भिवा भदाणेचा तेरावा

प्रा. अजित पाटील, सातारा
Thursday, 3 September 2020

भिवा भदाणे हा खासेराव आण्णांचा निष्ठावंत कार्यकर्ता. वयानं पन्नाशीचा. सत्त्वशील देवधर्म मानणारा. त्याचं आचरण करणारा आणि आपल भलं आणि आपलं काम भलं या वृत्तीचा; पण या देव माणसाच्या पोटी दोन राक्षस जन्माला आले होते. राम आणि लक्ष्मण अशी त्यांची नावं मोठ्या प्रेमानं ठेवली होती; पण या पोरांचंच काही खरं नव्हतं.

दिवसागणित दिवस जात होते. जग बदलत होतं. येणाऱ्या दिवसगणित माणसं बिघडत चालली होती. स्वार्थ हा आता परवलीचा शब्द बनला होता. आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र-मित्र, मैत्रिणी-मैत्रिणी ही नाती इतिहासजमा होत चालली होती. पैशासाठी यापैकी कुणीही कुणाचाही गळा दाबायला तयार होत होतं. इस्टेटीसाठी ही मंडळी कोर्टात जात होती. सगळी माणसं खुळ्यासारखं पैसा-पैसा करत होती. आता एकाचा पैसा चैनीसाठी पुरेनासा झाला म्हणून त्यांच्या बायका मागेल ती किंमत देऊन नोकऱ्या मिळवत होत्या आणि कसलीही किंमत मोजून प्रमोशन मिळवत होती. आयटी क्षेत्रातील तरुणाई सकाळी नऊपासून रात्रीपर्यंत राबून खोऱ्यानं पैसे मिळवत होती आणि शनिवार-रविवारच्या सुटीत ती व्यसनात उडवत होती. पान-सुपारी बिडी-सिगारेट ही व्यसनं आता किरकोळ या स्वरूपात मोडली जात होती. अमली पदार्थांचं व्यसन शाळांपासून सुरू झालं होतं. मदिरेला प्रतिष्ठा पावली होती. घरी आलेल्या पाहुण्यांना कुलीन घरातल्या स्त्रीयाही मदिरा सर्व्ह करत होत्या. सरकार दरबारी कामं होण्यासाठी मदिरेबरोबर मदिराक्षीही पुरवावी लागत होती. त्यानं एड्‌स आणि गुजरोगांचा फैलाव वाढला होता. कामासाठी पैसे देणं आणि घेणं हे राजमान्य झालं होतं.

हुब्लकवाडी या सांगली जवळच्या निमशहरी गावातही फारसं वेगळं वातावरण नव्हतं. गावच्या पूर्वांकाळापासून सरपंच असलेल्या आणि सांगली जिल्ह्याचे एकमुखी नेते असलेल्या खासेराव आण्णा जाधवांना ही माणसांची वृत्ती आणि प्रवृत्ती पाहून प्रचंड यातना होत होत्या. गावात व्यसन येऊ द्यायचं नाही आणि कुणी व्यसन आणलं तर त्याची रंगा पैलवानाकडून धुलाई करायची असा त्यांचा परिपाठ होता. हिंदकेसरी रंगा पैलवान हा गावच्या तालमीचा वस्ताद आणि खासेराव आण्णांचा उजवा हात होता. त्याची खासेराव आण्णांवर अनन्यसाधारण भक्ती होती. खासेरावआण्णा बोट दाखवतील त्याला ठोकून काढायचा हा रंगा पैलवानाचा शिरस्ता होता.

