नवा एन्फ्लुएन्झा

social media
social media

आतापर्यंत जाहिरात ही जाहिरात म्हणून कळत होती. पण आता ते कळत नाही, आणि गंमत अशीय की इथंलं उत्पादन कळत नाही, त्याचे निर्माते दिसत नाहीत. त्यातून होणारी फसवणूक मात्र अगदी नक्की आहे...  

समाजाची मानसिकता आणि बदलते प्रवाह ह्यांचा सर्वात जलद आणि जास्त प्रभाव हा जाहिरात क्षेत्रावर होतो. गेल्या २-४ वर्षांत यातला एक महत्वाचा बदल होतोय तो सोशल मिडीया मार्केटींगमुळे. या क्षेत्रात गेली काही वर्ष इन्फ्लुएन्सर मार्केटिंगला ( Influencer Marketing ) या गोष्टीला भरमसाठ वजन प्राप्त झालंय. 

काय आहे हे नेमकं ते आधी समजून घेऊ. आता समजा आर्टस ऐवजी तुम्ही सायन्स साईड घ्यावी किंवा लग्नाकरिता अमूक एका मुलीला होकार द्यावा. ही तुमच्या आईबाबांची इच्छा तुम्ही ऐकावी असं त्यांना वाटत असेल, तर तुमच्याशी थेट तसं न बोलता, एखाद्या मावशी, मामा करवी किंवा तुमच्यावर प्रभाव असलेल्या एखाद्या भावंडांकरवी या गोष्टी तुम्हाला पटवण्याचा प्रयत्न केला जातो. बऱ्याचदा ही आयुधं लागुही पडतात. याचं कारण म्हणजे काय सांगितलं जातंय, यापेक्षा कोण सांगतंय या गोष्टीला आपल्यालेखी जास्त किंमत आहे. याच आपल्या स्वभावातून ब्रॅण्ड अँम्बॅसेडर ही संकल्पना उदयाला आली. लोकप्रिय चेहऱ्यांचा जाहिरातीत वापर करुन आपलं प्रॉडक्ट विकाणं वर्षानुवर्ष सुरु आहे. ही त्याच्या पुढची पायरी आहे. 

सोशल मिडीयाच्या येण्याने एक भन्नाट गोष्ट घडलीय ती म्हणजे आपले आवडते कलाकार, खेळाडू इतर क्षेत्रातले नामवंत थेट आपल्या संपर्कात आले आहेत, त्यांना आपल्याशी थेट संवाद साधता येतोय. कधी लग्न करतायत, कुठे फिरतायत, कोणत्या चित्रपटाचं शूट सुरु आहे इथपासून ते त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी लाईव्ह स्ट्रिमिंग करून आपल्याला दाखवतात देखील. आपणही घरच्यांपेक्षा 'ह्यांच्याच' जगात जास्त रमायला लागलो आहोत. आपली ही अवस्था बघितल्यावर आपल्यापर्यंत एखादी गोष्ट पोचवायची असेल तर ह्या सेलिब्रिटींपेक्षा चांगला पर्याय दुसरा कुठला असू शकेल? ह्यांची अपलोड केलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही पाहता, वाचता, ऐकता आणि महत्वाचं म्हणजे ती थेट त्यांनीच तुम्हाला सांगितलेली असल्याने इतर कोणत्याही माध्यमापेक्षा ती तुम्हाला जास्त विश्वासार्ह वाटते. म्हणजे एका अर्थी हे लोक तुम्हाला 'प्रभावीत' करु शकतात. म्हणूनच कोणत्याही पारंपारिक पद्धतींच्या जाहिरातीपेक्षा ह्या तुमच्या नव्या नातेवाईकांकरवी एखादी गोष्ट तुम्हाला सांगणं किंवा विकणं जास्त सोपं ठरतं. 

आता विचार करा, जर त्यांच्या दैनंदिनी मध्ये आपल्याला जर एवढा रस असेल तर रोजच्या आयुष्यात ते वापरत असलेल्या गोष्टींबद्दल आम्हाला किती अप्रूप असेल? हेच समाजमाध्यंमाद्वारे आपण रोज पाहतोय. कोण कुठला फोन वापरतोय, कुठल्या हॉटेलमध्ये खातोय. त्यांचे फोटो आणि पोस्टस बघून आम्हीही त्याचं अनुकरण करायला जातो आणि त्यांच्या लयीने आपल्या सवयीदेखील बदलतो, आणि त्याच करता ह्या फोन्स आणि हॉटेलच्या ब्रॅंड्सकडून त्यांना भरभक्कम मोबदला मिळतो.  
आताशा सर्वच ब्रॅण्ड्स ह्या नव्या जाहिरात तंत्राचा वापर करू लागले आहेत, आणि हा मार्ग नक्कीच यशस्वी ठरतोय. 

