कंपासपेटी 

Compass
Compass

त्याला विसरून गेलो. मुद्दाम नव्हे, खरंच विसरून गेलो... पूर्वी तो आणि मी अतूट. एकमेकांचे पंख बनून स्वैर. त्या वेळी कुठं वाटलं होतं, एवढंच आयुष्य मर्यादित असतं... त्याच्या-माझ्या जगण्यापलीकडंही खूप काही असंल वेगळं, हे विचारात यायचंच नाही. मैत्री नव्हती ती. अजब अनाकलनीय गुंतवण, वीण. त्या वेळी घट्ट वाटलेली. काळ पुढे सरकला. मनात असो की नसो, तो मोठा झाला, मीही. नैसर्गिक ऊर्मीचे अवकाश बदलले, त्याचे व माझेही. संवादासाठी, निरर्थक बडबडीसाठी रस्त्याकडील ट्यूबलाईटच्या खाली तासन्‌तास थांबणारे आमचे रस्ते, कधी दुभंगले कळलंच नाही. शाळा बदलल्या, मार्ग बदलले, त्याच्याबरोबर घालवलेली चार वर्षे- हळूहळू काळाआड गेली. कुठं आहे तो? काय करतोय? याची उत्सुकताही नाही. आता असेल कुठंतरी! भांडण नाही. गैरसमज नाही. तरीही वीण सैलावली... का आपापले आयुष्य, आव्हाने, संसार इतके व्यस्त झाले? त्याच्यासारखंच कोणी हेल काढून बोललं की क्षणभर तो दार उघडून आत येतो मनात. पण, लगेचच जातो. त्याच्यासारखंच भांग पाडण्याआधी कंगव्यावर वरून खाली अंगठा फिरविताना कोणी पाहिलं की त्याची ती सवय झर्रकन येते समोर... आठवतो त्याचा आवाज.... वहीच्या मागच्या पानावर हिरव्या स्केचपेननं त्यानं काढलेलं महंमद रफींचं चित्र. प्रेमरोग चित्रपटाचं वर्णन. आणि त्यानंतर आईला वडिलांनी कूकरनं कसं मारलं ते! तो-त्याचा तो हेल निघणारा आवाज. सायकलीच्या सीटखाली दडविलेली रंगीत वायर. कंपासात असणारी रेडियमची अक्षरं... खूप सारं देऊन तो गेलाय... एका अशाच शनिवारी शाळा सुटल्यानंतर, विजेच्या खांबावर चढलेल्या तंत्रज्ञाची करामत पाहताना, ट्यूबलाईट कशी बदलततात, हे पाहताना त्यानं उच्चारलेलं वाक्‍य, "करंट सायंकाळी येणार बघ' लक्षात ठेवलं मी. करंट, फॉस्फरस, दांडगावा असे त्याने दिलेले शब्द. माझ्या जिभेने उचलले... नंतर त्याचा संपर्क झाला नाही... कंपासपेटीच हरवली नंतर.. कोन बदलले, अंतरे बदलली, जगण्याची मापे, अंश बदलले... तो दूर गेलाय. 

काय असतं नेमकं तळात? जे उसळून- अकल्पित, अनाहुतपणे बाहेर येतं? त्याच्या-माझ्या मैत्रीचं असं कोणतं टोक- कुठल्या गाठीनं अचानक पुन्हा कंपासबाहेर राहिलं? 

जगण्याच्या प्रवासात अनेक जण भेटतात. स्नेह जडतो. नवे पाडाव, नवे रस्ते, नव्या गरजा-जाणिवा... मग भूतकाळाच्या परिघावरचे असे अनेक ठिपके अचानक फेर धरतात... डावपेच. फायदा-तोटा, कपटकारस्थानं, असूद्या, वाद-विवाद यांनी नंतर जग भरून जातं... आपण नाकारलं तरी जगण्याचं वेडवाकडं-असुरी-क्रूर लोहचुंबक खेचून घेतंच... बालपणातले असे काही खजिने मात्र आठवणींच्या किल्लीनेच उघडतात. 

लाखो रुपये खिशात जरी असले, तरी या खजिन्याची किल्ली असणारा श्रीमंत ठरतो. ही श्रीमंती असते- दिलखुलास मैत्रीची. ही श्रीमंती- ज्याची-त्याची. चेहरे-ओळखी अस्पष्ट होत जातात. धूसर नव्हे... अगदी दूर जातात. पण, हे असं वेचलेलं बालपण सामोरं येताना स्पष्टतेची गरजच राहत नाही. आकारात मावत नसणारी ती भावना... आठवणींची बाकं बडवत-बडवत दंगामस्ती सुरू करते. सुटीत खेळताना-फुटलेला गुडघा, फुंकर मारायला धावलेले सवंगडी, पेनात शाई भरताना शर्टावरचा निळा ढग, आठवणींचे आभाळ गडद करून जातो... 

त्याचा शोध घेणं खूप सोपं आहे. तरीही काही दारं बंद असावीतच ना? तो सापडेल. बोलेल. तसाच हेल काढून... पांढऱ्या दाढीवर हात फिरवेल कदाचित किंवा चष्मा काढून डोळे पुसेल. सायकलवरच असेल कदाचित किंवा कोट्यवधींच्या गाडीतून उतरेल, सुटाबुटात! पण त्या भेटीत तो कोणीतरी असेल- यशस्वी किंवा हरवलेला. हरलेला किंवा हरवणारा. कदाचित तो "फॉस्फरस' असं नीट उच्चारेल, "करंट' म्हणणार नाही- पॉवर म्हणेल... आणि इथेच मग बंद असणारी कंपासपेटी कायमचीच हरवली जाईल... आतील रेडियमची रंगीबेरंगी अक्षरं अंधारातच राहिलेली बरी. माझ्या मनात फेर धरलेली. पुनः-पुन्हा माझ्याचसाठी लकाकणारी! 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com