आता बदलत्या कालमानाप्रमाणं खासेरावआण्णांचं आणि त्यांचं वयोमान वाटत होतं. ते वृद्धत्वाकडं झुकले होते. बरीचशी जुनी-जाणती ईश्‍वराला प्यारी झाली होती. त्यांची उणीव उथळ तरुणाईकडून भरून जाण शक्‍य होतं. आजच्या तरुणाईला आता निष्काम कामापेक्षा खुर्ची प्यारी होती. समाजसेवेच्या नावाखाली सत्तेच्या खुर्च्या बळकावण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. ग्रामपंचायत्या, नगरपालिका, झेडप्या, सहकारी सोसायट्या आणि सहकारी बॅंकातल्या खुर्च्या या तरुणाईनं सर्व गलिच्छ मार्ग वापरून लाटत आणल्या होत्या. खासेराव आण्णांना हे सगळं पाहावत नव्हतं आणि सोसवतही नव्हतं. असलं काही दिसलं की त्यांच्या मस्तकावरच्या शीरा धडधडायला लागत; पण निवडणुकीसाठी ही तरुणाईची व्होट बॅंक महत्त्वाची असल्यानं नाईलाजानं मूग गिळून गप्प राहावं लागत होतं. हेच दिवस बघायला का मला येवढं आयुष्य दिलं असं सतत ते पुटपुटत होते.

भिवा भदाणे हा खासेराव आण्णांचा निष्ठावंत कार्यकर्ता. वयानं पन्नाशीचा. सत्त्वशील देवधर्म मानणारा. त्याचं आचरण करणारा आणि आपल भलं आणि आपलं काम भलं या वृत्तीचा; पण या देव माणसाच्या पोटी दोन राक्षस जन्माला आले होते. राम आणि लक्ष्मण अशी त्यांची नावं मोठ्या प्रेमानं ठेवली होती; पण या पोरांचंच काही खरं नव्हतं. शाळांना दांड्या मारायच्या शाळेत बसली, तर गुरुजनांना सतावून सोडायची. अभ्यासाच्या नावं शिमगा असल्यानं पास होणं अवघड व्हायचं. मग भीमा त्या शिक्षकांना धान्य, भाजी, फळं असा रतीब देऊन पास करवून घ्यायचा. भीमाची पत्नी भीमाई सत्त्वगुणसंपन्न होती. आपला संसार ती नेकीनं आणि नेटानं सांभाळायची. सणावाराला पोरांच्या गुरुजनांना भरभरून ताटं वाढवून पाठवायची. सातवीच्या परीक्षेत फुटाणे गुरुजींनी या दोघांचे पेपर लिहून घेऊन त्यांना पास केलं होतं; पण शाळेत तसं करून घेणारे गुरुजन नव्हते. त्यामुळं या राम-लक्ष्मणाची गाडी आठवीत अडकली ती पुढच सरकत नव्हती.
 
मग आठवीतच त्यांनी शाळेला रामराम ठोकला. मग दिवसा सकाळी पाणवठ्यावर नाही तर बाजारात पोरी-बायांची टवाळी करत कोणत्या तरी चहाच्या किंवा पानाच्या टपरीवर पडून असायची. आता त्यांना पान-तंबाखूचं व्यसन लागलं. त्यांची लेव्हल वाढली आणि हे दोघं तंबाखूला चुना लावून मळत कॉलेजच्या गेटवर आपल्या मोटारसायकली आडव्या लावून त्यावर ठिय्या मारून बसू लागली. मग पोरींचे आई-बाबा भीमाकडं येऊन तक्रार करू लागले. मग संतापून भीमा त्यांच्यावर जाळ काढायचा; पण त्याचा या दोघांवरही काडीमात्र परिणाम व्हायचा नाही. भीमाईला हे सहन व्हायचं नाही ती नवऱ्याला म्हणायची, ‘अवो पोरांना काय तरी समजवा. गावात आपली पत खाली होत चाललीय.’ तसं भीमा म्हणाला, ‘बये सगळे मार्ग संपलेत. आता या पोरांचं आणि त्यांच्या नादानं काय व्हणार देव झाणे; पण या पोरांच्या करण्या असह्य झाल्या तेव्हा त्यांची बापं खासेराव आण्णांच्या वाड्यावर आली आणि त्यांनी त्यांच्याकडं त्यांच्याविषयी तक्रारी केल्या. तसं खासेराव आण्णांनी भीमाला फोन लावून तातडीनं बोलवून घेतलं.

आण्णांचा फोन म्हटल्यावर भीमा हाबकला आणि भीमाईला म्हणाला. 
भीमे आण्णांनी बोलवलंय. आतापासचन माज अंग कापायला लागलय. 
आवो तुमी कुणाची कागाळी केली काय?
न्हाई गं. 
