Vietnam : व्हिएतनामची यादगार सहल...!

एचडीएफसी अर्गो कंपनीच्या माध्यमातून १९ ते २५ जुलै दरम्यान व्हिएतनाम या देशाची सहल करण्याची संधी मिळाली.
Vietnam Country
Vietnam CountrySakal

एचडीएफसी अर्गो कंपनीच्या माध्यमातून १९ ते २५ जुलै दरम्यान व्हिएतनाम या देशाची सहल करण्याची संधी मिळाली. व्यावसायिक पातळीवर केलेल्या कामगिरीचा गौरव आणि सन्मान सोहळा जसा यापूर्वी श्रीलंका आणि इंडोनेशिया (बाली) ला झाला होता, तसाच यंदा तो व्हिएतनामला होता. माझ्या सुदैवाने मला या तीनही देशांना भेट देण्याची संधी मिळाली.

सुरवातीला वाटलेले की या छोट्याशा देशात असे काय विशेष पाहायला मिळणार आहे, पण अनेकदा व्हिएतनाम-अमेरिका युद्धविषयी ऐकले होते आणि यात व्हिएतनामने अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला नमवले होते. त्याचे कौतुक होतेच, त्यामुळे त्यासाठी का होईना पण जायची इच्छा होती. आम्ही गेलो होतो साऊथ व्हिएतनामला. ज्याठिकाणी खूप काही वेगळं पाहता आले.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आम्ही ज्या म्युझियमला (War Remnants Museum) भेट दिली त्याविषयीच्या आठवणी भरभरून जमा झाल्यायत. या युध्दाविषयीच्या खूप काही गोष्टी याठिकाणी संकलित करण्यात आल्या आहेत. त्या पाहताना अक्षरशः गलबलून आले.

सुरवातीला युद्धात वापरलेले रणगाडे, हत्यारे पाहताना मजा आली, पण जसजसे चित्रे, शस्त्रे, युद्धाच्या स्टोऱ्या पाहात दुसऱ्या मजल्यावर गेलो, तेव्हा युद्धानंतर व्हिएतनामची झालेली स्थिती पाहून अंगावर काटा आला. १९५५ पासून हे युद्ध सुरू झाले होते. साऊथ आणि नॉर्थ व्हिएतनाम यांच्यात हा संघर्ष सुरू होता. नॉर्थ व्हिएतनामला रुस, चीन आणि नॉर्थ कोरिया तर ऑस्ट्रेलिया, अमेरिकेने साऊथ व्हिएतनामला साथ दिलेली. १० वर्षे हे युद्ध सुरूच राहिले.

१९६५ ला सुमारे ३५०० सैनिक अमेरिकेने या युद्धात उतरवले. इथून या युद्धाला खरी सुरवात झाली. ३ वर्षात म्हणजे १९६८ पर्यंत अमेरिकेचे ५ लाख सैनिक या मैदानात उतरले होते. छोट्याशा व्हिएतनामने अमेरिकेला अक्षरशः घाईला आणले होते. व्हिएतनामचा सर्वसामान्य माणूसही देशाच्या अस्मितेसाठी या युद्धात उतरला होता. यात महिलांची संख्या मोठी होती.

इथले ५० अंश सेल्सिअस तापमान अमेरिकन सैनिकांना सोसत नव्हते आणि काहीही झाले तरी युद्ध जिंकायचेच म्हणून अमेरिकेने वाट्टेल ते प्रयोग केले. एका ठिकाणी तर असा उल्लेख दिसला की, अमेरिकेने जे काही नवे हत्यार, क्षेपणास्त्र, बॉम्ब किंवा तंत्रज्ञान बनवले त्याचा वापर व्हिएतनाम युद्धात प्रयोगशाळा म्हणून केला. हे वाचून धक्का बसला. व्हिएतनामच्या चिवटपणासमोर चिडलेल्या अमेरिकेने महिला, बालकांवर अनन्वित अत्याचार केले.

महिलांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली. त्यांच्यावर विषप्रयोग केले. खुनप्रयोग केले. गर्भवती महिलांवर empty pregnancy च्या औषधांचा वापर केला, जी औषधे जनावरांसाठी वापरली जात होती. या प्रयोगातून जबरदस्तीने माहिती काढून घेतली. ज्यात अनेक महत्त्वाचे अधिकारी आणि गोपनीय माहिती हाताला लागली. प्रयोगानंतर ज्या महिलांना आपल्याकडून झालेल्या चुकीची जाणीव झाली अशा अनेक महिलांनी आत्महत्या केली.

ज्या जगल्या, त्यांच्या संपुर्ण आयुष्य आणि पुढच्या पिढ्यांवर गंभीर परिणाम झाले आहेत. एजंट ऑरेंज हा आणखी एक प्रयोग व्हिएतनामला घातक ठरला; ज्यात तिथली शेती, उत्पादन, जन्माला आलेली अपत्ये या सर्वांवर नंतरच्या काळात खूप गंभीर परिणाम झाले. यात अमेरिकेचे सैन्यही बळी पडले. १९७३ ला अमेरिकने माघारीचा निर्णय घेतला.

जागतिक पातळीवर त्यांची छीथु झाली. हो चि मिन्ह यांच्या नेतृत्वाखाली १९४१ला व्हिएत मिन्ह पार्टीची स्थापना केली. अमेरिकेकडून कु चि टनेल (Cu Chi Tunnel) च्या विरोधात 'टनेल रॅट' नावाची मोहीम राबवली, ज्यात कमी उंचीच्या लोकांचा समावेश केला गेला. हे टनेल बॉम्ब हल्ल्यानी उडवण्याचा प्रयत्न झाला. तरीही हजारो लोक यातून सुरक्षित राहिले आणि त्यांनी लढा दिला.

व्हिएतनाम नागरिक गोरीला वॉर फेअरमध्ये माहिर होते. टनेलमध्ये गेल्यावर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. व्हिएतनामी किती चिवटपणे लढले हे इथे गेल्यावर प्रत्ययास येते. या टनेलवर अमेरिकेने केलेले बॉम्बहल्ले भयंकर होते. जंगलात लढणे त्यांच्यासाठी अशक्य बाब होती. याउलट त्यांनी गावे जाळली. बालकांवर अत्याचार केले. महिलांचे अतोनात हाल केले.

खरेतर हे युद्ध मूळ १८५७ पासूनचे आहे, ज्यात जपान आणि फ्रांस यांचाही समावेश होता. पण तो इतिहास खूप मोठा आहे. अमेरिका आणि व्हिएतनाम यांच्यातील २० वर्षे चाललेले युद्ध, ज्याला इंडो चायना युद्ध म्हणतात ते आजही अमेरिकेच्या जीवावरची जखम बनले आहे. अमेरिकेने १९७५ ला अधिकृत माघार घेतली. यात त्यांचे २०० बिलियन डॉलर्सचे नुकसान झालेले, ५८ हजार सैनिक मारले गेले आणि व्हिएतनामचे ३लाख लोक.

अशा खूप गोष्टी या म्युझियममध्ये अंगावर येतात. युद्धात वापरलेली शस्त्रे, विमाने, रणगाडे, गोळ्या, बॉम्ब सगळे याठिकाणी पाहता येतात. तत्कालीन माध्यमानी दिलेल्या बातम्या दिसतात. युद्धात सापडलेले अनेक साहित्य, जवानांचे कपडे, शूज, हत्यारे इथे जतन करून ठेवली आहेत. विशेष म्हणजे याठिकाणी भेट देणाऱ्यांमध्ये बहुतांश लोक अमेरीकन आहेत.

युद्धाचा हा इतिहास जाणून घेण्यात त्यांना रस आहे, याचे कौतुक आहे. आम्ही घाईघाईत या म्युझियमला भेट दिलेली. इकडे भेट दिल्याचे आणि व्हिएतनामला आल्याचे सार्थक वाटले. हा इतिहास पुस्तकात वाचून किंवा एखाद्या माहितीपटात पाहून इतक्या तीव्रतेने कधीच समजला नसता.

