थोडी काळजी घेऊया... चला स्वतःला आणि देशाला या संकटातून बाहेर काढू या..!

corona virus security Lets take some care kolhapur marathi news
corona virus security Lets take some care kolhapur marathi news

मंडळी, काय, सध्या सगळेच एकदम टेन्समध्ये आहात ना... परिस्थितीच तशी आलेली आहे. काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्र, दूरचित्रवाहिन्या आणि सोशल मीडियामधून चीनसह जगभरातील कोरोना व्हायरसच्या बातम्या वाचून तेथे ज्याप्रमाणे माणसांचे मृत्यू झाल्याचे वाचले होते त्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली होती. भारतातही कोरोनाबाधित पहिला रुग्ण सापडला आणि ही अस्वस्थता वाढीस लागली. गेल्या काही दिवसांत ही संख्या वाढू लागल्याने चिंतेत भर पडली, कोरोनाचे सावट देशावर घोंगावू लागले आणि पाहता-पाहता त्याचे गांभीर्य वाढू लागले. प्रशासकीय पातळीवर त्यावरील उपाययोजना सुरूच आहेत आणि सरकार, प्रशासन जनतेला अनेक प्रकारे आवाहन करून या विषाणूपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

जगभरात थैमान घालत असलेला हा व्हायरस आता भारतातही प्रवेश करता झाल्यामुळे साहजिकच आपली सर्वांचीच जबाबदारी वाढली आहे. ‘त्याला काय होते?’ असा हुमदांडगेपणा आता करून चालणार नाही. येथे केवळ आपला एकट्याच्या जिवाचा प्रश्‍न नाही तर आपल्यामुळे इतर अनेकांचा जीव टांगणीला लागण्याची शक्‍यता आहे. मनुष्यहानी कमीत-कमी व्हावी यासाठी शासनस्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असताना ज्या गांभीर्याने या बाबीकडे पाहायला हवे तसे आपण सगळेच पाहतो आहोत का, हा प्रश्‍न एकदा स्वतःला विचारून पाहण्याची वेळ आलेली आहे. नागरिकांनी एकत्र येऊन गर्दी करू नये... एकमेकांचा संपर्क टाळावा... या व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी आवश्‍यक ती काळजी घ्यावी... हात कसे धुवावेत... सार्वजनिक कार्यक्रमातील सहभाग टाळावा... ते रद्द करावेत... लग्न समारंभ टाळावेत... अशा विविध सूचना करून आपल्या सर्वांच्या जिवाची काळजी घेण्याविषयी प्रयत्नशील आहे. बाधितांना उत्तम सुविधा देता याव्यात यासाठीही प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करताना दिसत आहे.

एकीकडे अशी पाउले उचलली जात असताना अनेक जण मिळालेल्या सुटीचा उपयोग मौजमजेसाठी आणि फिरण्यास जाण्यासाठी करत असल्याचे दृश्‍य दिसत आहे. सद्यःस्थितीमध्ये कोरोनावरील कोणतीही लस विकसित झालेली नाही. अशा वेळी काटेकोर काळजी घेणे एवढेच आपल्या हातामध्ये आहे आणि ते सर्वात सोपे आहे. मात्र, आपण तेच करताना दिसत नाही. आपल्यापर्यंत आलेले नाही मग कशाला घाबरायचे, ही बेफिकिरी आता करून चालणार नाही. ही एक राष्ट्रीय आपत्ती असताना सर्वांनी एकजुटीने तिला सामोरे जाणे आवश्‍यक आहे. सरकार ज्या पद्धतीने सूचना करत आहे त्यांचे तंतोतंत पालन करून स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्‍यात जाणार नाही याची काटेकोरपणे काळजी घेऊया. येते काही दिवस आपण सर्वच गर्दी टाळू.... अगदीच आवश्‍यकता असेल तरच घरातून बाहेर पडू या... या कालावधीत आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत संवाद वाढवूया... वाचनसंस्कृती मुलांमध्ये रुजवण्यासाठी ही संधी आहे असे मानूया... आपण ज्याप्रमाणे आपल्या अधिकारांबद्दल जागरुक असतो त्याचप्रमाणे कर्तव्यातही कसूर होणार नाही याचा कसोशीने प्रयत्न करूया. बाहेर पडण्याशिवाय पर्यायच नाही अशांनी बाहेर वावरताना काळजी घेऊन हा व्हायरस पसरणार नाही याची दक्षता घ्यायला हवी.


जेव्हा आपल्या कुटुंबावर एखादे संकट आले की आपण सगळे एकवटतो आणि त्या संकटाचा मुकाबला करतो, ते संकट परतवून लावतो, त्याचप्रमाणे कोरोनारूपी संकट परतवून लावण्यासाठी हातात हात घालून नव्हे, तर एकमेकांपासून अंतर ठेवून हे संकट परतवून लावूया. पुढील पंधरा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे पंधरा दिवस जपले की आपण निम्मी लढाई जिंकलेली असेल आणि पुढील लढाईसाठी आपण सज्जही झालेलो असू. आता फक्त छोट्या-छोट्या गोष्टी जपूया आणि स्वतःला आणि देशाला या संकटातून बाहेर काढू या!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com