मग आण्णांनी कशाला बोलवलं असतं तुमाला?
तेबी खरंच; पण गावात काईबी केलं न्हाई. कुणाच्या केसालाबी धक्का लावला न्हाई. मग हे कसं?
मग या जाऊन.
पाचच मिनिटांत भीमा खासेरावआण्णांच्या वाड्यावर हजर झाला. तिथं गावातली बरीचशी माणसं त्याला दिसली; पण आपल्याला कशाला बोलवलय याचा त्याला बोध होईना. खासेरावआण्णांच्या पाया पडत तो म्हणाला, पाय लागतो आण्णा.
तसं खासेरावआण्णा जरा वरच्या पट्टीत म्हणाले, आरं भीमा घरात तुझं लक्ष न्हाई. काय करतोय तरी काय?
काय चूक झाली ते दावा आण्णा. माफी मागतो. दुरुस्त करतो.
आरं तुझी दोनी पोरं गावात पोरीची बाया-माणसांची टवाळी करत फिरतात. त्यांना जरा दाब.
आण्णा पोरं ऐकण्याच्या भायेर हायेत. कितींना सांगितलं, समजावलं तरी या कानानं ऐकतात आणि त्या कानानं सोडून देतात.
मग दोन उडवून द्यायच्या.
मी कसला उडवून देतोय. तीच मला उडवून देतील.
आयला इक्ती बिगडलीत?
व्हय आण्णा.
मग त्यांना शालत डांब.
पण ती जायला नकोत का?
ते तुझं तू बग नाय तर तुझं आन तुझ्या पोरांच काई खरं न्हाई.
तसं घाबरून भीमा म्हणाला.
न्हाई, न्हाई आण्णा मी बगतो; पण हात उचलू नका.
ठिक हाये जा. पण मी काय म्हणालो ते लक्षात ठेव म्हंजे झालं.
होय आण्णा.
तसं भिवा आला तसा कापऱ्या आंगानं घरी आला. भीमाई त्याची वाटच पाहात होती. त्यानं भीमाईला खासेराव आण्णा काय म्हणतात ते सांगितले आणि म्हणाला.
भीमे पोरं शाळत परत कशी जातील?
काय तरी युक्ती केली पायजे.
ते आता तुजं तू बग. नाय तर आण्णा आपल्याला गावात ऱ्हावू द्यायचे न्हाईत.’
मी बगते ते.
पण पोरं कुठायत?
ती काय यायला लागलीत.
माता-पित्यांना दारात बघून राम म्हणाला,
काय पिताश्री आज दारात? कुणी कागाळी केली काय?
लक्ष्मण नाटकी स्वरात म्हणाला,
बोला मातोश्री आज्ञा करा. त्याची तामिली होईल.
तसं न्हाई, पण घरी यायला वेळ झाला म्हणून इचारलं?
राम म्हणाला.
मातोश्री काळजीचं कारण न्हाई. आम्ही कुठं शेण खायला गेलो नव्हतो.
लगेच लक्ष्मण म्हणाला,
अजून रात्री शेण खायला जायला अजून अवकाश हाये.
सद्या आमची गाडी बिडी ओढण्यापर्यंतच गेली हाये.
तुम्ही देत असलेल्या पॉकेटमनीत सिगारेट परवडत न्हाई म्हणून बिडी.
राम म्हणाला.
आता सहावा वेतन आयोग आलाय. उसाचा दर दोन हजारांवर गेलाच तरी पॉकेटमनी तुमी जुन्या दरानच देताय. त्यात वाढ करा.
तसं भीमाई म्हणाली,
तुमचा शंभर रुपयाचा पॉकेटमनी पाचशे करते; पण मी सांगाल तसं ऐकायला हवं.
हे बगा माताश्री आमाला जर नांगराला जुपायचा विचार आसल तर जमायचं न्हाई.
आसं कसं करीन मी माझ्या राजांनो.
मग येवडा प्रेमाचा आळा यायचं कारण?
पोरांवर आईनं प्रेम करू नये काय?
तसंच लक्ष्मण म्हणाला
तुमचं प्रेम द्या सोडून. प्रेमाचं कारण सांगा.
तुमी परत शाळत जाणार असाल तरच पाकेटमनी वाडल. न्हाई तर न्हाई.
