शेतकऱ्याचं राबणं सुरूच !

अमरसिंह घोरपडे
शुक्रवार, 22 मे 2020

लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात शिरोळ तालुक्‍यात शेतात तयार झालेल्या भाजीचे करायचे काय, असा प्रश्‍न होता. कारण गाव सोडून भाजी कोठेही विकता येत नव्हती.

कोरोनामुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले; परंतु एक व्यवसाय नेमाने सुरू राहिला तो म्हणजे शेती. या कोरोनामध्ये शेतकरी थांबला नाही. त्याने शेतातील कामे सुरूच ठेवली. शिरोळ तालुका हा भाजीपाल्यांमध्ये आघाडीवर. गेल्या वर्षभरात पाणीटंचाई, महापूर, कोरोना यांसारख्या कारणांनी भाजीपाल्यांची शेती तोट्यात आली; परंतु शिरोळ तालुक्‍यातील शेतकरी डगमगला नाही. त्याने पुन्हा भाजीपाला उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील असे काहीजणच यापासून दूर राहिले. ते वाट पाहताहेत; परंतु बहुतांश शेतकरी म्हणतो लॉकडाउन उठले नाही तर त्यावेळी पाहू. लोकांना मोफत देऊ; पण ते उठणार नाही असे समजून केलेच नाही आणि उठले तर त्यावेळी काय करायचे. त्यावेळी पश्‍चाताप करण्यापेक्षा आता धाडस करणेच योग्य आहे.

लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात शिरोळ तालुक्‍यात शेतात तयार झालेल्या भाजीचे करायचे काय, असा प्रश्‍न होता. कारण गाव सोडून भाजी कोठेही विकता येत नव्हती. दानोळीतील एका शेतकऱ्याचे टोमॅटोचे उत्पादन आले; परंतु मालाला उठाव नसल्याने तो तसाच शेतात होता. यावर त्या शेतकऱ्याने आसपासच्या गल्लीतील लोकांना दोन दिवस मोफत वाटप केले. लोक खाऊ देत अशीच त्यांची त्या मागे भावना होती. सध्या लॉकडाउन शिथिल झाले आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्याच्या विविध भागांबरोबरच सांगली जिल्ह्यातही शेतकरी भाजी विक्रीसाठी नेत आहेत. अद्याप पुणे, मुंबई येथील बाजारात माल जात नाही. कारण तेथील व्यापाऱ्यांकडून अद्याप मागणी नाही आणि शेतकरी तेथे जाऊन विकू शकत नाही अशी स्थिती आहे. हॉटेल बंद असल्याने तीही विक्री थांबली आहे; परंतु हे सर्व असूनही शिरोळ तालुक्‍यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतपत शेतकरी सोडले तर सर्वांनी भाजीपाला लागवड केली आहे. त्यांना आशा आहे की, आपले उत्पन्न सुरू होईपर्यंत सर्व काही सुरळीत होईल. त्यातून जो काही तोटा झाला तो काही प्रमाणात भरून निघेल. यासंदर्भात दानोळी येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी दीपक व उदय अलमाने म्हणतात, आम्ही नेहमी भाजीपाल्याचे उत्पादन घेतो.

सध्या शेतात 60 टन कोबी महिनाभरापासून पडून आहे. सध्या काकडी सुरू असून स्थानिक बाजारपेठेचा थोडा आधार आहे. लॉकडाउनच्या सुरवातीला ढोबळी मिरची लावली आहे. ती पुढील आठवड्यात सुरू होईल. दीड महिन्यापूर्वी फ्लॉवर लावले आहे, तेही सुरू होईल. आठवड्यापूर्वी कारल्यांची लावण केली आहे. लॉकडाउन वाढतच आहे. पुढे काय होणार माहीत नाही. उत्पादन घेणं आम्हाला माहीत आहे. लोक जगले पाहिजेत, याच भावनेनं हे सगळे करीत आहोत. 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या