esakal | होय, भाजप-मनसे युती शक्य आहे…
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray, Devendra Fadanvis

होय, भाजप-मनसे युती शक्य आहे…

sakal_logo
By
डॉ.राहुल रनाळकर

नाशिक ही प्रयोगाची भूमी आहे. राजकीयदृष्ट्या राज्याला आकलन न झालेल्या मनसेला नाशिककरांनी सत्तेच्या चाव्या दिल्या होत्या. अगदी तीन आमदारही दिले. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना अलीकडे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. तिन्ही पक्षांचा संसार बरा चाललाय. मात्र या राज्यस्तरीय बदलामुळे मनसेने झेंडा बदलला, हिंदुत्वाची भाषा सुरू केली. मनसेच्या या बदलाचा त्यांना फायदा होणार की तोटा, हे पुढे स्पष्ट होईलच. पण नाशिकमधील आणि राज्यातील अन्य महापालिकांमधील आगामी महापालिका निवडणुका त्यांची ही भूमिका तपासून पाहण्यासाठी ‘ट्रायल रन’ ठरणार आहेत. भाजपशी सलगी करण्याचे मनसेचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत. भाजप प्रदेशाध्यक्षांनी मनसेसोबत युतीच्या संदर्भात काही विधानं केली. परप्रांतीय मुद्यावर भूमिका स्पष्ट केल्यास मनसेसोबत युतीचा विचार करू, असे संकेत भाजपने दिले. कुठलाही मुरब्बी पक्ष अशी विनाकारण वक्तव्य करणार नाही. त्यामुळे भाजप-मनसे एकत्र येण्यावर विचार नक्कीच होऊ शकतो.

राज्यस्तरावर भाजप-मनसेसोबत जाईल की नाही, हे अद्याप सांगता येणार नाही. नाशिक महापालिकेत मात्र हा प्रयोग नक्कीच होऊ शकतो, त्यासाठी जमीन भुसभुशीत करण्याचं काम भाजपनं सुरू केलंय. नाशिक शहरात भाजपची प्रतिमा मधल्या काळात बऱ्याचअंशी खराब झाली. नाशिककरांना दिलेली आश्‍वासने हवेत विरली. आत्तापर्यंत खरंतर विकासकामे पूर्ण होऊन त्यांचं लोकार्पण अपेक्षित होतं. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नारळही फुटलेले नाहीत. दुसरीकडे शिवसेनेचं तगडं आव्हान भाजपसमोर आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस नाशिकमध्ये निवडणूकपूर्व युती करून लढतील का, या प्रश्‍नाचं उत्तर सध्यातरी नकारार्थी आहे. शिवाय अजून वॉर्डरचना अंतिम व्हायची आहे. सत्तेचा सारिपाट मांडणं मात्र सर्वच पक्षांकडून सुरू झालंय. निवडणूकपूर्व वेगवेगळं लढून नंतर आघाडी करण्याचा पर्याय महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांसमोर असेल. मात्र, निवडणुकीत उमेदवारांची पाडापाडी आणि मतविभागणी रोखण्याचं अतिकठीण काम या तिन्ही पक्षांना करावं लागेल. त्यावरच या तिन्ही पक्षांचं यश अवलंबून असेल.

भाजप-मनसे मात्र निवडणूकपूर्व एकत्र येण्यास मोठा वाव आहे. भाजपसाठी मनसे सोबत आल्यास फायदा होईल, तर मनसेला जीवदान मिळेल. शिवसेनेचा नाशिक शहरातील जोर पाहता भाजपकडून मनसेला निवडणूकपूर्व सोबत घेण्यावर गंभीरपणे विचार होऊ शकतो. शिवसेनेने जळगाव महापालिकेवर झेंडा फडकवल्यावर त्यांची रणनीती आता नाशिकच्या दिशेने तीव्र आहे. भाजप-मनसे निवडणूकपूर्व एकत्र आल्यास समोरच्या तिन्ही पक्षांची गोची होईल. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांनाही निवडणूकपूर्व एकत्र येण्यावर विचार करावा लागेल. काही पत्ते मात्र ऐनवेळीच खुले होतील. निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलेलं असलं तरी प्रत्यक्ष निवडणुकीला अजून वेळ आहे. एकत्र येण्याची वस्तुस्थिती समजण्यास कदाचित माघारीच्या दिवसापर्यंत वाट पाहावी लागेल. पण आतल्याआत खलबतं करून भाजप-मनसे विरोधकांना खिंडीत नक्कीच गाठू शकेल. मनसे नाशिकमध्ये सध्या कमकुवत स्थितीत आहे. मनसेची जमेची बाजू म्हणजे कार्यकर्त्यांची फौज. नेत्यांचा अभाव असला तरी मुबलक कार्यकर्त्यांच्या जोरावर नवे चेहरे देण्याची क्षमता मनसेत आहे. शिवाय भाजप-शिवसेनेतून नाराजांची मोठी फौज मनसेमध्ये पुढच्या काळात दाखल होऊ शकते. बंडखोरांच्या आकडेवारीत यंदाच्या निवडणुकीत विक्रम होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. बंडखोरांना सामावून घेण्यासाठी मनसे हा उत्तम पर्याय ठरेल. त्यामुळे सगळेच पक्ष इच्छुकांना शेवटपर्यंत तिकिटाचं गाजर दाखवत राहतील, हे नक्की. सत्ता वाचविण्याच्या प्रयत्नात भाजपसाठी मनसे हा फायद्याचा सौदा ठरू शकतो. मात्र हे दोन्ही पक्ष खुलेपणाने सोबत येणार की आतल्याआत हातमिळवणी करणार हा प्रश्‍न आहे...

हेही वाचा: राज ठाकरे आश्वासक नेते; त्यांची पन्नास भाषणे ऐकणार : चंद्रकांत पाटील

loading image