आरे देवा. शाळेत जाणं हे आस्मानी संकट हाये.
ते कसं?
शाळेत जाणं म्हंजे मास्तराचा मार खाणं. हे तसलं काय सांगू नका. चांगलं काय तर सांगा.
आरं ते काय उगच मारत्यात काय? तुमी शिकून शाणं व्हावं. मोठ्ठं व्हावं म्हणून मारत्यात झालं. त्याचं वावगं मानू नये.
मोठ्ठं होण्यासाठी मार खावा लागतो हे आमी नवीनच ऐकलय. शाळा प्रकरण आमाला काय जमायचं न्हाई.
तसं राम म्हणाला.
ज्ञानपिठापेक्षा गोलपिठा भला.
पोरा असल्या भानगडी होण्याआगोदर आमी तुमचं लग्नं लावून देऊ.
वाऽऽ, वाऽऽ काय सोन्यासारकं बोललात. कवा करतात लग्न बोला.
पोरा लग्न करायचं म्हंजे चांगली देखणी बायको पायजे.
तर ऐश्‍वर्या-माधुरीगतच बगा.
पोरा अशा बायका कुणाच्याही गळ्यात वरमाला कशा घालतील?
म्हंजे
आरं बाबांनो अलीकडं चांगल्या देखण्या पोरींना शिकलेली पोरचं पायजे असत्यात. तुमी शाळेत जावा. मॅट्रिक पास व्हा. मग बगा कशा झकास बायका आणतो तुमाला.
तसं राम-लक्ष्मण दोघंही एकमेकांच्या तोंडाकडं बघू लागले.
लक्ष्मण म्हणाला, दादा म्हातारा करेक्‍ट बोलतोय. ऐश्‍वर्या पायचे आसल तर शाळत जाणं गरजेचं हाये.
राम म्हणाला, माज्या धाकट्या भावा तुझं खरंय; पण त्यासाठी पेपरात काय तरी लिहिता आलं पायजे; पण आपलं आणि सरस्वतीचं वाकडं. मग आपण पास कसं होणार? मग घाईघाईनं भीमाई म्हणाली.
तुमी शाळत तर जा. तुमाला पास करण्याचं तुमचं डॅडी बघतील.
मग आमी शाळेत जायला एकदम रेडी.
राम म्हणाला, पण तेवडं पॉकेटमनीचं बघा.
म्हयना पाचशे देते. मग तर झालं?
मग आमी शाळेत काय पण ढगात पण जायला तयार हाये.
लक्ष्मण जरा मोठ्या सुरात म्हणाला,
पण आमची अट हाये.
आता कसली अट
त्या मास्तरांनी आमच्या अंगाला हात लावता कामा नये. नाय तर आमी त्यांच्या आंगाची सालटी सोलून काढू.
तसं काय करू नका बाबांनो. आमी सांगतो मास्तरांना. मग तर झालं?
झालं की.
पण राम साशंक होऊन विचारता झाला.
पण मास्तरडी आमच्या अंगाला हात लावणार न्हाईत याची गॅरंटी कशी काय देता?
त्यांना वर्षाभाराचं धान्य भरून देऊ. त्यांच्या घरातल्या सदस्यांना कापडचोपड देऊ. त्यांच्या बायकोला सणावाराला साडीचोळी करू. अगदीच आडले तर त्यांना म्हयना भरभक्कम हप्ता देऊ.
वाऽऽ, वाऽऽ काय तेज बुद्धी हाये.
पुढं शिवाजी महाराजांच्या स्टायलीत तो म्हणाला.
माते तुमची बुद्धी जर आमच्यात आसती तर आमी तुमच्यासारखे बुद्धिमान झालो असतो आणि वर्षाच्या वर्षाला पास होत गेलो असतो...
तसा लक्ष्मण म्हणाला.
पण काय नशीब आमचं, आम्ही दोघं बापाची बुद्धी घेऊन जन्माला आलो आणि दर वर्षी नियमानं फेल होत राहिलो.
गप ऱ्हारं पोरांनो पित्याला आसं वंगाळ बोलू नये.
खरं तेच बोललो आणि खरं तेच बोलत ऱ्हाणार.