खरंतर आम्ही पहिल्या दिवशी कु चि टनेलला भेट दिलेली आणि शेवटी म्युझियमला. दोन्ही भेटी जोडून असत्या तर संदर्भ जोडले जाऊन त्याची तीव्रता आणखी वाढली असती. अमेरीकेने व्हिएतनामी कम्युनिस्टांना संपवण्यासाठी अडीचशे चौरस किमी क्षेत्रात असलेल्या ४२ हजार कम्युनिस्ट असलेले टनेल नष्ट करण्यासाठी जंग जंग पछाडले होते.

याजागी बॉम्बवर्षाव केला होता. हे ऐकून अंगावर काटा येतो, टनेल प्रत्यक्ष पाहून काय झाले असेल! टनेलच्या ठिकाणी आम्हा पर्यटकांसाठी रायफल शूटिंगचा अनुभव घेण्याची सोय केली होती. गोळ्यांचे धाड धाड आवाज कानठळ्या बसवत होते. ३५ हजार डाँगची कॉफीही इथे अनुभवली.

या टनेलकडे जाताना रस्त्यात आम्ही Handicapped handicrafts ला भेट दिली. शंख, शिंपले आणि अंड्याच्या टाकाऊ सालीपासून बनवलेल्या अफलातून कलाकृती इथे पाहिल्या. विशेषतः हे बनवणारे सर्व दिव्यांग लोक होते. त्यांनी बनवलेल्या कलाकृती, चित्रांमध्ये बहुतांश महिलांचीच प्रतिके आहेत. इथल्या संस्कृती, सन्मानाची परंपरा त्यांनी कलेतून जपली आहे. १९७९ पासून सुरू असलेली ही संस्था चालवणाऱ्या बहुतांश महिलाच होत्या.

आम्ही सैगोन नदीच्या काठावर वसलेल्या दक्षिण चीन समुद्र किनाऱ्यावरच्या साईगावला हॉटेल ली मॅरेडियनला थांबलो होतो. हो ची मिन्ह यांच्या स्मृती कायम स्मरणात राहाव्यात म्हणून जुन्या 'साईगाव'चे नाव बदलून मिन्ह यांचे नाव दिलेय. जवळपास एक कोटींवर लोकसंख्या असलेल्या साईगावकडे सर्वात मोठे शहर आणि आर्थिक केंद्र म्हणून या शहराकडे पाहिले जाते.

दिल्ली जशी भारताची राजधानी आहे तशी व्हिएतनामची राजधानी हनोई आहे, परंतु जशी आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिले जाते, तसेच स्थान या साईगाव अर्थात हो ची मिन्ह सिटीचे आहे. दोघांमध्ये १७०४ किलोमीटर अंतर आहे. हनोई नॉर्थ ला आहे. व्हिएतनाम समजून घेण्यासाठी एकदा स्वतंत्रपणे इकडेही जावे लागेल. जुन्या काळातील अनेक वास्तू आणि घटना या भागात असल्याचे गाईडने सांगितले.

रक्तरंजित, अवहेलनाग्रस्त आणि हलाखीचा इतिहास पाहता हा देश वेगाने बदलतोय. आम्ही आता प्रगतीच्या वेगावर स्वार आहोत, स्वतंत्र आहोत ही जाणीव या लोकांमध्ये जाणवते. एकच राजकीय पक्ष आहे तो म्हणजे व्हिएतनाम कम्युनिस्ट पार्टी. आणि त्याला बहुमत आहे. केवळ पर्यटन हा उत्पन्नाचा हा एकमेव स्रोत नाही, एक्स्पोर्टमध्ये मोठी उलाढाल असते. यांच्या vin fast नावाच्या इलेक्ट्रिक आणि गॅसलीन कारला जास्त मागणी आहे.

भारत हे विकसनशील राष्ट्र आहे, ज्याला व्हिएतनाम फॉलो करत आहे. भारत सरकारशी आम्ही चांगले संबंध ठेवून आहोत कारण आम्हाला त्या वेगाने प्रगती करायची आहे, असे टॉम हुइंग (tom ngong) नावाचा गाईड आम्हाला सांगत होता. "सध्या युक्रेन-रशियात जे चालले आहे, ते तिथल्या सामान्य जनतेला नको आहे. त्यांना मोकळ्या हवेत श्वास घ्यायचाय, शाळेत जायचंय. प्रगती करायचंय, युद्ध हा योग्य मार्ग नाही. एक दिवस हे सगळं शांत होईल आणि पुन्हा तोच मार्ग पत्करावा लागेल..." असेही तो म्हणाला.

