Buddha Purnima
Buddha Purnimasakal

Buddha Purnima 2022 : बुद्धविचार, समतेचा सेतू बांधणारा!

बुद्धांचा विचार द्वेषभावनेतून बाहेर काढतो

बुद्धांचा विचार द्वेषभावनेतून बाहेर काढतो. बुद्ध माणसांच्‍या हृदयाला, मस्‍तकाला जोडणारा समतेचा सेतू आहे. त्‍या सेतूवरून जर आपण प्रवास केला, तर कल्‍याणाच्‍या उच्‍च शिखरापर्यंत पोचू शकू, असे बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे सांगतात. आजच्या (ता.१६) बुद्धपौर्णिमेनिमित्त त्यांनी ‘सकाळ’चे संजय शिंदे यांच्याशी साधलेला संवाद.

प्रश्न : बुद्ध विचारांकडे तुम्ही कसे आकर्षित झाला?

डॉ. साळुंखे : लहानपणी अभ्यासक्रमात बुद्धांविषयी काही जुजबी माहिती असायची; पण बुद्धांच्या खऱ्या अभ्यासाला जी सुरुवात झाली ती १९६३ मध्‍ये. महाविद्यालयात द्वितीय वर्ष बीएला असताना आम्‍हाला तत्त्वज्ञान विषय होता. त्यामध्‍ये एक पेपर भारतीय तत्त्‍वज्ञानाचा आणि दुसरा पाश्‍‍चात्य तत्त्वज्ञानाचा असायचा. भारतीय तत्त्वज्ञानात सुरुवातीला चार्वाक, जैन आणि बुद्ध या तीन दर्शनांचा अभ्‍यास असे. त्‍यावेळेला त्‍या अभ्‍यासाच्‍या निमित्ताने माझा बुद्धांशी परिचय झाला. कारण त्‍या अभ्‍यासक्रमात असंख्‍य प्रकारचे विचार प्रवाह मला वाचण्‍याची संधी मिळाली. विविध संप्रदायाची मते अनुभवता आली. एका दृष्‍टीने बुद्धांचा सखोल असा संस्‍कार माझ्‍यावर झाला. मला १९८७ च्‍या सुमारास ‘नागार्जुन’ या इंग्रजी ग्रंथाचे भाषांतर करण्‍याची संधी मिळाली. ते बौद्धतत्त्ववेत्ते होते. तेथे बुद्धांशी अधिक परिचय झाला. पुढच्‍या काळात चार्वाकावर लिहिताना बौद्ध तत्त्ववेत्यांशी मला चर्चा करता आली. संत तुकारामांवर लिहिताना त्‍यांच्‍यावर बुद्धांचा प्रभाव आहे, हे जाणवले. बुद्धांविषयी मला ओढच निर्माण झाली. ‘सर्वोत्तम भूमिपुत्र गोतम बुद्ध’ हे पुस्तक लिहिताना तिपिटकांचा आणि बुद्धांवर लिहिलेल्‍या पाली, संस्‍कृत, इंग्रजी, हिंदी, मराठीतील विविध ग्रंथांचा अभ्‍यास करता आला. त्‍यामधून बुद्धांना समजून घेण्‍याचा, त्‍यांच्‍या अधिकाधिक जवळ जाण्‍याचा प्रयत्‍न केला. अशारीतीने बुद्धांकडे माझा प्रवास सुरू झाला, तो इथपर्यंत पोचला आहे.

प्रश्न : देशाच्या सध्याच्या स्थितीत बुद्धांचे विचार कोणत्या दृष्टीने मार्गदर्शक आहेत?