त्याच स्टायलीत लक्ष्मण म्हणाला.
बरंऽऽ, बरंऽऽ जादा शाणपणा करू नका. मग जाणार ना शाळत?
आपल्या इच्छेखातर जाऊ म्हणतो.
मग भीमाई शाळेत गेली आणि थैली मोकळी सोडून आणि हेडमास्तरांच्या हातापाया पडून पोरांची ॲडमिशन करून घेतली.

भीमाईची युक्ती सफळ झाली. राम-लक्ष्मण गुटक्‍याची पुडी तोंडात सोडून शाळेचा रस्ता चालू लागले. भीमानं त्यांना सकाळ-संध्याकाळ शिकवण्यात अडकवून टाकलं. दोन्ही पोरांना चांगली बायको मिळावी म्हणून हा जुलमाचा अभ्यास सहन करू लागली. त्यानं गावातल्या पोरीबाळी आणि बाया या दुकलीच्या त्रासातून मुक्त झाल्या. शाळेत पोरं गप्प होती. स्वतः सिगारेटी ओढत होती आणि गुरुजनांना भारी सिगारेटी ऑफर करत होती. त्यांचा मासिक हप्ता भीमाकडून नियमानं एक तारखेला मिळत असल्यानी तीही आळी मिळू चूप करून होती. आता आपली पोरं मार्गाला लागली म्हणून भीमा-भीमाई खूश होते; पण थोड्या दिवसानंतर या पोरांना चांगलं वागायचा कंटाळा आला. असल्या मिळमिळीत जीवनात काही थ्रिल नाही आसं वाटू लागलं. मग त्यांनी आपल्याला सवाई असलेल्या मॅट्रिकच्या आणि कॉलेजच्या गुरू पोरांशी दोस्ती केली आणि त्यांना गुरू मानून त्यांचा हातात गंडा बांधला. त्या गुरूंनी त्यांना मदिरापानाची दीक्षा दिली. त्यामुळे राम-लक्ष्मण परमानंदात गुंग झाले. रोज संध्याकाळी गावठी दारूच्या गुत्यावर नियमितपणे जाऊ लागले. त्यामुळे त्यांचा पाचशे रुपये पॉकेटमनी त्यांना पुरेना. भीमा-भीमाईला हे सगळं जाणवू लागलं. दिसू लागलं. त्यांची आता खात्री झाली की पोरं आता पूर्ण हाताबाहेर गेलीत. सुधारण्याच्या पलीकडं गेलीत. शेवटी आपल्या नशिबात असेल ते होणार. आपण फक्त जे-जे होत राहील ते बघत राहायचं असं त्यांनी ठरवलं. 

एक दिवस संध्याकाळी भीमा-भीमाई अंगणात बसून चहा पित होते. तेवढ्यात त्यांची दिवट्या पोरांची जोडी गावठी दारू पिऊन डुलत डुलत आली आणि राम त्यांना म्हणाला.
गुड इव्हिनिंग डॅडी.
लक्ष्मण म्हणाला.
गुड इव्हिनिंग ममी.
तसं भीमा-भीमाई त्यांच्याकडं ऑ वासून बसू लागले. भीमा त्यांना म्हणाला.
आज राक्षसातोंडून अमृतवाणी?
राम म्हणाला, यस डॅड आम्हाला अमृतासाठी आणखी पैसे हवेत. त्यासाठी ही अमृतवाणी.
अमृताला येवढे पैसे?
डॅड आता देशी आणि गावठी पिऊन कंटाळा आलाय. परदेशी दारूला जास्त पैसे लागतात. तुम्हाला हे कळणार न्हाई. आता म्हयन्याला पाच हजार देत चला.
तसं भीमा ओरडला.
म्हयन्याला पाच पाच हजार? आरं लेकांना माझ्याकडं काय पैशाचं झाड हाये काय?
डॅड तुमच्याकडं पैशाचं झाड न्हाई; पण पैशे बक्कळ देणारं उसाचं झाड हाये. तेव्हा तुमची ओव्हर लोड झालेली बॅंकेची खाती डाऊनलोड करा.
आरं पण येवड्या पैशाचं काय करणार?
