आव्हान साखरमिश्रित गुळाचे

यशवंत केसरकर
Wednesday, 14 October 2020

साखरमिश्रित गुळाची चव वेगळीच असते. त्याला साखरेची चव असते. शिवाय त्यापासून बनविण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचीही चव बिघडू शकते. काही व्यापारी कोल्हापुरी गुळाच्या नावाखाली कर्नाटकातील महालिंगपूर आदी भागातील गूळ विकतात. त्याचा फटका कोल्हापूरच्या गुळास बसला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात नव्या गूळ हंगामाला सुरवात झाली आहे. शाहू मार्केट यार्डात आवक सुरू होऊन सौदेही सुरू झाले आहेत. प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल गुळास तीन ते सहा हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. यंदा पाऊसमान चांगले झाल्याने उसाची वाढ चांगली झाली आहे. त्यामुळे उसाचे उत्पादन वाढणार आहे. सध्याचा गुळाचा दर चांगला आहे. अजून हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. ज्यावेळी गुळाला दर चांगला मिळतो, त्यावेळी लोकांचा कल गुऱ्हाळघराकडे असतो. त्यामुळे यंदाच्या हंगामात गुळाची आवक चांगली होण्याची अपेक्षा आहे. 

गुळाचा म्हणून हक्काचा ग्राहक असतो. त्यामुळे मागणी कायम असते; मात्र गेल्या काही वर्षांपासून गूळ उद्योगाला साखरमिश्रित गुळाचे ग्रहण लागले आहे. साधारणतः जानेवारीनंतर उसाचे प्रमाण कमी होते. त्यावेळी साखरमिश्रित गूळ बाजारात आणला जातो. कारण कच्च्या साखरेचा दर गुळाच्या दरापेक्षा कमी असतो. क्विंटलला पाचशे ते सातशे रुपयांचा फरक पडतो. त्यामुळे उसाच्या रसात साखर मिसळून गूळ बनवण्याचा उद्योग काहींनी सुरू केला आहे. परंतु, त्यातून कोल्हापूरच्या गुळाचे नाव बदनाम होत आहे. कोल्हापुरी गुळाला जिऑग्राफिकल इंडिकेशन (भौगोलिक मानांकन) मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या माध्यमातून जागतिक पातळीवर पोहचण्याचे प्रयत्न सुरू असताना काहींच्या साखर मिसळण्याच्या उद्योगाचा फटका बसतो आहे. 

साखरमिश्रित गुळाची चव वेगळीच असते. त्याला साखरेची चव असते. शिवाय त्यापासून बनविण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचीही चव बिघडू शकते. काही व्यापारी कोल्हापुरी गुळाच्या नावाखाली कर्नाटकातील महालिंगपूर आदी भागातील गूळ विकतात. त्याचा फटका कोल्हापूरच्या गुळास बसला आहे. दुसऱ्या बाजूला अनेक समस्यांना गूळ उद्योगाला सामोरे जावे लागत असते. शुद्ध गूळ बाजारात येईल, याची गूळ उत्पादकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीकडे दरवर्षी सुमारे शेकडो कोटींची गुळाची उलाढाल होते. त्याच्या एक टक्का रक्कम बाजार समितीला मिळते. पण गूळ उद्योग टिकावा, त्याची वाढ व्हावी, त्यात नवतंत्रज्ञान, आरोग्यदायी गूळ, सेंद्रिय गूळ यांची वाढ व्हावी, यासाठी बाजार समितीच्या पातळीवर फारसे प्रयत्न झाले नाहीत. काही शेतकऱ्यांनी सेंद्रिय किंवा रसायनविरहित गुळाचे उत्पादन सुरू केले. त्याच्या विक्रीसाठी खास व्यवस्था किंवा जनजागृती बाजार समितीने करणे गरजेचे होते. तसा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. यामुळे सेंद्रिय गूळ, सौद्यात फारसा येत नाही. आला तर त्याला म्हणावा तसा दर मिळत नाही. याउलट प्रयोगशील शेतकरी स्वतः प्रयत्न करून आपल्या सेंद्रिय अथवा रसायनविरहित गुळाला बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. दुसऱ्या बाजूला कोल्हापुरी गूळ म्हणून सौदा होणाऱ्या साखरमिश्रित गुळाचा सौदा याच बाजार समितीच्या आवारात होतो. कोल्हापुरी गुळाचे नाव बदनाम व्हायचे नसेल बाजार समिती, व्यापारी आणि उत्पादक यांनी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.

संपादन - अर्चना बनगे

इतर ब्लॉग्स