कलाकारांची विस्कटलेली घडी बसवण्याचे आव्हान

राहुल पाटील
Tuesday, 1 September 2020

कलाकार महासंघाने शासनकर्ते, लोकप्रतिनिधींना मारलेली केविलवाणी हाक त्यांच्यापर्यंत पोहोचली की नाही हा भाग वेगळा; मात्र अनेक माध्यमांनी त्याची दखल घेतली.

कला कुठलीही असो; जेव्हा कलाकार त्या कलेपुढे नतमस्तक होऊन समर्पित होतो तेव्हा त्या कलेची पूजा होते. मग कधी शब्दांची फुले वाहून पूजा केली जाते, कधी रंगांची उधळण करत, कधी घुंगरांच्या आवाजात तर कधी कधी वाद्यांच्या तालामध्ये. या पूजेतून साकार झालेली अभिव्यक्ती विलक्षण असते, अलौकिक असते. महाराष्ट्र तर कलाकारांची खाण. सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे आपले राज्य. पण सध्या कोरोनामुळे सारेच थांबले आहे. प्रत्येक क्षेत्राला त्याची झळ बसली आहे. त्यामध्ये अनेक कलाकारांचाही समावेश आहे. ऐन सणामध्ये कलाकारांची विस्कटलेली ही घडी सरकार कशी बसवणार, हा मोठा प्रश्‍न आहे.

 
कोरोना संकटात अडचणीत आलेल्या कलाकारांना आर्थिक मदत मिळावी, त्यांच्यासाठी पॅकेज जाहीर व्हावे, यासाठी राज्य कलाकार महासंघाने नुकतेच कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ढोल बडवले’. उपासमारीची वेळ आल्याचे आंदोलनकर्त्यांनी ओरडून सांगितले. राज्य सरकारपर्यंत मागण्या पोहचविण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे निवेदनही दिले. महासंघाच्या मागण्यांची प्रशासनाने दखल घेतली नाही तर पुन्हा ४ सप्टेंबरला पुलाची शिरोली येथे महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे. कलाकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे याबाबत म्हणाले, ‘‘राज्यभरातील लाखो कलाकारांपुढे अनेक समस्या आहेत.

याबाबत अनेकदा आवाज उठवला आहे. आता तर कोरोनामुळे बॅंड, बॅंजो पथके, ऑर्केस्ट्रा ग्रुप, सांस्कृतिक कार्यक्रम सादरकर्ते ग्रुपमधील गायक, गायिका, वादक, निवेदक अडचणीत आले आहेत. यात अनेक गरीब कुटुंबे आहेत. इतर क्षेत्रासाठी पॅकेज जाहीर झाली; मात्र कलाकारांकडे का दुर्लक्ष? लॉकडाउनमुळे सहा महिन्यांपासून कामे नाहीत. त्यांना आर्थिक मदतीसह मानसिक आधाराचीही नितांत गरज आहे.’’ 

दरम्यान, कलाकार महासंघाने शासनकर्ते, लोकप्रतिनिधींना मारलेली केविलवाणी हाक त्यांच्यापर्यंत पोहोचली की नाही हा भाग वेगळा; मात्र अनेक माध्यमांनी त्याची दखल घेतली. आता सरकारनेही याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कारण इतर क्षेत्रातील उद्योगांसाठी सवलतीच्या योजना जाहीर झाल्या आहेत. अडचणीत असलेल्या कोकणातील मच्छीमारांनाही नुकतीच योजना जाहीर करून आधार दिला आहे. तशाच प्रकारे या कलाकारांचीही दखल घेतली तर संकटात आधार मिळेल; अन्यथा भविष्यात कोरोनापेक्षा बेरोजगारीचे संकट महाभयानक असेल.

संपादन -  अर्चना बनगे

 

इतर ब्लॉग्स