इंपोर्टेड दारू आणि ब्राऊन शुगर?
व्हय भारी दारू आणि अंमली पदार्थ.
आयला भलतच पुडं गेलाय?
आजून पुढं जायचच. रंडीबाप्पीला सुरवात केली न्हाई हे नशीब समजा.
तसं संतापून भीमा म्हणाला.
चला चालतं व्हा. दा पैसाबी वाढवून मिळणार न्हाईत.
तसं लक्ष्मण म्हणाला.
हे असलं वागणं म्हागात पडल.
काय करणार सुक्काळीच्यांनो.
काय करणार ते बघत ऱ्हा.
घरातनं लाथा मारून हाकलून दिन. जादा बोललात तर.
आई-बाप म्हणून अजून तरी मान ठेवलाय हाकलून द्यायची भाषा करत आसाल तर आई-बाबा असून पोरांच्या पाया पडायची पाळी आणू.
आरं जारं जा. काय करायचं ते करा. दोन वेळचं जेवण बंद केलं म्हणजे निट मार्गाला चाल.
मग राम म्हणाला.
मग बघाच आता क्‍या क्‍या होता है.

मग राम-लक्ष्मण आल्या पावली परत फिरले. रात्री परत बाहेर खावून उशिरा परतले. भीमाला वाटलं पोरं घाबरली. सरळ आली. तो जरासा खूष झाला; पण दुपारी टपाल आलं. त्यावर कोर्टाचा शिक्का होता. ते पाहून घाबरून भीमा पुटपुटला. सालं काय लचाडं आलं.? त्यानं घाईघाईनं पत्र फोडलं आणि तो थंडगार झाला. पोरं त्याच्याविरुद्ध कोर्टात गेली होती आणि त्यांना इष्टेटीतला वाटा हवा होता. तसं तो उठला आणि गावातल्या कुलकर्णी वकिलाकडं गेला. त्याला कोर्टाची नोटीस दाखवली. तसं कुलकर्णी वकील म्हणाले.
तुमची इस्टेट वडीलोपार्जित आहे आणि दोन्ही पोरं आठवीत असली तरी वयानं मोठी आहेत. सज्ञान आहेत. कायद्याप्रमाणं तुम्हाला त्यांना वाटा द्यावा लागेल.
भीमा खलास झाला आणि घरी आला. तशी त्याची वाट बघत बसलेली भीमाई त्याला म्हणाली.
काय म्हनला वो वकील
आपली इस्टेट वडिलोपार्जित हाये. घरात आन शेतीत त्यांना कायद्यानं वाटा द्यावा लागल.
आता वो?
पोरांशी समजुतीनं घ्यावं लागल.
तसं संतापून भीमाई म्हणाली.
त्यांच्या पाया पडण्यापरिस त्यांचा वाटा त्यांना देऊन टाका. पुडं ते आन त्यांचं नशिब.
आगं येडे. त्यांना त्यांचा वाटा दिला तर ते जमीन इकून बाई-बाटलीत सगळा पैसा घालवतील आन पुन्हा आपल्या बोकांडी बसतील.
मग वो?
तुच त्यांना जरा आंजारून गोंजारून घे आन कोर्टातनं माघार घ्यायला सांग.
भीमा-भीमाई दारातल्या पायावर पोरांची वाट बघत बसल्या. रात्री दहाच्या सुमारास दोन्ही पोरं टाईट होऊन डुलत-डुलत घरी आली. तसंच भीमाई म्हणाली. 
आरं पोरांनो कुठं गेला व्हतारं इतका वेळ? तुमची वाट बघून, बघून डोळं थकलं आमचं.
राम म्हणाला वाऽऽ, वाऽऽ. माते आज तुला आमचा येवडा का पुळका आलाय ह्ये आमाला चांगल म्हाईत हाये.
आसं कारं म्हन्ता बाबांनो? आमच्या रक्तामासाचं तुमी. जीव तुटतो तुमच्यासाठी.
जीवबीव काय तुटत न्हाई आमच्यासाठी. हा सगळा कोर्टाच्या नोटिशीचा परिणाम हाये.
तसं समजा. आपलं घरातलं गावभर कशापाई करता?
