प्रयोगशाळेत कोरोना विषाणू जगला तब्बल २८ दिवस !

संजय उपाध्ये
Tuesday, 13 October 2020

कोरोना विषाणू तब्बल २८ दिवस जगू शकतो, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे साऱ्यांचीच काळजी वाढली आहे.

कोल्हापूर : कोविड-१९ तथा कोरोना विषाणूच्या मगरमिठीतून जगाची कधी सुटका होणार, याची नागरिकांबरोबरच तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, संशोधकांना चिंता लागून राहिली आहे. पुरते जग व्यापलेल्या कोरोना विषाणूबाबत नवनवीन माहितीही बाहेर येत आहे. आता नव्या संशोधनानुसार, कोरोना विषाणू तब्बल २८ दिवस जगू शकतो, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे साऱ्यांचीच काळजी वाढली आहे.

ऑस्ट्रेलियातील राष्ट्रीय विज्ञान संस्था सीएसआयआरओने कोविड-१९ तथा कोरोना विषाणू संदर्भात नुकतेच संशोधन केले आहे. संस्थेने आपल्या संशोधनात कोरोना विषाणू चलनी नोट, काच आणि स्टीलवर तब्बल २८ दिवस राहत असल्याचे सांगून परत एकदा संपूर्ण जगाला बुचकळ्यात पाडले आहे. त्याबरोबरच मुलायम पृष्ठभाग असलेले प्लास्टिक, मोबाईल स्क्रीनवर हा विषाणू अनेक दिवस राहू शकतो, असेही म्हटले आहे. हे संशोधन जर्मन व्हायरोलॉजीमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

कोरोना विषाणू किती दिवस जगू शकतो, याबाबत जगभर संशोधन सुरू आहे. त्यानुसार ऑस्ट्रेलियातील संस्थेने हे संशोधन केले आहे. प्रयोगशाळेतील अंधारात हा प्रयोग करण्यात आला आणि प्रयोगशाळेचे तापमान २० अंश होते. त्यावेळी तो विषाणू २८ दिवस ‘जगल्याचे’ दिसून आले. सूर्यप्रकाशातील अतिनील (अल्ट्रा व्हायलेट) किरणांमुळे हा विषाणू तग धरू शकत नाही. काही संशोधकांच्या मते, विविध वस्तूंच्या पृष्ठभागाचा आधार घेत हा विषाणू पसरू शकत नाही. मुख्यत्वे सर्दी, शिंक आणि बोलत असताना हा विषाणू पसरू शकतो; तसेच हवेतील काही कणांना चिकटल्याने विषाणू पसरू शकतो, हेही शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखविले आहे. त्याशिवाय एका निरोगी व्यक्तीचा संपर्क विषाणूने बाधित धातू, प्लास्टिकशी आला असेल तर त्यालाही बाधा होऊ शकते. पण हे प्रमाण फारच नगण्य आले.

प्रयोगाअंती २८ दिवस हा विषाणू चलनी नोटांवर तग धरू शकला. तसेच प्लास्टिक आणि स्टेनलेस स्टीलच्या पृष्ठभागावर सहा दिवसांपर्यंत जिवंत होता. त्याशिवाय हे संशोधन असेही सांगते की, थंड वातावरणापेक्षा उष्ण वातावरणात मात्र तो जास्त वेळ जगू शकत नाही. ४० अंश तापमान असलेल्या प्रयोगशाळेत २४ तासापर्यंत हा विषाणू ठेवल्यास त्याचा संसर्गही कमी होतो. त्याशिवाय मुलायम, सपाट पृष्ठभागावर हा विषाणू अधिक काळ जगतो. सच्छिद्र पृष्ठभाग म्हणजे कापडावर तो फार काळ राहत नाही. आणखी एक संशोधन सांगते की, याच प्रयोगातून फ्ल्यूचा विषाणू केवळ सतरा दिवसच जगू शकतो, असेही 
सिद्ध झाले आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 

इतर ब्लॉग्स