esakal | भुजबळीबाणा!!
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal.

भुजबळीबाणा!!

sakal_logo
By
डॉ. राहुल रनाळकर

नाशिकचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून झालेली मुक्तता नाशिककरांसाठी आणि भुजबळसमर्थकांसाठी निश्‍चितच एक मोठी घटना म्हणावी लागेल.

भुजबळांची कारकीर्द तशी सुरवातीपासूनच झंझावाती स्वरूपाची राहिली आहे. शिवसेनेचे नगरसेवक ते महापौर, आमदार आणि पुढे मंत्री... मंडल आयोगाच्या मुद्द्यावर शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्याची भूमिका भुजबळ यांनी शिवसेना सोडताना मांडली होती. माझगावमध्ये बाळा नांदगावकर यांनी केलेला त्यांचा पराभव भुजबळांच्या जिव्हारी लागला होता. मात्र, भुजबळांमधील अस्वस्थता आजवर दोनदा ठळकपणे समोर आली आहे. पहिल्यांदा शिवसेना सोडल्यावर ते काही काळ नाशिकमध्ये राहिले तेव्हा… आणि दुसऱ्यांदा म्हणजे आघाडी सरकार गेल्यावर ‘ईडी’ चौकशीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर… विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद भूषविताना त्यांनी सरकारविरोधात विविध मुद्यांवर रान उठवलं होतं. ओबीसींना एका छत्राखाली आणण्यासाठी देशभर दौरे केले, मेळावे घेतले. दिल्लीतील मेळाव्याला दहा लाख ओबीसी समाज बांधवांची उपस्थिती भुजबळांच्या देशव्यापी नेतृत्वावावर शिक्कामोर्तब करणारी ठरली. मराठा-ओबीसी आरक्षणात भुजबळ यांना विनाकारण ओढलं गेलं. पण अलीकडेच छत्रपती संभाजीराजेंच्या समक्ष भुजबळांनी नाशिकमध्येच या वादाला पूर्णविराम दिला, हेदेखील उत्तमच झालं.

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर भुजबळांनी नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यामुळे ठाकरे कुटुंबाशी त्यांचा दुरावा वाढला. पुढे खटला मागे घेतल्यानंतर ठाकरे कुटुंबाशी त्यांचे पुन्हा ऋणानुबंध निर्माण झाले, जे आजतागायत टिकून आहेत. ज्येष्ठ नेते नारायण राणेंना जे अजूनही जमलेलं नाही, ते बरेच वर्ष आधी भुजबळांनी साधलं होतं, हे नमूद करायला हवं. राजकीयदृष्ट्या मात्र भुजबळ आणि शिवसेना यांच्यातील शाब्दिक बाण अजूनही अधूनमधून सुरू असतात. लोकसभा निवडणुकीत एकदा स्वतः भुजबळांचा, तर दुसऱ्यांदा पुतणे समीर यांचा पराभव झाला. नांदगावमध्येही पुत्र पंकज यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवांसाठी शिवसैनिकांनी प्रचंड जोर लावला होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. कदाचित शिवसेनेला भुजबळांची गरज पडू शकेल, अशी शक्यता निर्माण होऊ पाहतेय.

पुराचं पाणी दिंडोरीतून थेट नांदगाव, येवल्याकडे वळवणं हा या परिसरासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. हे यश भुजबळांच्या चाणाक्ष बुद्धीमुळे मिळवता आलं आहे, हे विसरून चालणार नाही. नाशिक शहरातून जाणारा उड्डाणपूल आणि नाशिक-पुणे चौपदरीकरणाचे काम हे नाशिककरांना भुजबळांनी दिलेली अनमोल भेट आहे. या यशाचा उल्लेख यासाठी की, भुजबळांच्या निर्णयक्षमतेची आणि दूरदृष्टीची नाशिककरांना अजूनही गरज आहे. छगन भुजबळ यांचा मूळ स्वभाव आक्रमक असला, तरी कलेचे ते भोक्ते आहेत. समाजातील सर्व घटकांबद्दल त्यांना कृतिशील सहानुभूती आहे. गाजावाजा न करता मदत करणे, मदतीला धावून जाणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. आता महाराष्ट्र सदन प्रकरणातून मोकळे झाल्याने भुजबळांवरील अनामिक दडपण नक्कीच कमी झालं असेल. आक्रमक भुजबळीबाणा मधल्या काळात थोडा क्षीण झाला की काय, अशी भावना निर्माण झाली होती. नाशिककरांच्या प्रश्‍नांसाठी भुजबळांनी पुन्हा एकदा आक्रमक व्हावं, तळपती बॅट पुन्हा हाती घ्यावी, हे या निमित्तानं अधोरेखित करावेसं वाटतं… वयाच्या या टप्प्यावर अजून काय काय अपेक्षा करणार, असं ते कदाचित मिश्किलपणे म्हणतीलही, पण लोकभावनेची दखल चतुर नेत्याला घ्यावीच लागते. त्यामुळे पुढच्या काळात ते अधिक आक्रमकपणे समोर आल्यास त्यात कोणतंही आश्‍चर्य वाटायला नको…

loading image
go to top