भस्मास जागतिक मान्यता मिळवून देण्याची गरज

Bhasmas Need Global Recognition Rajendra Ghorpade Article On Research
Bhasmas Need Global Recognition Rajendra Ghorpade Article On Research

काळाच्या ओघात अनेक चांगल्या पद्धती लुप्त होताना दिसत आहेत. त्याला अनेक कारणे आहेत. काही आधुनिक पद्धती विकसीत झाल्याने तर काही नैसर्गिक आपत्तीमुळे लुप्त होऊ लागल्या आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर पूर्वी हळद पेवामध्ये साठवली जात असे. ही हळद कित्येक वर्षे टिकून राहायची तसेच त्याचे नैसर्गिक गुणधर्मही टिकूण राहायचे. पण काळाच्या ओघात व नैसर्गिक आपत्तीमुळे पेव आता दिसेनासे झाले आहेत. आधुनिक पद्धतीत किडनाशकांचा मारा केला जातो. तसेच ओलसरपणा राहीला तर हळद काळी पडते. पेवाच्या साठवणूक पद्धतीत ना फवारणी ना ओलसरपणा राहातो. प्राणवायूच राहात नसल्याने जीवजंतूही तयार होत नाहीत. अशी साठवणूक पद्धत आता लुप्त होताना पाहायला मिळत आहे. याचे तोटे आपण पाहातोच आहे. आधुनिक पद्धतीत तो नैसर्गिक स्वाद हळदीत टिकवला जात नाही हे ही तितकेच खरे आहे. आयुर्वेदातील अशाच अनेक पद्धती आता मागे पडू लागल्या आहेत. या मागे पडणाऱ्या आयुर्वेदकीय पद्धतीवर संशोधन करून जागतिक पातळीवर प्रमाणीत केलेल्या औषधांचीनिर्मिती करण्यावर भर देण्याची गरज आहे.

आयुर्वेदात खनिज पदार्थांचा औषधे तयार करण्यासाठी वापर केला जातो त्यास रसशास्त्र म्हणून ओळखले जाते. रस म्हणजे पारा आणि त्यापासून मिळवलेली खनिजे. या खनिजांचा मानवी शरीरासाठी असणारे महत्त्व रसशास्त्रामध्ये विषद केले आहे. तसेच त्याचे मुळ व भस्मामध्ये रुपांतर याचाही त्यामध्ये समावेश आहे. ही पद्धती सुमारे 500 वर्षापूर्वी आयुर्वेदामध्ये विकसित झाली आहे. पण ही औषधे भारताबाहेर विकली जात नाहीत. युरोपसह अनेक देशांनी त्यावर बंदी घातली आहे. मात्र भारतामध्ये या औषधांचा वापर नियमितपणे केला जातो. तसे त्याचे चांगले गुणही पहायला मिळतात. विशेष म्हणजे ही औषधे योग्य प्रमाणात घेतल्यास त्याचे दुष्परिणामही पाहायला मिळत नाहीत.

भस्मामध्ये लोह, कॉपर, चांदी, शिसे, सोने, जस्त या जड धातूंचा नियमित वापर केला जातो. तर भस्म तयार करण्यासाठी पारा आणि अर्सेनिक यांचा वापर केला जातो. मुख्यतः हे सर्व धातू विषारी आहेत. यामुळेच या औषधांवर अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. यासाठी भस्म तयार करण्याच्या पद्धतीवर संशोधन करून त्याला जागतिक पातळीवर मान्यता मिळवून देण्याची मोठी संधी आहे. हे विचारात घेऊन महेश भागवत यांनी यावर संशोधन करून पेपर सादर केला आहे. 

भागवत यांच्या संशोधनाबद्दल माहिती देताना शिवाजी विद्यापीठातील डाॅ. देवेेंद्र भांगे यांनी सांगितले की,  भस्म तयार करण्याची आधुनिक पद्धत आणि पूर्वीच्या काळी असलेली पद्धत या दोन्हीची सांगड या संशोधनात घालण्याची गरज आहे. पूर्वीच्या काळी रूढ असलेली पद्धती शास्त्रोक्त होती. त्यामध्ये रसायनशास्त्राचे काही नियम काटेकोरपणे पाळले जायचे. उदाहरण द्यायचे झाल्यास सुवर्णवंग भस्माचे देता येईल. सुवर्ण वंग भस्म तयार करण्याच्या पद्धतीमध्ये पारा (रस), गंधक आणि कथील याचा वापर होतो. हे भस्म कुपीपक्व (बाटलीमध्ये) पद्धतीने तयार केले जायचे. ज्यामध्ये भस्माच्या अन्य घटकामध्ये पारा आणि कथील धातू समप्रमाणात घेऊन त्याचे मिश्रण बाटलीमध्ये भरून साधारणपणे 350 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत तापवले जायचे. अशा पद्धतीने तयार केलेले भस्म एक्‍स रे डिफ्रेक्‍शन आणि एक्‍स रे फ्लोरेसेन्स या रासायनिक पृथ्थकरणाच्या आधुनिक साधनांनी तपासले असता असे आढळले की त्यामध्ये पाऱ्याचे प्रमाण नगण्य दिसून आले. कारण पारा उच्च तापमानास पटकण वायूरूप होऊन निघून जातो. या रासायनिक पद्धतीत पाऱ्याचे कार्य हे कथील विरघळवण्यासाठी आहे. सध्य परिस्थितीत पारा विरहीत सुवर्ण वंग भस्म तयार करण्याच्या पध्दतीस चालना मिळू शकते. कथील विरघळवणारे पदार्थ उपलब्ध असल्याने भस्म तयार करण्याची पद्धती वातावरणासी अनुरूप आणि पारा विरहीत होऊ शकते.

