प्रतिभाताई शरद पवार : वटवृक्षाची सावली

Pratibha Sharad Pawar
Pratibha Sharad Pawar

शरदराव नावाच्या वटवृक्षाची सावली आहेत प्रतिभाताई. प्रतिभाताईंचा जन्म 13 डिसेंबर 1948चा. पुण्यातील सदुभाऊ शिंदे हे क्रिकेटर होते. सदुभाऊंना एकूण चार मुली. त्यातील प्रतिभाताई सर्वात थोरल्या. ताईंचे शिक्षण सुरु असतानाच वडील वारले. नियतीचा हा आघात अजाणत्या वयात प्रतिभाताईंना सहन करावा लागला.

1 ऑगस्ट 1967 रोजी प्रतिभाताईंचा शरदरावांशी विवाह झाला. शारदाबाई आणि गोविंदराव या पुरोगामी विचारांच्या, समाजकारण, राजकारणाशी निगडीत असणाऱ्या कुटूंबामध्ये सहावी सून म्हणून प्रतिभाताई आल्या. शारदाबाईंनी चौदा वर्षे लोकल बोर्डाचे कामकाज सक्षमपणे हाताळले होते. शेती करणे, मुलांचे संगोपन, लोकल बोर्डच्या माध्यमातून समाजोपयोगी कामे, सत्यशोधक चळवळीमध्ये सहभाग, कर्मवीर भाऊरावांच्या रयत शिक्षण संस्थेला मदत, शेतकरी कामगार पक्षातर्फे राजकारणात सहभाग अशा विविधांगी व्यक्तिमत्वाचे पैलू लाभलेल्या शारदाबाईंच्या प्रतिभाताई सून. मुळातच पवार कुटूंब शिस्तप्रिय. पारंपारिकतेबरोबरच आधुनिकता जपणारे. प्रतिभाताई मनमिळाऊ, शांत, सौजन्यशील. विवाहानंतर थोड्याच अवधीत त्यांनी सर्व कुटूंबाला आपलेसे केले. शरदराव व प्रतिभाताई या दांपत्याची सुप्रिया ही एकुलती एक कन्या. आताच्या खासदार सुप्रियाताई सुळे. पण प्रतिभाताईंनी सुप्रिया ही एकमेव कन्या कधीही मानले नाही. तर घरातील सर्व मुला-मुलींना स्वतःच्या मुलांसमान मायेची पाखर घातली. सुसंस्कारित केले. त्यांनी कुटूंबाची एकसंघता जपण्याकडे सातत्याने लक्ष दिले. त्यातीलच एक नियम म्हणजे सर्व कुटूंब दिवाळीला एकत्र असते. त्यांचे स्वतःचे राहणीमान अतिशय साधे असले तरी सर्व मुलांना त्यांची कायम शिकवण असते की, "मोठमोठी स्वप्ने बघा. छोटा आणि फक्त स्वतःपुरता विचार करु नका. प्रगल्भ आणि विकसीत जगा.''

त्या स्वतः कार ड्रायव्हिंग करतात. शरदराव मुख्यमंत्री असताना एकदा प्रतिभाताई स्वतः ड्रायव्हिंग करीत होत्या. चुकून त्यांनी गाडी "नो पार्किंग झोन'मध्ये लावली. पोलिस मामांनी येऊन दंड आकारला. प्रतिभाताईंनी दंड चुकविण्यासाठी कोणतीही ओळख दाखविली नाही की कोणालाही फोन केला नाही. चुक मान्य करुन दंड भरला.

मोठ्याचा मान राखणे, आदर करणे यातही प्रतिभाताईंचे वेगळेपण सामावलेले आहे. मोठ्या जावा, नणंदा, वयोवृद्ध व्यक्तींना त्या दिसताक्षणीच वाकून नमस्कार करतात. मोठ्यांचा मान मोठ्यांना देतातच. निवडणुकीच्या दरम्यान, सासूबाई म्हणजे शारदाबाईंच्या मैत्रिणीकडे आवर्जून जातात, भेटतात. त्यांची विचारपूस करतात. जुनी जाणती मंडळी जपण्याकडे त्यांचा नेहमी कटाक्ष असतो. तसेच कुटूंबातील कोणत्या व्यक्तीला नेमके काय पाहिजे हे प्रतिभाताई अचुकपणे हेरतात.