इथले लोक अत्यंत नम्र आहेत, आपल्या कामात मग्न राहतात. शाळा अद्यावत आहेत. इंडियन रुपीज आणि डॉलरच्या तुलनेत करन्सी खूपच स्वस्त आहे, परंतु त्यामनानेच तिथली महागाईही आहे. आपला एक रुपया म्हणजे तिकडचे २८७.७४ डाँग आणि एक डॉलर म्हणजे जवळपास २३ हजार ६४२.५० डाँग. आपल्या त्यांच्या घड्याळाच्या वेळेत दीड तासांचे अंतर आहे.

व्हिएतनाममधील मेकाँग Mekong आयलंड पाहण्यासारखा आहे. आयलंडचा देखील उत्पादकतेसाठी असा वापर केला जाऊ शकतो हे पाहून थक्क व्हायला होते. जवळच जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ब्रिजही आहे. खोबऱ्यापासून बनवले जाणारे पदार्थ इथे पाहता आले. छोट्याश्या ओढासदृश्य नाल्यातून बोटीचा प्रवास रोमांचकारी होता. हे नाव चालवणाऱ्या दोन्ही बाजूला वल्हे मारणाऱ्या महिलाच होत्या.

इथे उजव्या बाजूने गाड्या चालतात. रस्त्यावर दिसणाऱ्या गर्दीत महिलांचे प्रमाण जास्त आहे. कोणत्याही व्यवसाय, नोकरी, बाजारपेठ व महत्वाच्या जागांवर महिलाच आहेत. स्त्री-पुरुष प्रमाणात महिला जास्त आहेत आणि कुटुंबाची जबाबदारी त्याच घेतात. इथे हेल्मेट सक्ती आहे. फोर स्ट्रोक गाड्या चुकूनही दिसल्या नाहीत, जास्त गाड्या स्कुटीसारख्याच. किंबहुना दुचाकीवरून प्रवासी वाहतूक व्यवस्थाही आहे.

एकाही चौकात ट्राफिक पोलीस दिसणार नाही की ट्राफिक सिग्नलवर सातत्याने हॉर्न वाजवणारे लोक दिसणार नाहीत. अत्यंत भरधाव वेगाने गाड्या चालवणारे चालक नाहीत की रस्त्यात सिग्नलवर कसला गोंधळ नाही. एकदा तर हॉटेलच्या बाहेर पार्किंगची सोय नव्हती आणि अजून काही लोक येणार होते, तेवढ्या वेळेत नियम मोडून तिथेच रेटून गाडी पार्क न करता ड्रायव्हरने आम्हाला दोन किलोमीटर वेढा मारून आणल्याचा अनुभव आम्ही घेतला. दोन रस्त्याच्या मधोमध छान पद्धतीने झाडांची लागवड करून ती आकर्षकरित्या सजवण्यात आली आहेत.

रस्ता आणि वाहतुकीची एक वेगळीच शिस्त सगळीकडेच अनुभवायला मिळाली. हे सगळे असे आहे म्हणजे स्वच्छतेवर वेगळे बोलायला नको, महिला घरात ज्या पद्धतीने स्वछता ठेवतात, तसा प्रकार सार्वजनिक ठिकाणीही इकडे अनुभवाला येत राहतो. हॉटेलांमध्ये जेवणाच्या टेबलावर रिकामी भांडी जास्त काळ पडून राहत नाहीत. दर दोन मिनिटात एखादी गोड पोरगी टेबलावर येऊन जाणारच.

काही हवे-नको विचारणार आणि रिकामे भांडे दिसले की आधी आपली परवानगी घेणार आणि ती जागा रिकामी करणार. किती छान वाटते हे सगळे. पण तुलना करण्यात काही अर्थ नाही, ही शिस्त मुळातून येते आणि आपल्याकडे त्यासाठी किती वेळ जाणार आहे माहीत नाही.

