कोरोनाचा वार झेललेला युरोप आता सावरतोय...

संजय उपाध्ये
Sunday, 31 May 2020

इटलीने तर हातच टेकले होते. देशाच्या पंतप्रधानांनीच हताश होत 'आता देवच इटलीला वाचवू शकतो', असे सांगत आपली अगतिकता जगासमोर मांडली होती आणि येथेच युरोपवर कोणते संकट आलेले आहे, हे जगाला समजले.

जगात चीननंतर सर्वात आधी "कोरोना'च्या संसर्गाचा आणि त्यानंतर भयंकर जीवितहानीचा वार झेललेला युरोप हळूहळू सावरत आहे. डिसेंबर-जानेवारीमध्ये एकेक रुग्ण युरोपातील इटलीत आढळून येऊ लागला. सुरुवातीला साहजिकच त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले; पण इटली, स्पेन, फ्रान्स, इंग्लड, जर्मनी, बेल्जियम, नेदरलॅंड आणि इतर युरोपीय देशात रुग्णांची संख्या वेगाने वाढत गेली. ही संख्या इतकी प्रचंड होती की, इटलीने तर हातच टेकले होते. देशाच्या पंतप्रधानांनीच हताश होत 'आता देवच इटलीला वाचवू शकतो', असे सांगत आपली अगतिकता जगासमोर मांडली होती आणि येथेच युरोपवर कोणते संकट आलेले आहे, हे जगाला समजले. त्यानंतर स्पेन, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, बेल्जियम, नेदरलॅंड हे देशही त्याच वाटेने गेले.

युरोपातील इटली, स्पेन, फ्रान्स, इंग्लड या देशांना मात्र मोठा फटका बसला. तर कोरोनाचा कहर ओळखून जर्मनी, बेल्जियम आणि नेदरलॅंड लगोलग हालचाली करत उपचार, विलगीकरण, औषधांची उपलब्धता करून दिली. तसेच तज्ज्ञ डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांची फौजच उभी केली. त्याशिवाय त्या देशात असलेली आरोग्याबद्दलची जागरुकता, सुसज्ज रुग्णालये या गोष्टीही तारकच ठरल्याचे दिसून येत आहे.
स्पेनमध्ये येणाऱ्या पर्यटक, प्रवासी, विविध देशांचे अधिकारी आणि इतरांना एक जुलैपासून चौदा दिवसांचा क्वारंटाईन न करण्याचा निर्णय घेतला आहे. एकट्या स्पेन या देशात वर्षाला तब्बल आठ कोटी पर्यटक भेट देतात. इंग्लडनेही आता आठ जूनपासूनच पर्यटक, प्रवाशांना क्वारंटाईन न करण्याचे ठरविले आहे.

जर्मनी युरोपातील एकतीस देशात जाणाऱ्या ट्रॅव्हल्स पंधरा जूनपासून सुरू करणार आहे. इतर देश आपल्या परीने जागरुक राहात निर्णय घेत आहेत. तेही एक धाडसच म्हणावे लागेल. कारण कोरोना विषाणू तथा कोविड-19 ने आतापर्यंत नुसत्या युरोपातच दीड लाखापेक्षा अधिक बळी घेतले आहेत. आणखी काही लाख नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अत्यवस्थ असलेल्या काही नागरिकांच्या जीवनाची इतिश्री होईल; पण आता कोरोनाचा वार युरोपसाठी भूतकाळ झाला. दोन्ही जागतिक महायुद्धे ही युरोपने अनुभवली आहेत. त्यानंतर कदाचित कोरोनाचे हे फार मोठे संकट आले होते. ते परतवून लावण्यात अख्खा युरोप यशस्वी ठरल्याचे सध्या तरी दिसत आहे. यातूनच पुन्हा युरोप विकासाच्या आघाडीकडे झेप घेईल.

  • कोरोनाबाबत युरोपावर एक नजर
  • इटली, स्पेन, इंग्लड, फ्रान्सला मोठा दणका
  • जर्मनी, बेल्जियम, नेदरलॅंड वेळीच सावध
  • सर्वच देशांत आरोग्याच्या सुविधा, सुसज्ज रुग्णालये
  • तज्ज्ञ डॉक्‍टर्स, सावधगिरीमुळेच धोका दूर  

 

इतर ब्लॉग्स