निरागसतेची कमाल

residentional photo
residentional photo

    मनामध्ये इतरांप्रति प्रेम, दया करुणा असली पाहिजे याची सोदाहरण चर्चा प्रत्येक सत्संगामध्ये होताना दिसुन येते. शालेय अभ्यासक्रमात गोष्टीस्वरुपातुन याबाबत पाठ समाविष्ट केलेले असतात जेणेकरुन कोवळ्या वयातच मुलांवर आवश्यक ते संस्कार केले जाऊ शकतात. पण सत्संग तर सोडाच, साधं प्राथमिक शाळेत जाण्याचं देखील ज्याचं वय झालेलं नाहीए त्याने आपल्या वर्तनातुन प्रेम, दया, करुणा म्हणजे नेमकं काय ? याचा आदर्शपाठ घालुन दिला असेल तर ते नक्कीच अनुकरणीय आहे ना.? 
    

मिझोरम मध्ये घडलेली ही एक सत्य घटना आहे. अवघ्या तिन-चार वर्षांचा एक बालक संध्याकाळी आपल्या घरासमोर सायकल खेळत होता. सोबतीला त्याचे इतर मित्रही त्यांच्या त्यांच्या सायकलवर खेळत होते. हर्षोल्हासाने हा खेळ चालू असतानाच एक अगदी छोटसं भांबावलेलं कोंबडीचं पिल्लू या बालकाच्या सायकलच्या चाकाखाली आलं आणि जखमी झालं. त्या ईवल्याशा पिल्लाचा आक्रोश या बालकाला काही पाहवला गेला नाही. त्याच्या कोवळ्या हृदयाचं पाणी पाणी झालं. आता नेमकं काय करावं ? हे त्या निरागस जिवाला त्वरीत उमजलं नाही.पण तो धावत धावत आपल्या घरात गेला. कुणीतरी खाऊसाठी दिलेले आणि जमवलेले पैसे घेऊन बाहेर आला आणि त्या जखमी पिल्लाला घेऊन तडक जवळच असलेल्या क्लिनिक मध्ये गेला. पिल्लाला पटकन बरं करा अशी रडवेल्या चेहऱ्याने डॉक्टरांना विनवणी करु लागला. या बालकाच्या अंतरी असलेला निरागसपणा पाहून तिथे उपस्थित असलेल्या पेशंट्सचे देखील डोळे पाणावले. त्यापैकीच एकाने या गुणी बालकाचा हा फोटो टिपला आहे आणि ही मनामनाला भिडणारी घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे.
   

वाचकहो, ते पिल्लू वाचले की दगावले हे कळायला मार्ग नाही, परंतु या निष्पाप निरागस बालकाची कृती मात्र आपल्याला खूप मोठा संदेश देऊन जाते एवढं मात्र खरं. पोलिसांचा त्रास नको, इतर डोकेदुखी नको म्हणून अपघात करुन पळून जाणारे लोकही या जगात कमी नाहीत; जेव्हा रस्त्यावर अपघातग्रस्त मानवी जीव जगण्यासाठी तडफडत असतो.! परंतु रस्त्यावरच्या कोंबडीच्या जखमी पिल्लाप्रति असलेले हे प्रेम, ही दया, करुणा ज्या निरागस मुलाच्या वर्तनातून दिसुन येते त्याला खरोखर किती दुःख झालं असेल तथा पिल्लाप्रति काळजी वाटत असेल हे या छायाचित्रातील त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी स्पष्ट करतात. तसेच एका हातात पैसे घेऊन दवाखान्यात दाखल झालेला हा भाबडा बालक भावनेबरोबरच व्यवहारही चांगलाच जाणतो हे सुद्धा स्पष्ट होते. कारण अर्थात डॉक्टरने पैसे घेतले नसतीलच, पण ही 'व्यवहार' जाणणारी दुनिया आहे हे या कोवळ्या वयातील मुलालाही चांगलंच ठाऊक आहे हे त्याच्या कृतीतुन दिसुन येतं. 


   या प्रसंगामुळे सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या एका सुंदर विचाराचं स्मरण झालं. ते असं म्हणतात की 'If a child comes into your life, it's not time to teach, It's time to learn.' म्हणजेच लहान मूल आपल्या आयुष्यात येतं तेव्हा त्याला काही शिकविण्याची वेळ नसते, तर त्याच्याकडून शिकून घेण्याची वेळ असते.' 
पटतंय ना.?

post.rajeshagni@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com