- आपल्‍याकडे फार प्राचीन काळापासून माणसांमाणसांमध्‍ये भेद निर्माण करणारी, विषमतेचा बळ देणारी वर्णव्‍यवस्‍था निर्माण झाली; पण ती निर्माण होतानाच त्‍याच काळात विषमतेला विरोध करणाऱ्या एका विचार प्रवाहाने वर्ण व्‍यवस्‍थेला अगदी प्राचीन काळात विरोध केलेला दिसतो. पुढच्‍या काळात जातीव्‍यवस्‍था निर्माण झाली. जातीव्‍यवस्‍थेलाही विरोध करणारा प्रवाह त्‍या काळात निर्माण झाला, म्‍हणून चार्वाक असो, बुद्ध असो त्‍यांनी वर्णव्‍यवस्‍था, जातीय व्‍यवस्‍थेला विरोध केलेला दिसतो. पुढच्‍या काळात अनेकांनी हा विचार वाढीला लावला. आधुनिक काळात भारताची स्‍थिती पाहिली तर आता बहुतेक जण जातीचे निर्मूलन झाले पाहिजे, असे म्‍हणत असताना आचरणात मात्र, जातीत दुरावा, दरी निर्माण करत आहेत, असे जाणवते. जातीव्‍यवस्‍थेमुळे निर्माण झालेली अस्‍पृश्‍‍यतेसारखी अनिष्ट प्रथा समाजातून बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे; परंतु आता वेगवेगळ्या कारणाने जातीजातींमध्ये केवळ दुरावाच नव्‍हे; तर काही वेळा तिरस्‍कार, तुच्‍छता, निंदा करण्‍याची भावना दिसते. या भावनेचे द्वेषात रूपांतर झाल्‍याचे जाणवते. हितसंबंध गुंतलेले लोक त्याला खतपाणी घालताहेत. आपण सगळी माणसे समान आहोत, या भूमिकेवर भारतीय लोकांनी यावे, अशी दिशा पकडलेली होती; परंतु काहीवेळा भरकटत आहे. आपण उलट्या दिशेने जातो की काय, असे वाटते. ही बाब क्‍लेशदायक आहे. अशावेळी बुद्धांचा समतेचा उपदेश, विचारच आपल्‍याला तारणार आहे. बुद्धांचा उपदेश आपल्‍याला द्वेषातून बाहेर काढणारा आहे, असे मला वाटते. बुद्धांचा द्वेष सोडा हा उपदेश हितकारक, कल्‍याणकारक आहे, असे मला वाटते. बुद्धांनी समाजातील, माणसामाणसांतील दरी दूर करण्‍याचा मनापासून प्रयत्‍न केला होता. त्‍यासाठी प्रत्‍यक्ष कृती केली होती. म्‍हणून आज आपल्‍याला समाजातील दुरावा नष्‍ट करायचा असेल, माणसांना जोडायचे असेल तर बुद्ध हे सर्वात मार्गदर्शक ठरतात. बुद्ध माणसांच्‍या हृदयाला, मस्‍तकाला जोडणारे एक समतेचा सेतू आहेत. त्‍या सेतूवरून जर आपण प्रवास केला, तर कल्‍याणाच्‍या उच्‍च शिखरापर्यंत पोचू शकू.

प्रश्न : भारताबाहेरही जगात लोक बुद्धांकडे कोणत्या दृष्टीने पाहतात?

- जगामध्‍ये युरोप, अमेरिका, ऑस्‍ट्रेलियातील लोकांना बुद्धांविषयी आकर्षण वाटत आहे. ते आकर्षण वेगवेगळ्या प्रकाराचे आहे. वैज्ञानिक वैज्ञानिक दृष्‍टीने आकर्षित झाले. मानसशास्त्रज्ञ मानसशास्त्राच्या अंगाने आकर्षित झाले. आधुनिक काळात समाजशास्‍त्रज्ञ, विचारवंत, सामान्‍य लोक त्‍यांनाही आपल्‍या कल्‍याणासाठी बुद्धविचार अतिशय मार्गदर्शक आहेत, हे जाणवत आहे. जगभरातच बुद्धांच्‍या विचारांची आवश्‍‍यकता वाटत आहे. विशेषत: हिंसाचार, युद्ध, दुरावा या गोष्‍टी वाढत असताना बुद्धांचा विचार उपयोगी पडतो, असे वाटते. भौतिकवादामागे न लागता आपण आपले आचरण चांगले, भावना चांगली ठेवणे गरजेचे असल्याचे लोकांना वाटत आहे. हे जगाच्या दृष्‍टीने आशादायक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com