यशापयश जोखताना आणि दर्जा : प्रतिष्ठा राखताना

Doctor Satish Karande article on measuring success and quality
Doctor Satish Karande article on measuring success and quality

नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षांचा निकाल लागला. त्यामध्ये यशस्वी झालेल्या सर्व विध्यार्थ्यानी मिळविलेले हे यश फार मोठे मेहन तीने मिळविलेले आहे. त्यामुळे त्यांचे सर्वानीच हार्दिक अभिनंदन केले पाहिजे. या पूर्व परीक्षेला एकूण ३६ हजीार ९९० विद्यार्थी बसलेले होते. त्यापैकी ४२० विद्यार्थ्यांना यश मिळालेले आहे. हे प्रमाण एकूण परीक्षार्थींच्या ०.००११ टक्के एवढे भरते. या परीक्षेच्या मुख्य परीक्षेला पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही अवघे ०.०१८ टक्के एवढे होते. थोडक्यात या परीक्षेला अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे खूपच मोठे आहे. ज्यांना पूर्व परीक्षेला यश मिळाले, मुख्य परीक्षेला पात्र झाले काही मुलाखातीसाठीसुद्धा पात्र झाले, काही जणांना फारच कमी गुणाच्या अंतराने अपयश आले, काही जणांनी प्रथमच अशी परीक्षा दिलेली असणार आहे.
अशा सर्व विद्यार्थ्यांच्या समोर पुढील परीक्षेची तयारी करणे हे ध्येय असणार आहे. परंतु आपल्या आजच्या चर्चेचा विषय हा या मधील सातत्याने अपयश येणाऱ्या विध्यार्थ्यांना आयुष्यात पुढे कोणते ध्येय असले पाहिजे याविषयी आपली एकूणच व्यवस्था काही सांगू शकते का? हा आहे. एकूण पदवीधर झालेल्यापैकी फक्त ४ टक्के पदवीधराना सरकारी नोकरी मिळू शकते. त्यामुळे सरकारी नोकऱ्या कमी आहेत. हे गृहीतक मनात पक्के करून विद्यार्थी दशेपासूनच त्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीशिवायच्या करियर संधी हा पर्याय दिला पाहिजे. असा पर्याय देण्याची जबाबदारी ही आपल्याकडील विद्यापीठांची आणि त्यानंतर शासनाची आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्याच वेळेस असा पर्याय देण्याचा विचार आणि कुवत सुद्धा आपल्या विद्यापीठाकडे का नाही? ती केवळ परीक्षा घेणारी केंद्रे का ठरत आहेत. याचा फार
गंभीरपणे शासनाने विचार केला पाहिजे.
दुसऱ्या बाजूला अशा परीक्षा देऊन त्यामध्ये यश मिळावे आणि आपला एक दर्जा समाजात असावा, अशी फार मोठी आकाक्षा अशी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांमध्ये असते. त्यांच्या पालकामध्ये सुद्धा ती तीव्र स्वरुपात असते. आपला असा दर्जा, प्रतिष्ठा असावी ही भावना प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. त्यामध्ये अजिबातच गैर नाही. परंतु अशा परीक्षांना मिळालेले यशच फक्त आपल्याला दर्जा आणि प्रतिष्ठा देऊ शकते, अशी भावना असणे मात्र अतिशय गैर आणि तेवढेच गंभीर असे आहे. दर्जा आणि प्रतिष्ठेच्या एवढ्या मर्यादित व्याख्या करण्यामध्ये आपली समाजव्यवस्थेचा फार मोठी भूमिका आहे आणि त्या मध्ये बदल करणे तातडीचे बनत आहे. कारण अशा समाजभूमिकेमुळे त्याचा फारमोठा दबाव विद्यार्थ्यांवर येत असतो याचे भानही नसते. त्या दबावाचे भांडवल करून बक्कळ पैसा मिळवणारी एक व्यवस्था तयार होत आहे तो आणखी वेगळा आणि स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.
दर्जा आणि प्रतिष्ठा याच्या सीमित व्याख्या कशा असतात. याचा एक अनुभव मला इथे नोंदवावा असे वाटते. पाच वर्षापूर्वी एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त सांगली, सातारा भागामध्ये जाणे झाले. त्यावेळेस नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागलेले होता. एका निमशहरी भागातील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्याला त्यामध्ये यश मिळाले होते. त्याची त्या संपूर्ण शहरामध्ये होर्डिंग्ज लागलेली होती. कार्यक्रमाचे ठिकाणीही मोठ्याप्रमाणात त्याबाबतच चर्चा सुरु होती. विशेषतः त्या महाविद्यालायाचेही कौतुक होत होते. हे सर्वच उत्सुकता वाढविणारे असे होते. त्यामुळे परतीच्या प्रवासामध्ये मला त्या महाविद्यालाला भेट देणे आवश्यक वाटले. त्याप्रमाणे मी भेट दिली. तिथेही अगदी उत्सव स्वरूपामध्ये त्या विद्यार्थ्याचे यश साजरे झाले होते. याच्या खाणाखुणा दिसत होत्या.
