गरज सह्याद्रीच्या कणखरतेची

प्रवीण कुलकर्णी
Tuesday, 8 September 2020

सहा महिन्यांपासून कोरोनानामक शत्रू स्वराज्यावर चाल करून आलेला आहे. चोहोबाजूंनी विविध रूपांत तो वावरतोय. शत्रूचे आकारमान लहान असले तरी उपद्रवमूल्य मोठे व जीवावर बेतणारे आहे

सह्याद्री, महाराष्ट्र आणि इतिहास यांचं समीकरण सर्वश्रुत आहे. ही सांगड इतकी पक्की आहे, की यापैकी कशाचाही अभ्यास करा, सकारात्मक विचारांचे सार आणि कणखरता यांची ताकद कळेल. कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर सकारात्मकता आणि मनोनिग्रह या दोन्हींची नितांत आवश्‍यकता आहे. इतिहासातील काही घटनांचा धांडोळा घेतल्यास निश्‍चितपणे सावरायला मदत होईल, असे वाटते. 

सह्याद्री... दगडधोंड्यांचा, मातीचा, काळ्याकभिन्न शिळांचा, अंगाअंगावर इतिहासपूत सत्यांची ‘वारली’ ल्यालेला प्रदेश. कणखरता हे सह्याद्रीचे अविभाज्य अंग. मुळात दुर्गम ठिकाणी आणि निसर्गसौंदर्याने मुक्तहस्ते उधळण केलेल्या परिसरात राहणारे काटक लोक पाहिले की, त्यांच्यातील चपळतेची साक्ष पटते. रायगडावरील हिरकणीची कथा सर्वपरिचित आहे. संध्याकाळी गडावरील दरवाजे बंद झाल्यानंतर घरातील तान्हुल्याच्या आठवणीने व्याकूळ झालेली हिरकणी काळोख्या रात्री रायगडावरील उभा कडा उतरते. ही गोष्ट असामान्य धैर्याची प्रचिती देते. स्वराज्यातील रयत असो वा वयोवृद्ध शेलारमामा, सरसेनापती हंबीरराव मोहिते, नरवीर तानाजी मालुसरे, वीर शिवा काशीद, जीवा महाले, बाजी प्रभूदेशपांडे यांच्यासारखे असंख्य मावळे... त्यांचा अभ्यास केला की ते लक्षात येते. ‘डाएट आणि तब्येत सांभाळून’ या कल्पनांचा आणि तत्कालीन मावळ्यांचा काहीतरी संदर्भ लागतो का? नाही. केवळ मनोनिग्रह... घेतलेले काम कुठल्याही स्थितीत तडीस न्यायचे, हा आग्रह अन्‌ त्याबरहुकूम जलद हालचाली करून कामगिरी फत्ते करणे. शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी वेळेचे अचूक नियोजन आणि सुदृढ, सकारात्मक मानसिकतेमुळेच हे शक्‍य आहे. नेमक्‍या अशाच खंबीर मन:स्थितीची आजच्या कोरोनाच्या संकटकाळात गरज आहे. 

आग्रा दौरा छत्रपती शिवरायांच्या जादूई करिष्म्याबरोबरच सकारात्मक मानसिकतेचा परमोच्च बिंदू. लक्षात घ्या, छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाच्या छावणीतून नव्हे, जणू काळाच्या मगरमिठीतूनच सहीसलामत सुटका करून घेतली. आठवा सिद्दी जोहरचा पन्हाळ्याचा वेढा, प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीच्या खोऱ्यात अफजलखानाविरोधातली मोहीम, लालमहालात शाहिस्तेखानावर झालेला हल्ला... या व अशा शिवचरित्रातील अनेक घटनांचा अभ्यास केला असता, छत्रपतींच्या खंबीर आणि धीराेदात्त अशा सकारात्मक मानसिकतेची कल्पना येते. 

सहा महिन्यांपासून कोरोनानामक शत्रू स्वराज्यावर चाल करून आलेला आहे. चोहोबाजूंनी विविध रूपांत तो वावरतोय. शत्रूचे आकारमान लहान असले तरी उपद्रवमूल्य मोठे व जीवावर बेतणारे आहे. या शत्रूच्या नायनाटासाठी गनिमी काव्याची गरज आहे. मास्क, सॅनिटायझर या शस्त्रांसह समाजात वावरताना खबरदारीची ढालही सोबत बाळगणे आवश्‍यक आहे. प्रशासनाने दिलेली पथ्यं पाळायची. त्यात कसूर करायची नाही; अन्यथा कडेलोट अटळ आहे. आता कोरोनाच्या संकटकाळात गरज आहे फक्त छत्रपती शिवरायांच्या कणखर मानसिकतेचा तिळभर अंश होण्याची...

संपादन - अर्चना बनगे

इतर ब्लॉग्स