तसं गावभर करायचं नसलं तर आमचा वाटा देऊन टाका. आमी निगालो झोपायला बाय... बाय...
रात्रभर भीमा झोपला नाही. या अंगावरून त्या अंगावर होत होता. पहाटे-पहाटे तो उठला. त्यानं मनाशी काही ठरवलं. धोतर नेसल. कुडता चढवला आणि पायात वाहना सरकवल्या आणि तो दार उघडून बाहेर पडला. तसं भीमाईनं काळजीनं विचारलं.
येवड्या सकाळी सकाळी कुटं चालला की?
तेराव्याला
तेराव्याला? पण कुणाच्या?
कुणाच्या म्हंजे माज्याच.
आवो पण...भीमाईकडं दुर्लक्ष करत भीमा वाजंत्रीवाल्याच्या वाड्यावर आला. दारं आपटून, खडखडावून त्यानं त्यांना उठवलं. तसं ते म्हणाले.
काय वो मालक? इतक्‍या सकाळी?
चला.?
चला पण कुटं?
वाजवायला.
चला म्हटलं की चलावं. पैसे मिळाल्याशी कारण.
दुप्पट द्यावं लागतील.
दिले. आता हाला.
पाचच मिनिटांत वाजंत्रीवाले उठले. गळ्यात आपली वाद्य आडकवून वाद्यांचा कडाका उडवून दिला. तसं भीमा म्हणाला, 
चला अंतू बामणाच्या घरावरून गावातनं मिरवणूक काडायची आन आण्णांच्या वाड्याम्होरं नेऊन थाबवायची.
वाद्यांच्या कडाक्‍यानं गाव जागं झालं. प्रत्येक जण घराच्या बाहेर येऊन भीमाला विचारू लागला. काररं भीमा काय भानगड हाये? तसं भीमा त्यांना सांगू लागला. ‘माजा तेरावा हाये. आण्णाच्या वाड्याम्होरं कार्यक्रम हाये. तेवा जेवायला या. तसं सगळी माणसं ऑ करू बघत होती. अखेर मिरवणूक अंतू भटजीच्या घरापुढं आली तसं भीमानं आवाज दिला.
अंतोबाऽऽ, ओ अंतोबाऽऽ
तसं अंतू भटजी बाहेर येऊन म्हणाला.
काय रं भीमा काय भानगड आहे? ही वाजंत्री?
तू तुजं सगळं सामान घे आन चल माझ्याबरोबर
पण कुठं? आणि कशाला?
माजा तेरावा हाये आन सगळं क्रियाकार्य करायचं हाये.
आरे पण तू जिवंत आहेस? जिवंतपणी तेरावा कसा काय करायचा?
बामणा चल म्हटलं की चलावं. कर म्हटलं की करावं.
तोंड विचकशील तेवढे पैशे देतो.
पैसे ॲडव्हान्स द्यावे लागतील.
हे दोन हजार घे. मग तर झालं? खिशातनं पैसे काढून देत भीमा म्हणाला.
मग चला मी येतोय.
येतोच न्हवं. तू पुडं आनं आमी मागं.
जशी तुमची इच्छा.
मग सर्व सामुग्रीसह भीमा अंतूला पुढं घालून चालू लागला. त्याच्या मागं कडाडणारी वाजंत्री. वाजंत्रीमागं पोरंठोरं आणि निम्मं गाव होतं. ही सगळी मिरवणूक खासेरावआण्णांच्या वाड्यासमोर आली. त्या आवाजानं खासेरावआण्णा वाड्याबाहेर आले होते; पण त्यांच्याकडं दुर्लक्ष करत भीमा अंतूवर ओरडला.
बामणा तुझं होमहवंन, मंत्र-तंत्र सुरू कर.
पण खासेरावआण्णांना दारत उभं बघून तसं करायचं धाडस होईना. तसं भीमा ओरडला.
बामणा चालू करतो का घालू दगड डोक्‍यात?
तसं घाबरून अंतू भटजी तयारीला लागला; पण या सगळ्या आपल्या वाड्यासमोर चाललेल्या प्रकारानं संतापानं ते ओरडले.
भिम्या हा काय चावटपणा लावलायस?
आण्णा तेरावा हाये.
