लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी विशेष... लोकमान्यांचे वैचारिक होकायंत्र.... 

प्रदीपकुमार माने 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

लोकमान्यांचे योगदान इतर बहुतांशी गीताभाष्यकारांनीही गौरविले आहे. लोकमान्यांनी "गीतारहस्य' लिहीत असताना भारतीय विचार परंपरेप्रमाणे मिल, कान्ट, स्पेन्सर, शोपेनहॉर अशा पाश्‍चिमात्य तत्त्वचिंतकांचाही आढावा घेतला आहे

कुठलाही राष्ट्रपुरुष किंवा महापुरुष आपल्याला प्रेरणा देणाऱ्या विचारप्रणालीवर आपल्या कार्याची मांडणी करत असतो. प्रेरणा देणारी विचारप्रणाली जर भूतकाळातली असेल तर तिला कशा पद्धतीने मांडायचे याविषयी त्या महापुरुषासमोर विविध पर्याय उभे राहतात. एक तर तिचे पुनरुज्जीवन करणे किंवा तिची कालसुसंगत मांडणी करणे. कालसुसंगत मांडणी करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या प्राचीन प्रणालीवर भाष्य करावे लागते किंवा लिहावे लागते.

भारतीय परंपरेचा विचार करता ही भाष्य लिहिण्याची परंपरा आपणाला प्रकर्षाने दिसून येते. लोकमान्य टिळकांचा आपण विचार करतो तेव्हा आपणास लक्षात येते की, देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न करणारे ते महापुरुष होते. त्यांचे राजकीय क्षेत्रातील कार्य इतके महत्त्वाचे आहे की, स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे कार्य "टिळकयुग' म्हणून ओळखले जाते. राजकारणात इतके असामान्य कार्य करणाऱ्या टिळकांबाबतीत एक प्रश्‍न आपणास पडणे साहजिक आहे, की कुठल्या विचारप्रणालीच्या आधारे त्यांनी आपल्या कार्याची मांडणी केली असेल? उत्तर आहे, गीतेच्या. "गीतारहस्य' हा त्यांचा ग्रंथ गीतेवर केलेले समकालीन भाष्य आहे.

हिंदू परंपरा मानणारे महापुरुष साहजिकपणे गीतेवर भाष्य करायला वळतात. विवेकानंद, गांधी, अरविंद ही काही उदाहरणे. टिळकही याच गटातले. पण एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी गीतेवर केलेले भाष्य इतर महापुरुषांच्या तुलनेत केलेले सविस्तर भाष्य आहे. "गीतारहस्य' हे फक्त एक भाष्यच नाही तर टिळकांच्या वैचारिक मांडणीचे आणि कार्याचे "होकायंत्र' आहे, असे म्हटले तरी चालेल. ""कर्तव्याची दिङ्‌मूढता आली असताना आणि अंतःकरण अस्वस्थ झाले असता धर्मबुद्धी जागृत ठेवून कर्तव्याची योग्य दिशा दाखविणारा ग्रंथ जगाच्या वाङ्‌मयात श्रीमद्‌ भगवद्‌गीता हाच एक होय.'' हे लोकमान्यांचे मनोगत ते श्री भगवद्‌गीतेकडे कशा दृष्टीने पाहतात याची साक्ष आहे.

दादासाहेब खापर्डे यांनी लोकमान्यांसाठी श्रीमद्‌ भगवद्‌गीता त्यांच्या कार्याचे दिशादिग्दर्शन करणारे होकायंत्र कसे होते, हे लोकमान्यांचे चरित्र सांगत असताना सांगितले आहे. वेदनिर्णयकाल ठरविणारा त्यांचा "ओरायन' हा ग्रंथ आणि वेदस्थान ठरविणारा ग्रंथ "आर्क्‍टिक होम ऑफ वेदाज्‌' या ग्रंथातून लोकमान्यांतील वेदसंशोधक समजून येतो. पण त्यांच्या जीवनाचे मूलभूत तत्त्वज्ञान समजून घ्यावयाचे असेल तर आपणाला गीतारहस्याकडे पाहावे लागते. तत्त्वज्ञ म्हणून केलेली त्यांची मांडणी समजून घ्यावयाची असेल तर "गीतारहस्य' समजून घ्यावे लागते. आता काही जणांना हा प्रश्‍न पडणे साहजिक आहे, की भारतीय दर्शन परंपरेत "भाष्यकार' हा नवीन मांडणी करत नाही, मग त्याला तत्त्वज्ञ कसे म्हणता येईल? भाष्य परंपरेला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर सुरुवातीला आपणाला असेच वाटते. पण इथे आपण हे समजून घेणे गरजेचे आहे की, खरा भाष्यकार हा फक्त आपली विचारपरंपरा दृढ करीत नाही तर प्रत्यक्षपणे, अप्रत्यक्षपणे, जाणतेपणी, अजाणतेपणी परंपरेची पुनर्मांडणीही करत असतो. हे करत असताना तो त्या विचारपरंपरेत भर घालत असतो, थोड्याफार प्रमाणात तिचं विस्तारीकरण करत असतो.

लोकमान्यांच्या गीतारहस्याकडे त्याच दृष्टीने पाहावे लागेल. श्रीमद्‌ भगवद्‌गीतेची मांडणी करत असताना ती मूलतः ज्ञानप्रधान आहे, निवृत्तीप्रधान आहे, ही दृष्टी खोडून काढायचा त्यांनी प्रयत्न केला आहे. युक्ती हे गीतेचे ध्येय ते नाकारत नाहीत; पण तिची कर्मप्रधान मांडणी करतात. लोकमान्यांचे हे योगदान इतर बहुतांशी गीताभाष्यकारांनीही गौरविले आहे. लोकमान्यांनी "गीतारहस्य' लिहीत असताना भारतीय विचार परंपरेप्रमाणे मिल, कान्ट, स्पेन्सर, शोपेनहॉर अशा पाश्‍चिमात्य तत्त्वचिंतकांचाही आढावा घेतला आहे आणि त्याची चिकित्सा केली आहे. असे करून त्यांनी गीतेवर समकालीन भाष्य केले आहे. गीतारहस्यातील त्यांची सर्व मते स्वीकारार्ह असतील असे नाही; पण त्यांनी केलेली कर्मयोगाची मूलभूत मांडणी महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या विचारविश्‍वाचा विचार करता गीतारहस्यातली त्यांची मांडणी हा त्यांच्या जीवनाला दिशादर्शन करणारे होकायंत्र आहे, यात शंकाच नाही.

संपादन - अर्चना बनगे

इतर ब्लॉग्स