कोरोनासोबत जगणारे देशातील पहिलेच राज्य

covid 19 karnataka first state in the country to live with Corona
covid 19 karnataka first state in the country to live with Corona

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मार्च अखेरपासून देशात लॉकडाउन झाले. एक-दीड महिना झाल्यावर सर्वच राज्यांसमोर अर्थचक्र सावरण्याचे आव्हान उभे राहिले. मेमध्ये पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्यावर त्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा या देशातील एकमेव मुख्यमंत्र्यांनी प्रथम अनलॉकवर भाष्य केले. त्यामुळे टप्प्याटप्प्याने का होईना केंद्राच्या संमतीने त्यांनी राज्यात अनलॉकची धाडसी प्रक्रिया सुरू केली.

आता शेवटचा टप्प्पाही कर्नाटकनेच सर केला. राज्यांच्या सीमा खुल्या केल्या असून, कोणतीही तपासणी नाही वा कोणी आल्यास वैद्यकीय चाचणी, क्वारंटाईन या प्रक्रिया रद्द केल्या. त्यामुळे हळूहळू अर्थचक्राला गती मिळेल, असा विश्‍वास सरकारचा आहे. कोरोनाबरोबर जगणं स्वीकारलेलं राज्य म्हणून कर्नाटकचा उल्लेख होऊ लागला आहे.


कर्नाटकने पहिला अनलॉक सुरू केला, त्या वेळी कोरोना रुग्णांची संख्या एक हजारापर्यंत होती. आता ही संख्या तीन लाखांकडे जात असतानाही अनलॉकचे सगळे टप्पे खुले केले. लॉकडाउनच्या काळात सर्वच राज्यांचे अर्थचक्र थंडावले होते. त्यातून बाहेर पडण्यासाठी धाडसी पावले टाकणारे कर्नाटक देशातील पहिलेच राज्य ठरले. सध्या रुग्णसंख्येचा आकडा दिवसाला सात ते आठ हजारांच्या घरात आहे. हे सगळं स्वीकारून राज्याने विविध पातळ्यांवर अनलॉकची प्रक्रिया सुरू ठेवली.

दहावी, बारावी, ‘सीईटी’सारख्या परीक्षा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना सर्व ती खबरदारी घेऊन पूर्ण केल्या. राज्याची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी टप्प्याटप्प्याने काम केले. सध्या तेथे शाळा-महाविद्यालये वगळता सर्व व्यवहार सुरू आहेत. महाविद्यालयेही सप्टेंबरच्या मध्यावर सुरू होणार आहेत.
लॉकडाउनच्या प्रारंभी चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. कित्येक लोक बेरोजगार झाले. रोजीरोटीवरील लोकांची तर जगण्याची धडपड होती. कोरोनापेक्षा उपासमारीने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढू नये, असे वाटत असेल तर लॉकडाउन खुले करण्याची गरज त्या वेळी अनेकांनी व्यक्त केली. आता ही गरज सगळ्यांनाच पटली आहे. बहुतांश राज्ये हळूहळू अनलॉककडे येत आहेत.


मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गजांना कोविड-१९ ची लागण झाल्यावर पंधरवड्यातच ते सक्रिय झाले. त्यानंतर राज्याचा दौरा सुरू करून कोरोनासोबत लढण्याचा आणि जगण्याचा संदेश देऊ लागले आहेत. कोविड-१९ च्या संसर्गापेक्षा पुढील आव्हानांवर सरकारने विशेष लक्ष दिले आहे. त्यासाठी विशेष योजनाही हाती घेतल्या आहेत. शेती व उद्योगावर भर दिला असून, उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापून राज्यात उद्योगचक्र गतीने सुरू राहण्याबरोबरच ते वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.काही जपानी कंपन्यांशी संपर्क साधून राज्यात गुंतवणुकीसाठी पायघड्या घातल्या आहेत.

राज्यात रुग्णसंख्या वाढत असल्याचे आकडे दिसत असले तरी इतर गोष्टींवर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी सरकार प्रयत्न करताना दिसत आहे. अनलॉकच्या प्रक्रियेत रुग्णसंख्या वाढणार असली तरी त्याला सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्याचे आव्हान सरकारपुढे आहे. पण, सध्याच्या घडीला राज्याने आर्थिक चक्राला गती देण्यासाठी उचललेल्या धाडसाचे देशात कौतुक होत आहे. सरकारच्या या निर्णयाने लोकही कोरोनासोबतची जीवनशैली स्वीकारतील, हीच आशा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com