esakal | आशेची ज्योत  तेवत ठेवूया !
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19 impact positive story by World renowned psychiatrist Dr. Victor Frankl

कोरोनाने साऱ्या जगाला हादरवून सोडले आहे. दिवसेंदिवस वाढणारा रुग्णांचा आकडा धडकी भरवत आहे

आशेची ज्योत  तेवत ठेवूया !

sakal_logo
By
डॉ. प्रमोद फरांदे

कोरोनाने साऱ्या जगाला हादरवून सोडले आहे. दिवसेंदिवस वाढणारा रुग्णांचा आकडा धडकी भरवत आहे. या वैश्‍विक महामारीने आतापर्यंत जगभरात ८ लाखांवर नागरिकांचा बळी घेतला आहे. अनेक संसार उद्‌ध्वस्त होत आहेत. कोरोनामुळे लोकांची मने प्रसन्नता, आनंदापेक्षा चिंता, भीती, नैराश्‍याने ग्रासलेली दिसतात. आपण सारेच अनिश्‍चिततेच्या भोवऱ्यात अडकलेलो आहोत. अशा बिकट परिस्थितीत मनाच्या वाटा उजळून निघतात त्या कल्पनाशक्ती, मनोबलाद्वारे. मनातील असीम आशावाद आणि आत्मविश्‍वास, सकारात्मकतेद्वारे संकटांना विजयात रूपांतरित करता येते, हे अनेकदा सिद्ध झाले आहे.

जगप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. व्हिक्‍टर फ्रॅन्कल हे त्याचे उत्तम उदाहरण. डॉ. फ्रॅन्कल व त्यांच्या कुटुंबाला ज्यू असण्याच्या अपराधाबद्दल हिटलरच्या सैनिकांनी पकडले होते. हिटलरची छळछावणी म्हणजे अमानुष क्रूरतेची परिसीमाच. मृत्यू परवडला; पण हा छळ नको, असे त्याचे वर्णन केले आहे. हिटलरने त्या छळछावणीत सुमारे साडेपंधरा कोटी लोकांची अमानुषपणे हत्या केल्याचे सांगितले जाते. अशा छळछावणीत डॉ. फ्रॅन्कल एक सामान्य कैदी होते. अतीव असहायता, प्रचंड अत्याचार, पावाच्या एका तुकड्यासाठीची धडपड, प्रत्येक क्षणी मृत्यूची टांगती तलवार, क्षणोक्षणी जवळून पाहिलेले मित्रांचे, शेजाऱ्यांचे मृत्यू, छावणीतील कोंदट वातावरण, ही सारी परिस्थिती कैद्यांना निराशेच्या खाईत लोटत असे. त्यातून अनेकांच्या मनात आत्महत्येचे विचार घर करत.

अनेकांनी तसे प्रयत्नही केले; पण त्याहीपेक्षा मनात घट्ट बसलेला निराशेचा ढग, उदासीनता, कुपोषण, नकारात्मक मानसिकतेमुळे हे कैदी वेगवेगळ्या आजारांना बळी पडले. डॉ. फ्रॅन्कल यांनीही अत्याचार सहन केले; मात्र याचवेळी त्यांनी मनातील आशावाद जिवंत ठेवला. भीतीच्या सावटाखाली त्यांच्या मनाने स्वत:ला भोवतालच्या वातावरणापासून वेगळे ठेवले. सतत मनावर मायेची फुंकर घातली. त्याचा फायदाही झाला. दात घासायची व्यवस्था नव्हती, शिवाय जेवण सत्त्वहीन असूनही हिरड्या मजबूत राहिल्या. कित्येक महिने अंघोळ नसतानाही हातांना झालेल्या जखमा चिघळल्या नाहीत. कितीही छळ झाला तरी मनातील भीतीला, निराशेच्या विचारांना त्यांनी वरचढ होऊ दिले नाही. उलट या छळछावणीतून सुटून ते अनुभव पुस्तकाद्वारे लोकांना सांगत आहेत, आपल्या कुटुंबाच्या सहवासात, प्रेमळ आठवणी, घरी गेल्याच्या स्वप्नात रममाण होत. हे स्वप्न, प्रेम, सकारात्मकता हेच त्यांच्या जगण्याचे बळ ठरल्याचे त्यांनी आपल्या संशोधनातून दाखवून दिले.

पुढे छळछावणीतून सुटल्यानंतर त्यांचे असे कोणीच जिवंत शिल्लक राहिले नव्हते. पत्नीचा कुपोषणाने, भाऊ, आई-वडिलांचा छळछावणीत मृत्यू झाल्याचे समजले. तरीही उद्‌ध्वस्त न होता छळछावणीतून सुटलेल्या कैद्यांच्या मानसशास्त्रावर ते अभ्यास करीत राहिले. ज्यांची जगण्याची असीम इच्छा होती, भविष्यातील चांगल्या जीवनाविषयी आशा होती, असेच लोक या छळछावणीतून सुटल्याचे डॉ. फ्रॅन्कल यांनी ‘मॅन सर्च फॉर मीनिंग’ या पुस्तकातून दाखवून दिले आहे. या पुस्तकाचा डॉ. विजया बापट यांनी मराठीत ‘अर्थाच्या शोधात’ या नावाने अनुवाद केला आहे. माणसाला का जगायचे आहे? याचे कारण समजले की तो कोणत्याही बिकट परिस्थितीत, दुर्धर आजारातही जिवंत राहतो, असे स्पष्ट मत डॉ. फ्रॅन्कल यांनी मांडले आहे. कोणत्याही बिकट परिस्थितीत दृष्टिकोन महत्त्वाचा राहतो. आशावादी दृष्टिकोनाचा शरीरावर हितकारी परिणाम होतो, तर नकारात्मक दृष्टिकोन शरीराला अपायकारक असल्याचे डॉ. फ्रॅन्कल यांनी प्रयोगाद्वारे दाखवून दिले आहे. सध्याच्या काळात आशावादी दृष्टिकोन, सकारात्मक भावना, मनातील आशेची ज्योत जागृत ठेवल्यास कोरोनाची भीती नक्कीच दूर होऊ शकेल.

loading image
go to top