दुसऱ्या एका उदाहरणामध्ये रससिंदूर आणि कज्जलीचा उहापोह करू शकतो. रससिंदूर तयार करताना समप्रमाणात पारा व गंधक घेतले जातात. पारा व गंधकावर वेगवेगळे हर्बल किंवा दुधाचे उपचार केले जातात व नंतर गोठवून गाढे मिश्रण तयार केले जाते. त्याचा रंग काळा असल्यामुळे त्यास कज्जली असेही म्हटले जाते. कज्जलीचे उच्च तापमानास ( 600 ते 650 अंश सेल्सिअस) रससिंदूर किंवा सिंदूरमध्ये रूपांतर होते. सध्या अस्तित्त्वात असलेल्या शास्त्रिय ज्ञानाच्या आधारे आपण असे अपेक्षीत करू शकतो की पारा हा उच्च तापमानास वायू रूप होऊन मिश्रणातून हवेत निघून जातो. तसेच पारा जर हवेत तापवला तर ऑक्‍सिजनबरोबर संयोग पावून त्याची ऑक्‍साईडची संयुगे तयार होतात. यासाठी रससिंदूर तयार करण्याच्या पद्धतीमध्ये कज्जली केळीच्या पानात व बाहेरून चिखलाचा लेप लावून भट्टीत भाजली जाते. त्यामुळे पारा वायूरूप होऊन हवेत उडून जात नाही. तसेच ऑक्‍सिजनशी संपर्क होत नसल्याचे त्याचे संयुगही तयार होत नाही. यामुळे पारा गंधकासोबत (एचजीएस) राहातो. परिणामी रससिंदुर तयार होते. यात असे स्पष्ट होते की पूर्वीच्या काळी निष्क्रिय वातावरणातील अभिक्रिया बंद पध्दतीने घडवून आणण्याचे कसब ज्ञात होते.

भस्म तयार करण्याच्या पद्धतीचा आंधुनिक तत्राने सखोल अभ्यास केल्यास आपणास भस्माच्या तत्कालिन पद्धतीमागच्या रासायनिक क्रिया समजू शकतील. तसेच समकालीन तंत्रज्ञानाची सांगड घातल्यास त्यामध्ये नवनवे बदल करता येतील आणि त्यास जागतिक पातळीवरही नेता येईल. खरंतरं यासाठी भारतात काही प्रयत्नच झाले नाहीत. त्यालाही काही कारणे आहेत. मुख्य म्हणजे भस्म तयार करण्याची प्रक्रिया खुपच मोठी आहे. काही दिवस व काही महिने ही प्रक्रिया करावी लागते. वेळखाऊ तर ही पद्धती आहेच पण त्या बरोबरच महागडीही आहे. कच्चा माल तसेच कज्जली सारखी रासायनिक प्रक्रिया ही महागडी आहे. तर कॅलसिनेशन प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात इंधन लागते. भस्म तयार करण्याच्या पद्धतीत लोह, जस्त, गंधक, चांदी, कॉपर, सोने यांचा वापर केला जातो. तसेच पारा आणि अर्सेनिक सारखे विषारी धातूही भस्माच्या प्रक्रियेत वापरले जातात. जनावरांपासून उपलब्ध होणारे ताजी उत्पादने, हर्बल उत्पादने असा ठराविक कच्चा माल प्रक्रियेसाठी लागतो. ही आवश्‍यक उत्पादने उपलब्ध होऊ शकत नाहीत. यासाठी आवश्‍यक असणाऱ्या पर्यायी पदार्थांचे मुल्पमापन होण्याची गरज आहे.

भस्म तयार करण्याच्या काही पद्धतीचे स्पष्ट शास्त्रोक्त कारण दिले जात नाही. हाच कच्चा माल का वापर जातो किंवा हीच रासायनिक प्रक्रिया का केली जाते. तसेच वेळखाऊ प्रक्रियेबाबतही स्पष्टीकरण दिले जात नाही. तसेच प्रक्रियेच्या प्रमाणीकरणाची कमतरता आणि गुणवत्ता नियंत्रण नसल्याने समजण्यास कठीण जाते. अशा विविध कारणांसाठी भस्मला जागतीक पातळीवर मान्यता देण्याचे संशोधकांपुढे आव्हान आहे. यासाठी यातील प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास होण्याची गरज आहे. नव्या तंत्रज्ञानाने या पद्धतींचा अभ्यास करून याचे प्रमाणीकरण केल्यास निश्‍चितच भस्माला जागतिक बाजारपेठ मिळू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com