ऐकशील थोडं माझं..??

साक्षी साळुंखे (सातारा)
बुधवार, 20 मे 2020

अनुभव हा असा गुरु आहे की त्याच्या परीक्षा आयुष्यात प्रत्येकाला द्याव्या लागतात आणि त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. म्हणून तू खुशाल संकटात पड, खुशाल अनुभव घे आणि निडरपणे जगायला शिक..! आणि हो माझी इच्छा आहे की, बाळा प्रत्येक गोष्ट तू जाणीवपुर्वक करावी. कारण, जाणीव असल्याशिवाय कोणत्याही प्रसंगाला समर्थपणा येत नाही.

लुटुलुटु रांगत-रांगत जेव्हा तू घरातून फिरायचीस, तुझे ते बोबडे बोल ऐकून सगळा शीण माझा निघून जायचा. कशी निघून गेली इतकी वर्षे कळालंच नाही. मलाही अन्‌ तुलाही... पण, फार बदल होत गेला का गं तुझ्यात? काय वाटतं तुला? नाही म्हणजे आधी जो बाबा तुला कोणीतरी खूप चांगला हिरो वाटायचा; अगदी त्याच्याशिवाय तुझं पान हलायचं नाही. पण आता तुझ्या मनात कोणती धाकधूक वाटतेय? नाही कदाचित माझेच गैरसमज असतील बाळा, हे सगळे..! 

नाही गं, काळजी वाटते... थोड्या काही मर्यादा तुला मी पाळायला लावल्या तर तुझ्या मनात माझ्याबद्दल राग तर नाही ना येणार? त्या मर्यादा तुला बंधनं नाहीत ना वाटणार? अगं तु त्या भगवंताचं दिलेलं एक फुल आहेस. माझ्या बागेतलं... की मला त्याची थोड्या कालावधीसाठी तळहाताच्या फोडाप्रमाणं सेवा करायची आहे. मी फक्त एक माळी आहे त्याचा... कारण ते फुल कधी ना कधी दुसऱ्याच्या हातात मला सुअवस्थेत द्यायचं आहे. 

बाळा तुला दुःख व्हावं, तुला त्रास व्हावा असा काहीच माझा उद्देश नाही. पण तु म्हणजे तव्यावरची पोळी आहेस... जिला चटके बसतात हे मी जाणतो. पण पोळी तव्यावर आहे मग तिला ते सहन करावं लागणार. कारण तिला परत मोडता येणार नाही. पोळपाटाच्या पोळीला कशीही मोडून परत करता येतं..! मग आता तुझ्या लक्षात आलं असेल लहानपणी तुला मी हव्या त्या गोष्टी देत होतो, म्हणजे आत्ताही देतो. पण आता त्या गोष्टींसोबत काही शिकवणी पण तुझ्या आचरणात आल्या पाहिजेत ना. तुला वाटत असेल बाबा सारखा मला रोखत असतो. सारखा म्हणतो वेळेचं भान ठेव. वेळेत घरी ये आणि अजून बरंच काही. पण मी तुला अगदीच पिंजऱ्यात नाही ना गं ठेवत. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात आणि कोणत्याही भूमिकेपर्यंत पोचण्याआधी मला असं वाटतं की तू त्या दोन्हींही बाजू लक्षात घ्यायला हव्यात. 

तुला ते पूर्ण स्वातंत्र्य आहे. जे कोणत्याही मुलीला तिच्या जन्मापासून मिळायला हवं. पण याचा अर्थ असा नव्हे की त्या स्वातंत्र्याचा वापर तू निष्काळजीने करायचा. एक लक्षात घे बाळा. मी तुला कधीच म्हणणार नाही. तु माझा अनुभव ऐक. आम्ही असं केलंय. मग तुही असंच कर. असंच जग... कारण, काहीही झालं तरी अनुभव हा असा गुरु आहे की त्याच्या परीक्षा आयुष्यात प्रत्येकाला द्याव्या लागतात आणि त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. म्हणून तू खुशाल संकटात पड, खुशाल अनुभव घे आणि निडरपणे जगायला शिक..! आणि हो माझी इच्छा आहे की, प्रत्येक गोष्ट तू जाणीव पुर्वक करावी. कारण, जाणीव असल्याशिवाय कोणत्याही प्रसंगाला अथवा गोष्टीला समर्थपणा येत नाही. मी जरी तुला हे सांगत असलो तरी तुझ्या आयुष्याच्या गाडीचा रुळावरचा प्रवास तुझा तुला करायचा आहे. 

तुझ्या आयुष्यात अनेक प्रसंग येतील. जिथे तुझ्या मनाची घालमेल होईल. योग्य- अयोग्य एकाच तराजूत तुझ्याकडून तोललं जाईल किंवा जशी तू आत्ता वागतेस अगदी तसं..! दहा तोंडाचा विचार करता करता तू स्वतः मुळ काय आहेस हे विसरु नकोस बाळा... शांत होऊन मार्ग निघतोच, प्रत्येक गोष्टीचा..! मान्य आहे मला, एका ठरावीक वयात या गोष्टी होतातच आणि त्या माझ्यासोबतही झाल्या होत्या. पण जे काही होतं ना ते नेहमी चांगल्यासाठीच होत असतं..!! अगं बाळा, माझ्या आयुष्यात किती तरी असे प्रसंग आहेत, की ज्यामध्ये अश्रुंचे लोट माझ्या पापण्यांच्या काठांना स्पर्श सुद्धा करत नाहीत. पण मी ते कधीच बोलून दाखवलं नाही. याचा अर्थ असा नव्हे की मला कधी दुःख होत नाही. एखादा बाका प्रसंग आलाच तर चुकून तुमचा धीर सुटू नये, तुम्ही नीट राहावं म्हणून मी मोकळेपणानं रडूही शकत नाही गं... 
कारण, मी रडलो तर तुम्ही ढळून जाल, याची भीती माझ्या मनात असते. 
असो तो विषय सोड. पण तू मला एक वचन दे, की तू मी शिकवलेल्या गोष्टी नीट लक्षात ठेवशील आणि अभिमानानी नाही तर स्वाभिमानाने जगशील..!! 
तुझाच लाडका, 
बाबा. 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या