madhuri-misal.jpg
madhuri-misal.jpg

Vidhansabha 2019 : 'वहिनीं'पुढे आव्हान वाढत्या कुटुंबाचे ! 


विधानसभा 2019 : खासदार गिरीश बापट, माजी खासदार अनिल शिरोळे, माजी शहराध्यक्ष योगेश गोगावले या पुणे भाजपच्या पहिल्या फळीकडून आता शहराची सूत्रे दुसऱ्या फळीच्या हाती आली आहेत. गेल्या पाच वर्षांत पूर्णपणे बदललेल्या सत्ताधारी भाजपमध्ये नव्या कार्यकर्त्यांसोबतच, नेतृत्वाची नवी पिढी कार्यरत झाल्याने पक्षाची जबाबदारी वाढली आहे. कुटुंब वाढले की ते एकत्र ठेवण्याची, सत्ता आली की ते सांभाळण्याची कसरत करावी लागते. हीच कसरत आता भाजप कार्यकर्त्यांच्या "वहिनीं'ना अर्थात नव्या शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांना करावी लागणार आहे. 

देशपातळीवर भाजप बदलला. सत्तेपर्यंत पोचला. ही सारी स्थित्यंतरे आणि बदलांचे पडसाद पुण्यात उमटले. पुणेकरांचा कौल हा देशपातळीवरील जनमानसाचे प्रतिबिंब ठरला. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीतील विजय, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शहरातील आठही जागांवर मिळालेला विजय, पुणे महापालिकेत शंभर नगरसेवकांसह मिळालेला दणदणीत विजय आणि त्यानंतर 2019 च्या लोकसभेत पुन्हा एकदा सव्वातीन लाख मताधिक्‍याने मिळालेला विजय पुण्यातील भाजपच्या यशाचा चढता आलेख दाखविणारा आहे. आता दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाला सामोरे जावे लागणार आहे. या निवडणुकीत मागील यश कायम राखण्याचे आव्हान पक्षासमोर असणार आहे. पक्ष वाढला की कार्यकर्ते वाढतात, साहजिकच त्यांच्या अपेक्षाही वाढतात. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नेतृत्वाचा कस लागतो. हाच कस नव्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांचा लागेल. मोठ्या आशा-अपेक्षा घेऊन पक्षात आलेले नवे कार्यकर्ते आणि पक्ष शून्यात असताना तो भरभराटीपर्यंत पोचेपर्यंत योगदान दिलेले ज्येष्ठ नेते-कार्यकर्ते यांची योग्य सांगड घालून पक्षाची आगामी घोडदौड त्यांना कायम ठेवावी लागणार आहे. 

पुणे महापालिकेत भाजपचे 100 नगरसेवक आहेत, त्यातील 20 ते 25 जण हे दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा महापालिकेत निवडून आले आहेत. आता त्यांना "आमदार' व्हायचे आहे, विद्यमान आमदारांना पुढील पाच वर्षे हवी आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण मिळाल्यानंतर महिला नेतृत्वाची पिढी तयार झाली आहे. माधुरी मिसाळ, आमदार मेधा कुलकर्णी, महापौर मुक्ता टिळक याच पिढीचे नेतृत्व करतात. अशीच संधी आणखी काही महिला कार्यकर्त्यांना हवी आहे. अशावेळी योग्य तो सत्तासमतोल राखण्याची आवश्‍यकता असते, हा समतोल पुण्यात कसा राखला जाणार, याबाबत उत्सुकता आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्यात व पुण्यात सत्तेत असताना खासदार वंदना चव्हाण यांनी शहराध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. पक्षबांधणीचे नवनवे प्रयोग त्यांनी केले. 80 च्या दशकात ऍड. शालिनी राणे यांनी शहर कॉंग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले होते. 2004 मध्ये पुणे महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा संगीता देवकर यांनीही शहर कॉंग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेतृत्व केले. आता सत्ताधारी भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिसाळ यांच्याकडे आली आहे. मिसाळ यांना महापालिका आणि विधानसभा अशा दोन्ही ठिकाणचा अनुभव आहे. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा चांगला संच आहे. कसबा आणि पर्वती अशा दोन विधानसभा मतदारसंघांत त्यांचा प्रभाव आहे. त्याचा फायदा निश्‍चितच शहर पातळीवर काम करताना होईल. 

नागरिकांच्या भाजपकडून मोठ्या अपेक्षा आहेत. महापालिकेतील यंत्रणा अधिक वेगवान करण्याची गरज आहे. राज्य, केंद्र सरकार आणि पक्षसंघटना अशी सांगड घालून प्रश्‍न सोडविण्यावर भर द्यावा लागेल. यासाठी "वहिनीं'ना "भाऊं'शी योग्य समन्वय साधत काम करावे लागणार हे नक्की ! 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com