या सगळ्यात जाहिरात क्षेत्राला फायद्याचा एक नविन शोध लागला असला तरी हळूहळू आपल्या समाजाला मात्र एक भयंकर कीड लागली आहे. कारण आता लोकांना फक्त प्रॉडक्ट्स विकता येण्यापर्यंत याची मर्यादा राहिली नाहीय तर या सेलिब्रींटी मार्फत आता विचारही विकता येतात हा शोध आपल्या राजकारण्यांना लागलाय. हा शोध काही नुकताच लागला असं नाही, कोणत्याही जाहिरात माध्यमाचा वापर करण्यात राजकीय पक्ष अग्रेसर असतात, ह्या प्रभावी माध्यमाचा बेमालूम वापर राजकारणात होत असल्याला देखील आता काही वर्ष झालीत, पण गेल्या आठवड्यात मात्र ह्या सर्व प्रकारांची निर्लज्ज आणि तद्दन धंदेवाईक बाजू समोर आली. एका खाजगी शोधपत्रकारिता करणाऱ्या संस्थेने ऑपरेशन कराओके ह्या नावाने एक 'स्टिंग ऑपरेशन' केलं. ज्यात भारतातील, विशेषतः सिनेक्षेत्रातील अनेक सेलिब्रिटीजना या संस्थेतील लोक भेटले, आपण प्रसिद्धी संस्थांचे प्रतिनिधी असल्याचं त्यांना भासवलं आणि भरपूर पैशांच्या मोबदल्यात वेगवेगळ्या राजकिय पक्षांच्या बाजूने किंवा त्यांच्या विरोधात आपल्या वैयक्तिक सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरुन मतं व्यक्त करण्याची ऑफर त्यांना दिली. आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना बेमालूमपणे या प्रसिद्धी संस्थानी नेमून दिलेला पक्षांचा अजेंडा लोकांसमोर ह्या सेलिब्रिटीजनी मांडायचा असा प्लान ठरला. या गोष्टीला आपल्या काही आवडत्या कलाकारांनी होकार तर दिलाच पण वरुन आपले 'बहुमुल्य' सल्ले देऊन आणि हिशोबातल्या काळ्या-पांढऱ्या पैशांवर चर्चा करुन आपला अतिशय धंदेवाईक चेहरा उघड केला. ती सगळी चर्चा या संस्थेने प्रकाशित केलेल्या व्हिडीओजमधून आपल्याला पहायला मिळतेय. हे व्हिडीओ म्हणजे माहितीच्या युगात आपल्या विरत चाललेल्या समाजवस्त्राचे, सोशल फॅब्रिकचे ढळढळीत पुरावे आहेत. हे पाहताना संताप तर होतोच पण कीवही येते.

या व्हिडीओत काही कलाकार सांगतायत की, आपण ना, व्हिडीओ तयार करतानाच असे करु की ते विश्वसनीय वाटतील, मी तर असा व्हिडीओ करतो की बघणाऱ्याचं रक्त उसळी घेईल. एक गायक तर असंही म्हणाला की अजेंडा तुमचाच असेल पण शब्द माझे असतील म्हणजे ते जास्त विश्वासपात्र वाटेल. हे संभाषण ऐकलं की वाटतं की आता विश्वास नेमका कोणावर आणि कशावर ठेवायचा? नऊ ते दहा कोटींची सहज मागणी करणारे हे (बहुतेक सध्या बेरोजगार असलेले) सेलिब्रीटी आपण पैशांच्या बदल्यात काय विकतोय ह्याचा विचार करण्यापलिकडे गेलेत. जास्त वाईट तर हे आहे की त्यांचे फॉलोअर्स त्यांच्या या `सादरीकरणा`मागे असलेल्या पटकथेबाबत  पूर्णतः अंधारात आहेत. 

आपल्या समोर चमकणाऱ्या या माहितीच्या भाऊगर्दीतली बरीचशी माहिती (अगदी वैयक्तिक मत म्हणून येणारी सुद्धा) ही त्याची किंमत मोजून पसरवली जातेय, आपण सतत वाचत, बघत आणि ऐकत असलेल्यापैकी खरी माहिती कोणती आणि किंमत मोजून दिलेली माहिती कोणती हे समजण्याची कोणतीही सोय दुर्दैवाने आपल्याकडे नाही.

