esakal | पाण्यातुन चाललात तर हा होईल फायदा...
sakal

बोलून बातमी शोधा

benefit of walk through the water

पाण्यातुन चाललात तर हा होईल फायदा...

sakal_logo
By
विजय वेदपाठक

   थंडी सरत आहे. थंडीत मस्तपैकी तुम्ही आरोग्यदायी चालण्याचा आनंद घेतला असेल. आता उन्हाळा सुरू होत आहे. आरोग्यासाठी व्यायाम बदल करण्याची इच्छा असेल तर तुम्ही पाण्यातून चालण्याचा आनंद घेऊ शकता. पाश्‍चात्त्य देशात आता ट्रेंड रुजतो आहे. 
खुल्या हवेत चालण्यापेक्षा पाण्यातून चालणे, हे शरीराला अधिक लाभदायी ठरते, असे स्पष्ट होत आहे. पाण्याची घनता हवेपेक्षा अधिक आहे. त्यामुळे खुल्या हवेत व्यायामापेक्षा पाण्यात व्यायाम करताना अधिक ऊर्जेची गरज असते. त्यामुळे तुमची कॅलरीज अधिक जळतात. त्याचे फायदे संपूर्ण शरीराला मिळतात. पाण्यातून चालणे हा कमी प्रभावाचा व्यायाम आहे. त्यामुळे तुमची सांधे, हाडांसाठी तो अधिक सुरक्षित आहे. अगदी गर्भवती, दुखापतीतून बाहेर पडणारे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, अगदी प्रथमतः व्यायाम सुरू करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरतो. साधारणतः चार वर्षांपूर्वी अमेरिकेत झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले, की मोकळ्या हवेत चालण्यापेक्षा पाण्यात चालताना तुमच्या हृदयाची स्पंदने वाढतात. परिणामी तुमच्या हृदय आणि फुफ्पुसांना अधिक व्यायाम मिळतो आणि तुमचे ऑक्‍सिजन आत घेण्याची क्षमता वाढते. रक्तदाब कमी करण्यासही तो उपयुक्त ठरतो. कण्याशी संबंधित आजारातही असा व्यायाम उपयुक्त ठरतो. 

कसे चालाल !

  •  कमरे इतक्‍या पाण्यातून चालण्याची सुरवात करा.
  •  तुमचे शरीर सरळ ठेवा. पुढे किंवा मागे वाकू नका.
  •  जेवढा लांब पाय टाकता येईल तेवढा टाकून चाला. 
  •  चालताना तुमचे दोन्ही हात संलचनासारखे मागे पुढे करा.
  •  व्यायामाची सवय झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने छातीपर्यंत पाणी या स्थितीपर्यंत टप्पा वाढवत न्या
  •  अंदाज घेत घेत फेऱ्यांची संख्या वाढवा. 
  •  एकदा याचा चांगला सराव झाला, की गुडघे उचलून चालण्याचा प्रयोग सुरू करा 
  •  त्यानंतर तुम्ही दोन्ही बाजूंनी चालण्याचा सराव करू शकता
  •  पुढचा टप्पा म्हणजे चालण्यापेक्षा पाण्यात ३० सेकंद जॉगिंग करणे, त्यानंतर ३० सेकंद पळणे.
  •  त्यापूर्वी मात्र एकदा चालण्याचा सराव करा म्हणजे जॉगिंग किंवा पळताना लचक भरणार नाही.

काय काळजी घ्यावी !

व्यायाम सुरू करण्याआधी गरजेनुसार पाणी प्या. पाण्यात व्यायाम करताना कदाचित किती घाम जाईल, याचा अंदाज बांधणे कठीण होईल. घसरण्याच्या जागा आवर्जून टाळा. टोकदार भाग, फुटलेली फरशी किंवा तत्सम भाग टाळून चाला. पाण्यात वापरण्याचे शूज वापरले तर अधिक उपयुक्त ठरतात. कुठलाही अवयव दुखतो आहे, असे लक्षात येताच व्यायाम थांबवा. पोहता येत नसेल तर लाईफ जॅकेट घाला. पाण्यातून चालणे हा उत्तम व्यायाम आहे. तो हृदयाला बळकटी देणारा आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढविणारा आहे. तुमचे स्नायू पिळदार करणारा आहे. तुमची चरबी नष्ट करताना या व्यायामात कुठेही हाडे किंवा सांध्यावर ताण येत नाही. बघा, तुमच्या जवळील पोहण्याच्या तलावात या व्यायाम प्रकाराचा आनंद घेता येतो का ?

loading image