भारतीय संविधान आचरणीय ग्रंथ 

satish maske
satish maske

भारतीय संविधान हा जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ असून, समग्र भारतीयांच्या मानवी कल्याणाचा विचार त्यात आहे. संविधानाची श्रेष्ठता, मूल्यात्मकता, त्याची उदार व्यापकता व कल्याणकारकता, ही प्रत्येक भारतीय नागरिकाने समजून घेत आचरण करणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. संविधान हा ग्रंथ पूजनीय नाही, तर आचरणीय ग्रंथ आहे... 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला 26 नोव्हेंबर 1949 ला मान्यता मिळाली. म्हणून हा दिवस "भारतीय संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक माणसाने संविधान समजून घेत आचरण करणे गरजेचे आहे. संविधानाचे आचरण करणे म्हणजे नेमके काय करणे, हेही समजून घेणे गरजेचे आहे. मी जसा स्वतंत्र आहे, तसाच दुसराही स्वतंत्र आहे असे वागणे; स्वतःबद्दलचा अहंकार, न्यूनगंड सोडणे; सर्व माणसे सारखी आहेत तसे वर्तन करणे; स्वःमनातला सर्व प्रकारचा विषमतावाद उखडून टाकणे; भेदभाव फेकून देणे; स्वतःच्या स्वार्थाचे व हिंसक प्रवृत्तीचे विसर्जन करणे; जात- धर्म- पंथाच्या संकुचित कुंपणातून बाहेर येणे; मानवतावादी बनणे; खऱ्याने वागणे; न्यायाने वागणे; शोषण न करणे; भ्रष्टाचार न करणे; राष्ट्रनिष्ठ बनणे; बुद्धिवादी, विज्ञानवादी, समतावादी बनणे; भारतीय आणि भारतीयांचा आदर करणे; राष्ट्रध्वज राष्ट्रगीताचा आदर करणे; संविधान मूल्यांच्या आचरणाने व्यक्ती सुधारते, राष्ट्र सुधारते, म्हणून प्रत्येकाने संविधानाचे आचरण करणे फार गरजेचे आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान समितीवर निवडून येण्यासाठी फार प्रयत्न केले होते. डॉ. बाबासाहेबांना आपल्या देशांमधल्या कोट्यवधी लोकांच्या भवितव्याचा प्रश्न सोडवायचा होता. त्यांच्याकडे लक्ष द्यायचे होते, म्हणून ते समितीवर निवडून येणे महत्त्वाचे होते. संविधानात एकूण 395 कलम अंतर्भूत केली आहेत. अनेक जाती- पोटजाती, भाषा- संस्कृती, गरिबी, श्रीमंती या सगळ्यांचा विचार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील शंभर- सव्वाशे कोटी लोकांना एकाच सूत्रात गोवले. भारतीय संविधान हे समताधिष्ठित आहे. वर्ण वर्चस्ववादाविरुद्ध आहे. म्हणूनच या संविधानाविरुद्ध आग ओकली जाते, हे संविधान नाकारण्याचा प्रयत्न केला जातो. संविधानाबद्दल उलटसुलट चर्चा केली जाते. खरे पाहिले, तर तसे नाही. 
या संविधानाबद्दल डॉ. बाबासाहेब म्हणाले होते, "जर या घटनेतील कुठले कलम असे आहे, की ज्याशिवाय ती घटना शून्यवत होईल? असा प्रश्न कुणी विचारला, तर या कलमांकडे मी बोट दाखवीन. हे कलम म्हणजे या घटनेचा प्राण आहे. आत्मा आहे.' म्हणून भारतीय संविधान हे अतिशय चांगले आहे. माणसाला माणूसपण मिळवून देणारे आहे. सर्वांना समान वागणूक देणारे, सर्वांचे हित जोपासणारे आहे; परंतु संविधान राबविणारी, चालवणारी जी माणसे आहेत; ती कुठेतरी स्वार्थासाठी, संविधानाचा गैरवापर करताना दिसतात. 26 जानेवारीला भारताने लोकशाहीचा स्वीकार केला. सगळ्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाचे तत्त्व आले. ज्यांना माणूस म्हणून जगू दिले जात नव्हते, मानवी अधिकार नाकारले होते, शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते, विषमतेने वागवले जात होते, त्या सर्वांना संविधानामुळे चपराक बसली. त्यामुळे अनेकांचे जीवन बदलले. प्रगतिपथावर वाटचाल करू लागले. जात-धर्म, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, आपला-परका, याला कुठेही थारा नव्हता. त्यामुळेच माणूस प्रगती करू लागला. चंद्र, सूर्यावर जाऊ लागला. कारण, संविधानाने सगळ्यांना अधिकार दिला. आज देशांमधला सामान्यातला सामान्य माणूस केवळ आणि केवळ संविधानामुळेच सुखी आहे, हे लक्षात घ्यायला हवे. म्हणून संविधानाचे महत्त्व ओळखून त्याची जपणूक करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. 

- प्रा. डॉ. सतीश मस्के 
(लेखक हे साक्री तालुक्‍यातील पिंपळनेर येथील कर्मवीर आ. मा. पाटील वरिष्ठ महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com