ऑनलाईन Vs ऑफलाईन

residentional photo
residentional photo

    काही दिवसांपुर्वी आमची लँडलाईन बंद पडल्यामुळे BSNL च्या ग्राहकसेवा केंद्रात जाण्याचा योग आला. पुसटशी शंका आली की आपण गडबडीत ऑनलाईन बिल भरायला विसरलो तर नाहीये ना? म्हणून एका काऊंटरवर तशी चौकशी केली. त्या कर्मचाऱ्याने त्वरीत सिस्टीममध्ये चेक करुन बिल भरलेले असल्याचे सांगितले; परंतु चालू महिन्याचे बिल जनरेट झाले असून आलाच आहात तर ते भरु शकता असंही सुचविले. तेवढ्यात एक महिला कर्मचारी आतून प्रत्येकाला कसलातरी प्रसाद वाटत बाहेर आली. त्या नुकत्याच तिरुपती बालाजीला जाऊन आल्याचं कळालं. त्या फक्त आपल्या सहकाऱ्यांना प्रसाद देऊन थांबल्या नाहीत, तर रांगेतल्या प्रत्येक अनोळखी माणसाला त्यांनी प्रसाद देऊ केला. कुणा ग्राहकाने 'दर्शन व्यवस्थित झालं ना?' असंही आवर्जुन विचारलं. असो. मी बिल पेड केल्यानंतर कर्मचाऱ्याने मला मागील बाजुस असलेल्या तांत्रिक विभागात जाण्याचे सुचविले आणि मी वायर्सचे जाळे जाळे असलेल्या त्या विभागात गेलो. तिथल्या अँटेंडंटने माझी कंप्लेंट रजिस्टर करुन घेतली. तेवढ्यात तिथे चहा आला म्हणुन मला आपुलकीने चहाही विचारण्यात आला. मी नम्रपणे नकार दिला. नंतर मला एक फोन नंबर देत सांगितले गेले की दुपारी 3 पर्यंत फोन सुरु नाही झाला तर या क्रमांकावर फोन करा. 

     मी तेथुन निघतांना परत प्रथम भेटलेल्या कर्मचाऱ्याचे आभार मानायला गेलो तर त्याने आमचा ब्रॉडबँड, म्हणजेच नेटचा पँक नक्की कोणता आहे हे माझ्याकडून जाणुन घेतले व नवीन प्लँन अधिक कसा परवडेल हे माहितीपत्रक पुरवत मला समजावलं. त्यानुसार माझा दरमहा दोनशे रुपयांचा फायदा होत होता. मी त्यांचे आभार मानले, तर ते म्हणाले... 'अहो आम्ही त्यासाठीच बसलोय. येत जा साहेब.!'

मित्रांनो, 'येत जा साहेब' हे तीन शब्द ऐकले आणि मी क्षणभर स्तब्ध झालो. या शब्दांनी मला अंतर्मुख होण्यास भाग पडले. कारण या दशकामध्ये ऑनलाईन व्यवहारांचे प्रमाण कैक पटींनी वाढले असून टेलिफोन, मोबाईल, इलेक्ट्रिसिटी आदी युटिलिटी बिल्स भरण्याकरता कित्येक लोक ऑनलाईन मार्गाचाच वापर करतात. अर्थात ते अनेक अर्थांनी सोयीचे असते म्हणूनच. परंतु कधी कधी असं वाटतं की सोयीच्या नावाखाली आपण स्वत:ला काही अंशी बंदिस्त तर करुन नाही घेत आहोत ना.? स्वत:ला समाजातील काही घटकांपासुन दूर तर नाही ठेवत आहोत ना? 

खरोखर मी वर अनुभवलेला हा आपलेपणा, काही अंशी असलेला जिव्हाळा ऑनलाईन व्यवहार करतांना अनुभवायला मिळतो का? तिथे फक्त आणि फक्त व्यवहारच असतो आणि तोही 'विथ टर्म्स अँड कंडिशन्स' असा माझा अनुभव आहे.

   आठवून पहा विजबिल वगैरे भरण्याची रांग आणि रांगेतल्या अनोळखी लोकांच्या रंगलेल्या राजकारणावरच्या गप्पा, चालू घडामोडींवरील दिलखुलास चर्चा, क्रिकेट टिमसाठी दिले जात असलेले मुबलक सल्ले वगैरे वगैरे. इथे आपल्याला इतरांच्या तोंडून अनेक विषयांची दुसरी बाजूही जाणायला मिळते; आपले पूर्वग्रह दूर होतात. इतरांकडून विषयाचे विविध पैलु उमजतात आणि अर्थात कीत्ती वेळा छान करमणुक सुध्दा होते. काऊंटरच्या आत बसलेल्या कर्मचाऱ्याकडून विलंब होत असेल तर बाहेरील ग्राहक आपापले विनोदी रुप दर्शवतात. 'झोप लागली का?' विचारले जाते. मग आतुनही आवाज येतो की 'दोनच हात आहेत हो.' मग आपापला नंबर आला की मिश्कीलपणे हसत परतायचे. अशाप्रकारे विविध जातीधर्माचे, पंथांचे, पार्श्वभुमीचे लोक येथे छानपैकी एकत्र आलेले दिसतात. इथेच कधी 'मी आधी आलोय' या मुद्यावरुन भांडणारे लोक दिसले तरी त्यांना समजावणारे, घाई असलेल्याला सहकार्य करणारे लोकही इथे पहायला मिळतात. याठिकाणी निवृत्त झालेले जुने सहकारी आपल्या आठवणींना उजाळा देतांना दिसतात. खुप जणांना बोलावसं वाटत असतं परंतु ज्यांना ऐकायला घरीसुध्दा कुणाला वेळ नसतो त्यांना इथे तो हक्काचा फलाट मिळतो. मनं मोकळी होतात.  
    काऊंटरच्या आतली मंडळी आणि बाहेरची मंडळी यांच्यात दिवसेंदिवस दृढ झालेला स्नेह पहायला मिळतो. आपुलकीने खाजगी चौकशा होतांना दिसतात. असो. 

कबुल आहे की जीवन धकाधकीचं झालं आहे, फावला वेळ दुर्लभ झाला आहे. आवश्यक कामांनाही सवड मिळेनाशी झालीए. त्यात या रांगा कोण आणि कशासाठी पकडणार.? पण मला मात्र येथे आपलेपणा दडला आहे असं वाटतं. येथे समाजाशी चांगल्या तऱ्हेने नाळ जोडल्यासारखी वाटते. ऑनलाईनवरील कोरड्या व्यवहारांपेक्षा ऑफलाईन व्यवहारात भावनेचा ओलावा अनुभवायला मिळतो असंही वाटतं. सोयीनुसार कोणकोणते व्यवहार कशाप्रकारे करावेत हा जरी ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी शक्य असेल तिथे अशा ऑफलाईन व्यवहाराची एक आगळीच मजा असते एवढंच या लेखामार्फत सांगणं आहे. अधुनमधुन काही क्षण रांगेतल्या अनोळखी बांधवांसमवेत घालवले आणि काऊंटरच्या आत बसलेल्या कर्मचाऱ्याला सेवा प्रदान केल्यानंतर स्मित करत धन्यवाद दिले तर भले काही बोनस पॉईंट आपल्या बँक खात्यावर जमा होणार नाहीत, परंतु असं भरपुर काही मिळू शकेल जे पैसै देऊनही कदापी विकत मिळणार नाही. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com