सह्याद्रीचा माथा : नाशिककरांचे लाडके ‘रोड’करी

nitin gadakari
nitin gadakariesakal

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि नाशिकचे ऋणानुबंध जुने आहेत. गडकरीसाहेब नाशिकमध्ये आले म्हणजे इथे रमतात. जुन्या मंडळींना भेटून आठवणींना उजाळाही देतात, कार्यक्रमात सहभागी होतात. गडकरींचे आणि त्यांच्या भाषणांचे नाशिकमध्ये भरपूर चाहते आहेत. गडकरी कसले हे तर ‘रोड’करी आहेत, असं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हटले होते. राज्यासह-देशाला हा अनुभव अनेकदा आलाय. पण, नाशिककरांना अलीकडेच असा अनुभव आला. गडकरींच्या एका ट्विटनंतर नाशिकचा प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागण्यावर शिक्कामोर्तब झाले. नजीकच्या कालावधीत नाशिककरांना मिळालेलं हे दुसरं मोठं गिफ्ट आहे. काही दिवसांपूर्वी नमामि गोदा प्रकल्पाला जलशक्ती मंत्रालयाने संमती दिली आणि आता नितीन गडकरी यांनी द्वारका ते नाशिक रोड उड्डाणपुलाला भारतमाला प्रोजेक्ट अंतर्गत मंजुरी दिली. नाशिककरांना ही मोलाची भेट दिल्याबद्दल गडकरी यांचे आभार मानायलाच हवेत.....

शहर बससेवेमुळे नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. सुरत-चेन्नई ग्रीनफिल्डचा २७ किलोमीटरचा रस्ता नाशिकमधून जाणार आहे. उडान योजनेद्वारे अहमदाबाद, बेंगळुरू, पुणे, इंदूर, बेळगाव, हैदराबाद ही शहरं नाशिकशी जोडली गेली आहेत. दोन हजार कोटींचा निओ मेट्रो प्रकल्प नाशिकमध्ये आकारास येणार आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबईचं अंतर अजून कमी होईल. मराठवाडा, विदर्भाची कनेक्टिविटी वाढेल. त्यात आता द्वारका ते नाशिक रोड उड्डाणपुलामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवरचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. शिवाय नाशिकमधील हवेची गुणवत्ता टिकून राहण्यासाठीही मदत होईल. या उड्डाणपुलासाठी साधारण ५०० कोटी रुपयांचा निधी मिळणे अपेक्षित आहे. नुकताच आडगावपर्यंतचा उड्डाणपूल खुला झाल्याने महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे.

दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या गोदावरीच्या जलप्रदूषणाचा प्रश्‍न सध्या अत्यंत गंभीर बनला आहे. त्यामुळे नमामि गोदा प्रकल्पाला मिळालेली मंजुरी गोदावरीच्या शुद्धीकरणासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. सध्या नमामि गोदेच्या डीपीआरचे काम सुरू आहे. साधारण या प्रकल्पांतर्गत एक हजार ८०० कोटी रुपयांचा निधी नाशिकला मिळणार आहे. या निधीमधून मलनिस्सारण वाहिन्यांची क्षमता वाढविणे, नवीन मलवाहिन्या टाकणे, जुन्या मलवाहिन्यांची दुरुस्ती करणे, गोदाघाटाची निर्मिती करणे, गोदावरी सौंदर्यीकरण या बाबी करणे प्रस्तावित असेल. नमामि गोदा प्रकल्प स्वच्छ गोदावरीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

यंदाच्या उड्डाणपुलाला किनार होती, ती श्रेयवादाची. नितीन गडकरी शिवसेनेला उड्डाणपुलाचे श्रेय देणे शक्य नाही. ते कच्च्या गुरूचे चेले नक्कीच नाहीत. जे गडकरी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रस्ते कामात शिवसैनिक अडथळे आणतात, असं ऑनरेकॉर्ड लिहितात, ते नाशिकमधील उड्डाणपुलाचे श्रेय शिवसेनेला खचितच देणार नाहीत. शिवसेनेच्या पाठपुराव्याने जर हे काम झाले असते, तर गडकरींनी ट्वीट न करता संबंधितांना पत्र लिहून काम झाल्याचे सांगितले असते. पण, असे होणे केवळ अशक्य आहे. दुसरीकडे केंद्राकडून नाशिकच्या वाट्याला चांगले प्रोजेक्ट येत असतील, तर नाशिक भाजपनेही आपसांतील वाद थांबवायला हवेत. बऱ्याच कालावधीनंतर नाशिकला भरभरून मिळत असताना प्रतिमा मलीन होणार नाही, याची काळजी स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी घ्यायला हवी. घंटागाडी, औषध खरेदी अशा विषयांतील सुरू असलेले जाहीर वाद मिटवणं नक्कीच श्रेयस्कर ठरू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com