आतापर्यंत जाहिरात ही जाहिरात म्हणून कळत होती. अगदी वर्तमानपत्रामध्ये जाहिरातीची जागा विकत घेऊन त्यात बातमीसदृष्य लेखन केलं तरी कोपऱ्यात advt. छापणं बंधनकारक असतं. पण आता काय? काही वर्षांपुर्वीच आलेल्या एका नव्या कायद्याप्रमाणे तुम्ही एखाद्या प्रोडक्टची जाहिरात करत असाल आणि त्यात कोणतीही खोटी माहिती दिली असेल अथवा ग्राहकांची दिशाभूल करण्यात आली असले तर त्या उत्पादनाची निर्मिती करणाऱ्या कपंनी बरोबरच त्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रीटीलासुद्धा कायदेशिर कारवाईला सामोरे जावे लागेल. पण आता गंमत अशी झालीय की इथं कुठलंच उत्पादन नाही, त्याची कोणतीही जाहिरात नाही, त्याचे निर्माते नाहीत मात्र त्यातून होणारी फसवणूक मात्र अगदी नक्की आहे. या प्रकाराला आळा घालणारी कोणतीही यंत्रणा आपल्या देशात सध्या तरी नाही. 

जेव्हा आपले लाडके सेलिब्रिटी मताची रोख किंमत घेऊन ते विकायला तयार होतात, तेव्हा त्या मतावर आपलं मन ओवाळून टाकणारे कित्येक लोक अक्षरशः मुर्ख ठरतात. या अशा मूर्खांची संख्या काही लाखांमध्ये असू शकते हे विसरुन चालणार नाही.

या सर्व प्रकारात या सेलिब्रीटीजनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, तुम्हाला महिनोंमहिने एखाद्या चित्रपटात राबून सुद्धा जेवढे पैसे मिळत नाहीत त्यापेक्षा जास्त तुम्हाला केवळ एक मेसेज कॉपी पेस्ट करण्याचे मिळतायत. खोट्या का असेना पण एखाद्या प्रसिद्धी संस्थेकडून तुम्हाला तशी ऑफर केली जातेय तर याचा अर्थ तुमच्या मताला तेवढी किंमत आहे. कोणीही सुप्रसिद्ध व्यक्ती ही सर्वप्रथम एक माणूस असते, आणि प्रत्येक माणसाला स्वतःचे मत असते, इतिहासात अनेकदा अशा सुप्रसिद्ध व्यक्तींच्या मतांचा गंभीरपणे विचार करून शासनाने निर्णय घेतले अथवा बदलले आहेत, चांगल्या-वाईट घटनांवर मनोमन व्यक्त होताना ह्या पुढे प्रत्येक अशा सच्च्या माणसाच्या मनात भीती असणार आहे कि माझं मत विकत घेतलेलं आहे असा समज तर होणार नाही ना ? ह्या भीतीतून समाजाला योग्य दिशा देऊ शकणारे आवाजच जर बंद होत गेले तर त्याचा दोष ह्या इतर फुटकळ सेलिब्रिटीजना द्यायचा की समाज माध्यमांना हे ठरवणं कठीण आहे.  

आपल्या उद्धट आणि शिवराळ व्हीडीओ करता प्रसिद्ध असणाऱ्या एका माजी गायकाचे अनेक व्हिडिओज समाज माध्यमांवर व्हायरल होत असतात. त्यात आता त्याने पैसे घेऊन आणखी विखारी व्हिडीओ बनवायची तयारी ह्या स्टिंग ऑपरेशनमध्ये दाखवलीय. आपल्या समाजाला प्रभावित करण्याची क्षमता असणारे असे लोक जेव्हा त्यांच्या ह्या ताकदीचा बाजार मांडायला तयार होतात तेव्हा या प्रभावशाली व्यक्तींद्वारे 'नवा एन्फ्लूएन्झा' पसरवला जायची भीती वाटल्यास ती चुकीची ठरणार नाही.

सहजच व्हायरल होण्याची ताकद असणारे हे ' वैचारिक विषाणू' काही पैशांच्या मोबदल्यात तयार होवू शकतात हे आपल्याला आता कळतंय. त्यामुळे यावर्षी निवडणुकीच्या रणधुमाळीत या आणि आपल्या इतर सर्व लाडक्या सेलीब्रीटीजच्या मतांवरुन आपण आपलं मत ठरवता कामा नये, भलत्याच प्रेमापोटी विकतचं मत जर आपण आपलंसं केलं आणि ते पसरवण्यात मदत केली तर आपली सर्वात मोठी ताकद आपण हरवून बसू. कारण हा 'नवा एन्फ्लूएन्झा' कोणा एकाच्या नाही तर या देशाच्या नशिबी भलताच ताप घेऊन येऊ शकतो आणि त्याचे औषध मिळेपर्यंत कदाचित खूप उशिर झालेला असेल...  
(लेखक माध्यमतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com