पण कुणाचा?
कुणाचा कशाला? माझाचकी.
पण जीतंपणी?
व्हय. आणि भीमानं भोकाड पसरलं. तो मोठमोठ्यानं रडू लागला. तसं खासेरावआण्णांनी त्याला पोटाशी धरून त्याच्या पाठीवरून हात फिरवत विचारलं.
आरं भीमा झालं तरी काय?
आण्णा मेली. साफ बुडालो. गावात तोंड दाखवाच जागा ऱ्हायली न्हाई.
आरं पण झालं काय?
पोरं इस्टेटीच्या वाटणीपायी कोर्टात गेलीत.
पण कशापायी
तसं राम-लक्ष्मणाचं सगळं रामायण भीमानं खासेरावआण्णांना ऐकवलं. तसं चवताळून खासेरावआण्णा शेजारी उबं असलेल्या रंगा पैलवाना म्हणाले.
जारं त्या भीमाच्या दोन्ही पोरांना उचलून घेऊन ये.
तसं रंगा म्हणाल
हा गेलो आण आलोच.’
पाच-दहा मिनिटात रंगा आणि त्याच्या तालमीतल्या पोरांनी त्यांना अक्षरशः फरफटत आणलं. तसं संतापून राम म्हणाला.
आण्णा हा जुलूम झाला. आमाला फरफटत आणायचं हे कायद्यात बसत न्हाई.
भाड्यांनो कोर्टात गेलाय म्हणं इस्टेटीच्या हिश्‍स्यापायी.
व्हय! त्यात तुमचं काय जात? ही आमची खासगी बाब हाये.
तसं खासेरावआण्णांनी खाडकन रामाच्या थोबाडीत उडवून दिली.
त्यांच्या पाठोपाठ रंगा पैलवानानं लक्ष्मणाच्या कानाखाली थाडकन आवाज काढला. तसं ती दोघही होलपटून पडली. 
खासेरावआण्णा ओरडले.
चला ज्याची इच्छा आसल त्यानं आणि नसल त्यांनीही आपल्या हाताची खाज भागवून घ्यावी. तसं पोरींच्या बापांनी आणि बायकांच्या नवऱ्यांनी त्यांना तुडवायला सुरवात केली. मग त्यांना मदत करायला पोरीबाळी आणि बायका पुढं सरसावल्या. आता राम-लक्ष्मणाला मार सोसवेना. ती दोघंही आण्णांच्या पायावर पडून त्याचे पाय गच्च धरून विनवू लागली.
आण्णा मारू नका. लई झालं. सोसवत न्हाई आता.
म्हणाल तसं करतो.
कोर्टातनं केस माग घेणार काय?
पण...?
अजून माज संपलेला दिसत न्हाई. रंगा त्याला ठोकून काड.
तसं ते दोघेही घाईघाईनं म्हणाले,
आण्णा कोर्टातनं माघार घेतो मग तर झालं?
तेवढ्यानं भागणार न्हाई.
लक्ष्मणानं विचारल,
म्हंजे?
या पुडं दारूला स्पर्श करायचा न्हाई.
न्हाई आण्णा दारू सोडली.
गुटखा खायचा न्हाई.
न्हाई खाणार आण्णा.
पोरीबाळींच्या, बायकांच्या वाटेला जायचं न्हाई.
न्हाई जाणार वाटलं त्यांच्या.
शाळा इमानानं शिकायची.
शिकणार आण्णा
आई-बाप देतील त्या पाकेटमनीत भागवायचं.?
भागवतो आण्णा.
तसं खासेरावआण्णा रंगाला म्हणाले,
गड्या या गणपतीला उचलून दवाखान्यात न्या. आन मलमपट्टी करा.
तरं रंगा पैलवानानं आणि त्याच्या तालमीतल्या पोरांनी उचललं तसं खासेरावआण्णा ओरडले,
गणपती बाप्पा...
तसं तमाम जनतेनं साथ दिली, मोरया...
मग वाजंत्रीच्या कडाक्‍यात गणपती बाप्पा मोरयाच्या घोषात मिरवणूक दवाखान्याच्या दिशेनं निघाली...

संपादन : संजय शिंदे

इतर ब्लॉग्स