नात्याला नख  लागते तेव्हा..!

covid impact social people story by sarjerao navle
covid impact social people story by sarjerao navle

प्रसंग काही वर्षांपूर्वीचा : 
एका ज्येष्ठ नागरिकाचे रात्री निधन झाले. त्यांना एकुलती कन्या. ती नोकरीनिमित्त मुंबईला. मुलगा नसल्याने अंत्यसंस्कार तिच्या उपस्थितीतच करण्याचे भाऊबंदांनी पक्के केले. तिला गावी येण्यास कळविले. मुलीला पोहचण्यास पाच-सहा तास लागणार होते. 


तोपर्यंत पाहुणे हळूहळू जमले. ग्रामस्थही जमा झाले होते. मुलगी सकाळी पोहचणार; आता करायचे काय, अशा विचारात सर्व जण असताना ज्येष्ठ मंडळींनी सांगितले, की सकाळी सहा वाजता मुलगी येईल. मृतदेह मोठ्या दवाखान्यात शवपेटीत ठेवायचा आहे. तोपर्यंत पै-पाहुणे, मित्रमंडळींनी घरी जाऊन सकाळीच यावे. त्यावर एक पाहुणा म्हणाला, ‘‘कशाला? आम्ही थांबतो की इथेच.’’ त्यावर ती ज्येष्ठ व्यक्ती म्हणाली, ‘‘अहो! थांबून काय उपयोग? पोटची मुलगी आल्याशिवाय तर अंत्यविधी होणार नाही.’’ तसा तो पाहुणा वरमला आणि निघून गेला. मृतदेह ॲम्ब्युलन्समधून शवपेटीत ठेवण्यासाठी पाठविला आणि सर्व जण घरी गेले. पहाटे साडेपाच वाचता मुलगी गावी पोहचली. सोबत जावई, नात, नातू असे सर्व जण होते. रात्री परतलेले लोक सहापासून पुन्हा हळूहळू जमू लागले. मोठ्या दवाखान्यातून मृतदेहही आणण्यात आला. मुलीने अंत्यदर्शन घेतले आणि अग्नीही दिला. संपूर्ण गाव हळहळला.


प्रसंग आठवड्यापूर्वीचा : 
एका घरातील कर्त्या पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्या आधी पंधरा दिवस ती व्यक्ती रुग्णालयात दाखल होती. पंधरा दिवसांनंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या दोन्ही मुलांना याची माहिती संबंधित दवाखान्यातून कळविली. मृतदेह घरी देणार नाही, पंचगंगा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे सांगितले. मृत व्यक्तीची दोन मुले आणि पत्नी पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यदर्शन घेण्यासाठी गेले. शववाहिका आली. त्यात पीपीई किटमध्ये गुंडाळलेले पाच मृतदेह होते. नेमका आपल्या माणसाचा मृतदेह कोणता, काही कळेना.  कोणत्या किटमध्ये आपला माणूस गुंडाळला, याची माहितीही कोणी देईना. १५ फुटांवर थांबून पत्नी, दोन मुलांनी हुंदके देत हात जोडले आणि पीपीई किटमध्ये गुंडाळलेल्या मृतदेहाचे अंत्यदर्शन घेतले. अन्य तीन कुटुंबे आपापल्या माणसांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी अशीच १५ फुटांवर उभी होती, तर एका मृतदेहाचे कोणीच कुटुंबीय उपस्थित नव्हते. लांबून दर्शन घेऊन सर्वांना मागे पाठविले आणि मृतदेह सरणावर अंत्यसंस्कारासाठी ठेवले. सुन्न करणाऱ्या वातावरणात स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी एकापाठोपाठ एक अशा पाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले.


दोन्ही प्रसंग माणसाच्या मृत्यूनंतरचे असले, तरी कोरोनाने माणसामाणसात आणि नात्यानात्यात किती अंतर निर्माण केले आहे, याची जाणीव करून देणारे आहेत. पहिल्या प्रसंगात मुलीला वडिलांचे अंत्यदर्शन होण्यासाठी मृतदेह पहाटेपर्यंत ठेवला होता. तर कोरोनाने मरण पावलेल्या व्यक्तीच्या अंत्यदर्शनाला त्याच्याच नात्यातील, रक्तातील लोकांना कोरोनाने पारखे केले. कोरोनाने होणाऱ्या मृत्यूने आजूबाजूची माणसे पाखरासारखी उडून जात आहेत. माणसाच्या मरणानंतर त्याचे अंत्यदर्शन मिळणेही दुरापास्त झाले आहे. कोरोनाने रक्ताच्या नात्याला आणि मायेलाच नख लावले आहे, एवढे मात्र नक्की.

संपादन - अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com