कोणीही कधीही अचानकपणे त्यांच्या घरी गेले तरी जेवल्याशिवाय परतत नाही. घरात कामवीाल बाई, नोकर नसतील तर स्वतः लवकर उठून न कुरकुरता घरातील सर्व कामे करतात. शरदराव आणि प्रतिभाताई असे फक्त दोघेच कोठे फिरायला गेलेत असे कधीही झाले नाही. शरदरावांच्या मित्रापैकी अथवा पुतण्यापैकी असे कोणी ना कोणी त्यांच्या बरोबर असतातच. म्हणजे फक्त "मी, माझे पती न्‌ माझे कुटूंब' अशा संकुतिच दृष्टीने प्रतिभाताईंनी कधीही पाहिलेले नाही. कुटूंबातील सर्व जणही कोणतीही गोष्ट सर्वप्रथम ताईंना सांगितल्याशिवाय राहात नाही. त्यांच्याबद्दल पुतण्या-पुतणे अतिशय आदरपूर्वक आणि अभिमानाने बोलतात. त्यांच्यासाठी या प्रतिभाताई पवार कुटूंबाला लाभलेल्या "देवाची देणगी' आहेत. स्वतःच्या संपूर्ण कुटूंबाची काळजीपूर्वक देखभाल करताना शरदरावांच्या तब्येतीकडेही त्या अतिशय काळजीपूर्वक लक्ष घालतात. एका मोठ्या आजाराने शरदरावांना गाठल्यानंतर प्रतिभाताईंनी त्यांची सर्वतोपरी काळजी तर घेतलीच. पण मोलाचा सल्ला दिला की, "माणसांना भेटणे, फिरणे बंद करु नका. कारण तेच तुमच्या तब्येचीसाठीचे सर्वात मोठे टॉनिक आहे.''

अशाही परिस्थितीत एवढ्या धीरोदात्तपणे व विचारपूर्वक असा निर्णय घेण्याचे कौशल्य केवळ एकमेवाद्वितीय प्रतिभाताईच दाखवू शकतात. वटवृक्षांच्या फांद्या-पाने जरी पसरलेले दिसत असले तरी मूळ जमीनीत असते. मातीच्या कणखरमुळेच वृक्ष तग धरु शकतो. सावली देखील कायम जमीनीवरच असते.

त्या स्वतःचीही तब्येत तितक्‍याच काळजीने जपतात. व्यग्र दिनक्रमातून वेळ काढून रोज सकाळी योगा करतात. सायंकाळी फिरायला जातात. आळस, थकवा, कंटाळा, चिडचिड, आदळआपट हे शब्द त्यांच्या दिनक्रमाच्या अथवा जीवनक्रमाच्या डिक्‍सनरीत शोधूनही सापडणार नाहीत. याऊलट कार्यातील सातत्य, नियमितता, शिस्त, उत्साह, तत्परता हेच त्यांच्या स्वभावाचे स्थायीभाव आहेत.

शरदरावांनी देर व राज्य पातळीवरील राजकारण व सत्तेच्या माध्यमातून मोठमोठी पदे उपभोगली. पण प्रतिभाताईंनी या पदांचा दुरुपयोग करीत कधीही सार्वजनिक आयुष्यात टेंभा मिरवला नाही ही सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ गोष्ट आहे. आणि हीच शिकवण कुटूंबातील इतरांनाही दिली. त्या कायमच राजकीय घडामोडीपासून सार्वजनिक जीवनापासून तटस्थ, अलिप्त, प्रसिद्धीपराडःमुख राहिल्या आहेत. आताच्या स्त्रीशक्तीचा जागर मांडणाऱ्या व म्हणवणाऱ्या स्त्रियासाठी प्रतिभाताईंचे समर्पित आणि संयमी आयुष्य हा फार मोठा आदर्श आहे. इतके तटस्थ, व्रतस्थ राहणे सोपे नक्कीच नाही. अविरत पण अनासक्त कर्मसाधना करणे हे केवळ कर्मयोग्यांचेच काम! प्रतिभाताई या एक कर्मयोगिनीच आहेत.

तत्व सांगणे सोपे असते. आचरणात आणणे अवघड असते. आचरणात आणलेली तत्त्वे अंगवळणी पडणे अधिकच अवघड. साध्या राहणीचे, प्रसिद्धीपराडमुख राहून उच्च विचारसरणीचे, तटस्थ वृत्तीने व्रतस्थ जीवन जगण्याचे तत्व प्रतिभाताई केवळ दुसऱ्यांना सांगत नाहीत तर स्वतः आचरतात. वटवृक्षांच्या सावलीचा आसरा थकला, भागला वाटसरु घेत असतो. तेव्हा ती सावली हा माझा, तो परका असा दुजाभाव मुळीच करीत नाही. सावली ही वृक्षाची कायमस्वरुपी सोबती तर असतेच. पण इतरांसाठी देखील प्रेमळ कृपाछत्र, ममतेची साथ आणि निर्मळ, सुखद सहदयता असते. प्रगल्भ आणि संपन्न व्यक्तिमत्वाच्या प्रतिभाताई या अवघ्या पवार कुटूंबासाठी सुखदुःख, श्रमपरिहाराचे हक्काचे आश्रयस्थान तर नक्कीच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com