच्यावर चौफेर टीका केली. नांदेड येथील सभेला लाखोचा जनसमुदाय उपस्थित होता.

हिंगोलीत फलकातून दिसली गटबाजी

नांदेड जिल्ह्यात प्रत्येक फलकावर अशोकराव यांचे छायाचित्र दिसत होते. पण, हिंगोली जिल्ह्यात यात्रेने प्रवेश करताच एका फलकावर आमदार प्रज्ञा सातव यांचे छायाचित्र होते तर दुसर्‍या फलकावर नव्हते. कार्यकर्त्यांनी आपापल्या सोयीने फलक लावले होते. हिंगोली जिल्ह्यातील नियोजन माजी मंत्री अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांनी केले. त्यांनी हिंगोलीच्या सीमेवर यात्रेचे जोरदार स्वागत केले. सातवांच्या कळमनुरीतही राहुल यांचे स्वागत झाले.‌पण, हिंगोलीतील गटबाजी दिसून आली.