लालपरीच्या मालवाहतूक सेवेचा बोलबाला..!

महेश गावडे
Wednesday, 9 September 2020

सर्वसामान्यांना एसटीचा नेहमीच आधार राहिला आहे. एसटीचा प्रवास सुरक्षित व सुखाचा मानला जातो.

समांतर प्रवासी वाहतूक, बुलावडाव, सुस्थितीतील गाड्यांचा प्रश्‍न आदींचा सदोदित सामना करणाऱ्या एसटीला कोरोना संसर्गामुळे बॅकफूटवर नेले होते. कोरोनामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा बंद झाली. त्यात सर्वाधिक तोटा संकटात सापडलेल्या एसटीचाच झाला. या पार्श्‍वभूमीवर एसटीने आहे त्या साधनांचा वापर करून एसटीतून मालवाहतुकीची सेवा देत या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आहे.

बुडत्याला काडीचा आधार, या म्हणीप्रमाणेच एसटीला या सेवेने मोठा आधार दिला. कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन काळात एसटीवरही प्रवासीसंख्येच्या रूपाने मर्यादा व बंधने आली असताना एसटीने मालवाहतुकीची सेवा सुरू केली. कोल्हापूर विभागातील एसटीच्या मालगाड्यांतून तीन महिन्यांत ८८० फेऱ्यांच्या माध्यमातून ४५ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. उल्लेखनीय म्हणजे या सेवेस मिळणारा प्रतिसाद महिन्यागणिक वाढत असून उत्पन्नातही भरघोस वाढ होत आहे, हे सुचिन्हच.

सर्वसामान्यांना एसटीचा नेहमीच आधार राहिला आहे. एसटीचा प्रवास सुरक्षित व सुखाचा मानला जातो. एसटी आज दुर्गम भागात व खेडोपाड्यात जाऊन पोहोचली आहे. अनेक संकटांचा, आव्हानांचा सामना एसटीला वेळोवेळी करावा लागतोय. आंदोलनात, रास्ता रोको, बंदमध्ये सर्वप्रथम एसटीला लक्ष्य केले जाते. आधीच एसटीसमोर समांतर प्रवासी वाहतुकीचे आव्हान आहे. गाड्यांच्या मेंटेनन्सचा प्रश्‍न, कर्मचाऱ्यांचे पगार, तोट्यातील मार्गावर चालवण्यात येणाऱ्या फेऱ्या, प्रवासी सेवेसाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना अशा प्रकारे एसटीवर संकटांची मालिका सुरू आहे. या संकटांच्या गर्तेतून बाहेर पडण्याचा एसटी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून एसटीने अधिकाधिक सेवावृत्तीतून मालवाहतुकीची सेवा अमलात आणली.

या वर्षी १ जून २०२० पासून या सेवेला प्रारंभ झाला. कोल्हापूर विभागातील १२ डेपोतून ही सेवा दिली जात आहे. १२ डेपोमध्ये सर्वाधिक फेऱ्या कोल्हापूर, कागल व गडहिंग्लज आगारातून झाल्या असून या तीन डेपोंनी इतर डेपोंच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न मिळवले आहे. जिल्ह्यातून मुंबई, पुणे, चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडी, वेंगुर्ला, नागपूर, बुलढाणा, सोलापूर या ठिकाणी मालवाहतुकीची सेवा दिली. मालवाहतुकीत प्रामुख्याने खत, सिमेंट, सोयाबीन, घरबांधणीसाठी चिरे, तांदूळ यांची वाहतूक करण्यात आली आहे. बाहेरील दरापेक्षा निम्म्या दरात एसटीचा मालट्रक उपलब्ध होत असल्याने शेतकरी, व्यापारी, कारखानदार व व्यावसायिकांची आर्थिक बचतही होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १२ डेपोंमधील ३० एसटी गाड्यांतून ही सेवा दिली जात असून एसटीच्या मालवाहतुकीला वाढता प्रतिसाद लक्षात घेता, गाड्यांची संख्या आणखी वाढवण्यात येणार असल्याचे एसटी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

संपादन - अर्चना बनगे

इतर ब्लॉग्स