चर्चेतून त्या जाणवतही होत्या. महाविद्यालाची स्थापना ४० वर्षापुर्वीची, असे यश मिळाल्याचे हे पहिले उदाहरण, त्यामध्ये महाविद्यालयाची, शास्त्रीय पातळीवरून तपासले तर अतिशय नगण्य अशी भूमिका. यशामध्ये सातत्य म्हणावे तर तेही फारसे दिसत नव्हते. एक विशेष म्हणजे त्या महाविद्यालालायला अर्थ व समाजशास्त्राचा पीजी अभ्यासक्रम होता. चर्चेच्या ओघामध्ये असे समजले की त्या विभागातील एक विद्यार्थी पुढे पीएचडी झालेला, त्याला दुष्काळ दारिद्र्या याचा अभ्यास करण्यासाठी एका परदेशी विद्यापीठाची विशेष पाठ्यवृत्ती मिळाली होती. त्याचे हे यश मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर साजरे झाले नसेल हे जाणवत होते. महाविद्यालयाचा विद्यार्थी आयएएस झाल्यामुळे, आता प्रवेशावाचून बंद पडतील की काय असे काही विभागाच्या प्रवेशाची चिंता मिटली याचा आनंद प्राचार्यांच्या बोलण्यात जाणवत होता. आपल्या कार्यकाळात असे यश मिळाले त्यामुळे
आपल्यावर संस्थाचालक ही खूष आहेत हेही त्यांनी बोलण्याच्या ओघात सांगून टाकले. हे असे नेहमी होते. कारण आपल्या प्रतिष्ठेच्या आणि दर्जाच्या सीमित व्याख्या. सध्याच्या करोनाकालामध्ये केरळ सरकारची संपूर्ण जगभर वाहवा होत आहे. त्यामध्ये तेथील आरोग्य कर्मचारी यांची भूमिका फार महत्वाची अशी आहे. त्यांची भूमिका महत्वाची असणार आहे. हे ओळखून तेथील आरोग्य मंत्र्यांनी अगदी आशा वर्कर यांचे बरोबर व्यक्तिशः सवांद साधला. त्यांची ही कृती आशा वर्कर ही या व्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे, हे मान्य करून त्यांना दर्जा देऊन गेली. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. समाज म्हणून आपण दर्जा आणि प्रतिष्ठा देण्यामध्ये फार मोठी गल्लत करतो. लहान मुले सांभाळणाऱ्या आंगणवाडी सेविका, त्यांना मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिला, आशा वर्कर, अगदी रोज पाणी पुरवठा करण्यामध्ये महत्वाची भूमिका असणारा ग्रामपंच्यातीचा शिपाई असे कितीतरी जण महत्वाची भूमिका निभावत असतात. परंतु त्याची नोंद आपला समाज घेताना दिसत नाही.
अशा स्पर्धा परीक्षां देणाऱ्या विद्यार्थ्यांची हमखास एक भूमिका असते की मला अधिकारी होऊन समाजाची सेवा करायची आहे. त्यांची ही भूमिका अभिनंदन करावी अशीच असते. परंतु चांगल्या समाजनिर्मितीसाठी चांगले शेतकरी, उद्योजक,राजकारणी, कार्यकर्ते, गायक, चित्रकार इ. अशा सर्वांचीच गरज आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चांगल्या माणसानीच चांगला समाज बनतो, त्यामुळे व्यवस्थेमध्ये चांगली माणसे तयार होणेही महत्वाचे असेच. त्याची पहिली मुख्य जबादारी मात्र शिक्षण व्यवस्थेची हे नेहमी आपल्या व्यवस्थेने लक्षात घेतले पाहिजे. जाताजाता अशा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांच्या पालकांशी चर्चा करताना त्यांनी त्यांचे एक स्वप्न सांगितले. मला माझा मुलगा लाल दिव्याच्या गाडीतून फिरताना पाह्यचा आहे, त्याच्या गाडीचा दरवाजा उघडण्यासाठी शिपाई असला पाहिजे. त्या पालकाचे हे एक स्वप्न किती प्रश्न निर्माण करणारे आहे. पहिले त्या पाल्यावर याचा किती मोठा दबाव येईल? त्याच्या क्षमतांची चाचपणी केली आहे का? प्रयत्ने वाळूचे कान रगडीता हे नेहमीच खरे होते. का? दर्जा आणि प्रतिष्ठा मिळविण्याचा एवढा एकच मार्ग शिल्लक आहे का? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लोकशाही व्यवस्थेमध्ये असे सरंजामशाही स्वरुपाची स्वप्ने पाहणे संमत असते का? हा शेवटचा प्रश्न हा अर्थातच समाजाला आणि त्यातून बनलेल्या शासकीय व्यवस्थेला!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com