बाहेरच्या भेटीदरम्यान तंदूर आणि saffron या दोन इंडियन हॉटेलमध्ये गेलो होतो. बॅकग्राऊंडला अरिजित सिंगच्या आवाजातील मधुर गाणी आणि मधुर शाकाहारी जेवण खाताना आपण आपल्या देशापासून खूप लांब आहोत, याची जाणीवच होऊ दिली नाही.

नाईट सिटी लाईफ पहायची म्हणून आम्ही बोवेन नावाच्या एका ठिकाणाला रात्री उशिरा भेट दिली. पब, डान्स बार पाहिले. पर्यटन क्षेत्र म्हणून येथे वेश्या व्यवसायही चालतो. बहुतांश महिलांचे चेहरे, उंची जवळपास दिसते. गाईड लोक मात्र जपून व्यवहार करण्याचा सल्ला देतात. काही मुली प्रचंड मेकअप करून चौकात, पबच्या बाहेर उघडपणे अनोळखी पुरुषांना बोलवत असताना आणि 'चलण्याचा' आग्रह करताना दिसत होत्या.

पोलिसांची एक गाडी सतत ये-जा करताना दिसत होती, ज्यात गाडी चालवायला महिला पोलीसच होती. याचठिकाणी मला दिसलेली आणखी एक गोष्ट म्हणजे एका चौकात छोटे म्हणजे अगदी छोटेसे एक मंदिर होते जे एका विशिष्ट उंचीवर अँगलवर बसवण्यात आले होते. त्यात गौतम बुद्धांची मूर्ती होती. येणाजणारे सगळे लोक विशेषतः महिला तिथे नमस्कार करून पुढे जात होत्या. त्यात या तरुणीही होत्या. याविषयी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला; पण आपली भाषा काही त्यांच्यापर्यंत पोचली नाही. त्यांची व्हिएतनामी भाषा आणि आपली मोडकीतोडकी इंग्लिश याचा कसलाही ताळमेळ जुळत नव्हता.

जगातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या (कलकत्ता मधील पहिले आहे) पोस्ट ऑफिसला भेट दिली. इथे पर्यटकांना फ्री मध्ये पोस्ट कार्ड दिले जात होते, ज्याच्या मागच्या बाजूला पोस्ट ऑफिसच्या भल्या मोठ्या इमारतीचा फोटो होता आणि त्यावर संदेश लिहून ते कार्ड आपणाला हव्या असलेल्या कोणत्याही पत्त्यावर ते पाठवण्याची सोय होती! नाममात्र खर्चात.

जवळच मोठे चर्चही Notre Dame Cathedral होते पण नूतनीकरण काम सुरू असल्याने आम्हाला ते पाहता आले नाही. याशिवाय बेन टेन मार्केट (Ben Thanh Market/Saigon square), कंपनीने अरेंज केलेले कन्व्हेन्शन, IndoChina queen cruise वरील गाला डिनर, Vung Tau beach वरील भेट, Ho may पार्क याठिकाणच्या भेटीही वेगळा आणि भरभरून आनंद देणाऱ्या होत्या.

व्हिएतनामला जाण्यापूर्वी हा देश बुद्धिस्ट असल्याचे वाचले होते. त्यामुळे बुद्धाच्या मूर्तीचे भव्यदिव्य असे काहीतरी पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती, पण ती झाली नाही. ते नॉर्थ व्हिएतनामला नक्कीच असेल. पुन्हा केव्हातरी तो योग जुळून येईल! आणखी एक, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे आहे असेही गुगलवर समजले होते.

तिकडे जाता येईल म्हणून गाईडकडे चौकशी केली; परंतु हा पुतळा हटवून त्याजागी आता नव्याने मोठी इमारत उभारण्यात आल्याचे त्याने सांगितले. 'एचडीएफसी"चे ब्रँच मॅनेजर संतोष म्हेत्रे (कोल्हापूर) आणि भारत बोंबले (चाकण) यांची संपूर्ण प्रवासात चांगली 'कंपनी' मिळाली. आयुष्यभर न विसरू शकणारे मोलाचे क्षण या प्रवासात त्यांच्यासोबतीने जगता आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com