पश्‍चात्ताप करण्यापेक्षा आताच दक्षतेची गरज

client case parents story by rahul patil
client case parents story by rahul patil

जुळ्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू. दोन भावांचा चिरेखाणीत अंत. पहिली घटना सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्दची तर दुसरी सिंधुदुर्गातील वझरेची. लागोपाठ दोन दिवसांच्या अंतराने घडलेल्या या दोन्हीही घटना हृदय पिळवटून टाकणाऱ्या. अंगणात बागडणारी निष्पाप ‘फुलपाखरे’ अचानक नाहीशी झाली. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. हल्ली अशा एक ना अनेक गंभीर घटना घडू लागल्या आहेत. याबाबत पालकांनी सतर्क राहणे तेवढेच महत्त्वाचे आहे.


लहान मुले ही देवाघरची फुले, असे म्हटले जाते. बालपण हा कोर्स किंवा क्‍लास नाही. तो प्रत्येक लहान मुलाचा निर्भर, निरागस हक्क आहे. गोंडस बालके घरात असतात तेव्हा जग विसरून त्यांच्यात रमण्यात जो आनंद असतो त्याची उपमा दुसऱ्या कशालाही देता येणार नाही. जेव्हा ती बोबड्या वाणीने कुतूहल भरलेले प्रश्न विचारतात तेव्हा किती सुंदर वाटतात आणि त्यांच्याशी त्याच वाणीत बोलायला किती छान वाटतं...


अनेकदा चिमुकले पालकांचा डोळा चुकवून खेळायला घराबाहेर पडतात. तर अनेक जण सुटीसाठी पै-पाहुण्यांकडे जातात. तेथे खेळता खेळता अशा काही विपरीत घटना घडतात, की त्या त्यांच्या जीवावर बेततात. मग त्या अपघाताच्या असो, की अन्य काही. नाशिकच्या बिडी कामगार नगरमधील एक घटना अशीच. घरामध्ये ओढणीने तयार केलेल्या झुल्यावर झोके घेताना गळफास लागून मुलाचा मृत्यू झाला होता. त्या वेळी त्याच्या आई-वडिलांनी फोडलेला हंबरडा काळजाला भिडणारा होता. मुले मस्ती करतात. त्यांचे ते वयच असते; पण पालकांकडून नकळत होणारे दुर्लक्ष त्यांच्या जीवावर बेतते, हे या घटनेवरून प्रकर्षाने जाणवते.


शिक्षणानिमित्ताने मुले बराच काळ घराबाहेर असतात म्हणून पालकांना त्यांच्यातील हूडपणा जाणवत नाही. सध्या कोरोनाच्या जागतिक संकटामुळे शाळा ‘लॉकडाउन’ झाल्या. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न असल्याने त्या कधी सुरू होतील, याबाबत अद्याप प्रश्‍नचिन्ह आहे. अशात मुले गृहबंदिस्त असून त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे. काही शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग अवलंबल्याने काही जण व्यग्र आहेत.

काहींनी कलाकुसरीत मन रमवले आहे. कित्येक जण व्यायामाकडे लक्ष देताहेत तर काही जण खेळताना, टेरेसवर पतंग उडवताना नजरेस पडत आहेत. पालकत्वाचा प्रवास हा अनुभवांचा खजिना असतो. रोजच्या जगण्यात सोबतीला चिंताही असतेच, जिची तीव्रता रोज वाढत जाते. संकटे सांगून येत नसतात. आपले पाल्य सुरक्षित राहावे यासाठी पालकांनी दक्ष राहण्याची नितांत गरज आहे. कारण पुन्हा पश्‍चात्ताप करण्यापेक्षा आताच सावध झालेले बरे.

संपादन - अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com