
अमेरिकेतील जॉर्जिया राज्याची राजधानी एटलांटा. जगप्रसिद्ध पेय कोका कोलाचे हे माहेरघर, तसेच, अमेरिकेच्या भांडवलशाहीचे मंदीर होय. जुलैमध्ये त्याच्या मुख्यालयाला भेट दिली, तेव्हा या पेयाबाबत उद्बोधक व मनोरंजक माहिती समजली.
कोका कोलाचा इतिहास, स्वादाचा गुप्त फॉर्मयुला जपून ठेवणारा अभेद्य व्हॉल्ट, निरनिराळ्या देशातील कोको कोलाच्या चढत्या विक्रीची आकडेवारी, कोको कोलाच्या भव्य बाटल्यांचे प्रदर्शन पाहण्यास रोज हजारो लोक येथे येतात. या ‘मंदिराचे’ पूर्ण दर्शन घेण्यास किमान तीन ते चार तास लागतात. शेवटी असते ते कोको कोलाच्या असंख्य भेट वस्तूंचे दुकान. तुमचे नाव दिल्यास कोको कोलाच्या लाल टीनवर छापून ते क्षणार्धात तुम्हाला दिले जाते, ते घरातील संग्राह्य वस्तूंबरोबर ठेवण्यासाठी. कोको कोलाच्या मुख्यालयाचे नाव ‘वर्ल्ड ऑफ कोका कोला’ असे आहे.