
"असं म्हणतात की माणूस गेल्यावरच स्मशानात जाव लागतं आम्ही मात्र आम्हाला जिवंतपणे स्वतःला इथे ठेवून घेतलं आहे..." असे पुण्यातील कैलास स्मशान भूमी मध्ये काम करणाऱ्या लता जाधव म्हणतात.
सर्वत्र दिवाळी यंदा उत्सवात साजरी केली जात आहे. तब्बल दोन वर्षांनंतर या सणवार निर्बंध नसल्यामुळे सगळीकडे चैतन्याचे वातावरण आहे. एकीकडे तुम्ही आम्ही दिवाळी हा सण कुटुंबासमवेत साजरी करत असतो मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मात्र सण असला तरी सुद्धा त्यांचे काम चोख बजावत असतात. स्मशान भूमी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी कशी असते याचा कधी विचार केलाय? दिवाळीच्या दिवशी स्मशान हा शब्द जरी उच्चारला तरी "असं अभद्र बोलू नको" असं पटकन कोणीतरी आपल्याला सांगतं.
पुण्यातील कैलास स्मशानभूमी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी आम्ही थेट लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भेट घेतली. निमित्त होतं जिकोनी फुड्स या सामाजिक संस्थेकडून इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचे फराळ वाटपाचा कार्यक्रम. इथे काम करणाऱ्या लोकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी पुण्यातील सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. गेल्या ३ वर्षांपासून जिकोनी फुड्स ही सामाजिक संस्था स्मशानभूमी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी करते.
जिकोनी फुड्सच्या संचालिका रॉनीता घोष यांचा खाद्य पदार्थांच्या व्याव्यासाय आहे. २ वर्षांपूर्वी घोष यांनी पुण्यातील ससून हॉस्पिटल मध्ये दाखल असलेल्या कोविड रुग्णांच्या नातेवाइकांना जेवणाचे डब्बे पाठवायला सुरुवात केली होती. आजही मुंबई, पुणे सारख्या ठिकाणी त्या स्वतः जाऊन पदपथावर रहाणाऱ्या गरीब कुटुंबाला अन्न धान्य देऊन मदत करतात.
या कार्यक्रमादरम्यान ललित जाधव यांची भेट झाली. ललित, कैलास स्मशानभूमी मध्ये गेल्या १२ आहे वर्षांपासून ऑपरेटर आहेत. "दिवाळीच्या काळात कोणी व्यक्ती दगावला तर आम्ही सण सोडून इथे येतो कारण ते आमचे कर्तव्य आहे आणि अत्यावश्यक सेवा असल्यामुळे आधी प्राधान्य कामालाच," असे ललित सांगतात.
कोविड काळाची आठवण सांगताना, ललित यांचे मन गहिवरून गेले, "कोवीडचा काळ भयानक होता. दिवसाला ३०-४० मृतदेह अंत्यविधीसाठी येत होते. ते बघून मन अगदी सुन्न व्हायचे. देवाला मी एवढीच प्रार्थना करायचो की आता थांबावं."
"सणासुदीच्या दिवशी स्मशानात जाऊ नका असे लोक सहज बोलून जातात पण दिवाळीच्या काळात सगळे दुकान, काम बंद करता येतात पण मृतदेह असे ठेऊन चालत नाहीत ना साहेब! दिवाळी असो किंवा इतर सण, ड्युटीला प्राधान्य द्यावेच लागते," असे मृतदेह दहन करण्याचे काम करणारे किशोर क्षीरसागर सांगतात.
"असं म्हणतात की माणूस गेल्यावरच स्मशानात जाव लागतं आम्ही मात्र आम्हाला जिवंतपणे स्वतःला इथे ठेवून घेतलं आहे. माझ्या नातवांना माहिती आहे की, त्यांची आजी स्मशानात काम करते. काही लोकं स्मशानात यायला खूप घाबरतात. काही जण हात पाय धुतात, अंघोळ करतात आम्ही असे काही करत नाहीत आम्ही जेवण पण इथेच करतो. आम्हाला सण काय आणि इतर दिवस काय सगळे सारखेच," इथे साफसफाईचे काम करणाऱ्या लता जाधव सांगतात.
दिवाळीच्या दिवशी फराळ वाटपाच्या कार्यक्रमानिमित्त हे मंडळी भेटली आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान आणि सणाचा आनंद द्विगुणित झाला असल्याचे चित्र स्पष्ट दिसत होतं. दिवाळीच्या झगमटापासून कोसो दूर असलेल्या स्मशानभूमीत अहोरात्र सेवा देणार्या या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.