पर्यटन क्षेत्राचे नवीन पर्व !

Tourism
Tourism

दुसऱ्या महायुद्धानंतर पर्यटन क्षेत्रावर हीच आर्थिक नामुष्की आली होती; आता पुन्हा तेच दिवस दिसत आहेत. ज्यात आर्थिक ताण सहन करणारा चित्रांमध्ये सर्वांत पुढे पर्यटन व्यवसायाचा क्रमांक आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर आर्थिक मंदी आली होती, आता पुन्हा तेच दिवस दिसत आहेत. परंतु या वेळी कोरोनामुळे ही वेळ आली आहे. पंचतारांकित हॉटेल, मध्यमवर्गीय हॉटेल व आर्थिकदृष्ट्या सोईस्कर हॉटेल हे सर्व बाधित झालेले आहेत. सर्वांनाच आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. कोणतेही असे हॉटेल नाही जे की या कोरोनाच्या सावटामुळे अंधारात गेलेले नाही. रेस्टॉरंट अजून उघडले नाहीत. यामुळे रेस्टॉरंट व्यवसाय डबघाईला आलेला आहे. मोठ्या प्रमाणावर हॉटेल व रेस्टॉरंटमधील कामगारांची कपात करण्यात आली आहे, असे चित्र दिसत आहे. व्यवस्थापनाला कामगार कपात न करण्याची वेळ येऊ नये, असे वाटत होते; पण त्यांच्यापुढे पर्याय नाही राहिला. कामगार कपात जवळजवळ 80 टक्‍क्‍यांवर गेली आहे. आणि जर असेच चालू राहिले तर अनेक हॉटेल व रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ मालक वर्गावर येणार आहे. कोरोनाचा फटका सर्वांनाच बसत आहे. त्यामुळे हे पर्यटन क्षेत्र खूपच बाधित झालेले दिसते. 

जर बघायला गेलं तर सर्वसाधारण व्यक्ती रोजच्या दैनंदिन जीवनातून वेळ काढून विरंगुळा म्हणून पर्यटन करत असते. विविध ठिकाणी जाणे, राहणे, जेवणे, नवीन नवीन जागा बघणे; हे सर्व आपल्या मनाला आनंद मिळवून देतात. पण आज कोरोनाच्या सावटामुळे याला मोठा ब्रेक लागला आहे. जगभर फिरणारा पर्यटक आज टाळेबंदीमुळे घरातच राहिला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा त्यांचे मित्र, नातेवाईक किंवा अगदी सोलो पर्यटक असला तरी त्याला पर्यटन करायच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. खरंतर 27 सप्टेंबर 2020 या जागतिक पर्यटन दिनानिमित्त जगभरातून किंवा भारतातून किंवा अगदी राज्यातून पर्यटनवाढीसाठी सोईसुविधा उपलब्ध केल्या गेल्या पाहिजेत. जेव्हा गरजा भागून पैसा उरतो, तेव्हाच माणूस पर्यटनाचा विचार करतो. आज गरजेच्या वस्तूंसाठी आणि गरजेपुरतेच खर्च केला जात आहे, त्यात काही चुकीचे नाही. तेव्हा भ्रमंती करण्यासाठी लोक स्वतःला आवर घालत आहेत. 

सध्या प्रार्थनास्थळ बंद आहेत. राज्यांतर्गत, जिल्हांतर्गत काही ठिकाणी फिरण्यासाठी जाणे अवघड होत आहे. ई-पास सेवा अजून चालू असल्यामुळे पर्यटक बाहेर पडण्यास आणि भ्रमंती करण्यास नकार देत आहेत. केंद्र व राज्य सरकारने हॉटेल व्यवसाय, रेस्टॉरंट व्यवसाय तसेच टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यासाठी सोईसुविधा द्याव्यात, कर कपात करावी, लाईट बिलामध्ये सोई द्याव्यात जेणेकरून या उद्योगाला ऊर्जितावस्था प्राप्त होईल. 

कामगार कपातीमुळे काही हॉटेल व्यवसायांना आपल्या ग्राहकांना सेवा देण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. माणूस माणसाला सेवा देतो, यातच आपली भारतीय संस्कृती अतिथी देवो भव:साठी जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. माणसे कमी असल्यामुळे आणि योग्य कौशल्य नसल्यामुळे हॉटेलचे, रेस्टॉरंट व टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाल्यांचे रेटिंग कमी होणार आहेत. आज जरी व्यवसाय चालू झाला, तरी मोठी आव्हाने या उद्योगासमोर आहेत. मालक व कामगार यांच्यामधील समन्वय साधूनच पुढील पाऊल टाकावे लागणार आहे, तरच योग्य त्या दिशेने पर्यटन क्षेत्र जाईल. आज पर्यटन क्षेत्राचे नवीन पर्व सुरू होत आहे, असं वाटतंय. 

सर्व व्यक्तींच्या खिशाला चाप लागल्यामुळे भ्रमंती मर्यादित झाली आहे. अशावेळी अनेक करोड रुपयांचे नुकसान सहन करणाऱ्या या क्षेत्रावर मोठे संकट येऊन उभा राहिले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी अपार प्रयत्न करावे लागणार आहेत. कोरोनाचे संकट अजून टळले नाही. त्यामुळे लोक मनपसंतीदार जागी जाण्यास घाबरत आहेत. तरीसुद्धा काही लोकांना फिरायची आवड असते. अशातच रेल्वेसेवा, बससेवा, गाड्या, टॅक्‍सी बंद असल्यामुळे आणि त्यावर निर्बंध असल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. हे आम्हास ठाऊक आहे, की पर्यटनाला सध्या प्राधान्य नाही, परंतु या व्यवसायावर अनेक लोकांचे जीवन अवलंबून आहे. जगात सर्वांत जास्त कामगार याच क्षेत्रात काम करतात. हॉटेल व अन्नपदार्थांशी निगडित नोकऱ्या अनेक आहेत, परंतु सध्या तर आर्थिक डबघाईमुळे नोकऱ्या मिळणे अवघड झाले आहे. स्वतःचा उद्योग काढण्यासाठी भांडवल मिळत नाही. भविष्यामध्ये हे क्षेत्र पुढे सरकेल का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खरंतर आपण जागतिकदृष्ट्या या क्षेत्राला वाचवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. पण ते होणे अवघड आहे. एकंदरीतच, जेव्हा सर्व अर्थव्यवस्था सुधारेल आणि भ्रमंती करण्याची तयारी लोक दाखवतील अशावेळी उशीर होऊ नये व हॉटेल, रेस्टॉरंट, टूर्स अँड ट्रॅव्हल एजन्सी त्याला जोडलेले सर्व व्यवसाय बंद होण्याची वेळ येऊ नये, असे वाटत आहे. 

आपण सर्व या संकटाला तोंड देऊन त्यातून एक चांगला मार्ग काढावा असं वाटत असताना, आव्हानांचे डोंगर समोर उभे आहे. त्यातूनच योग्य तो मार्ग काढायचा आहे. त्यासाठी हॉटेल मालक-चालक तसेच कामगार वर्ग, संघटना, राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी सुरक्षित व सोयीस्कर प्रणाली विकसित केली गेली पाहिजे, तरच या क्षेत्राला योग्य दिशा मिळेल. जरी आज आर्थिक मंदी असली तरी हे एक नवीन पर्व म्हणून सर्वांनी घ्यावे आणि त्यातूनच मार्ग काढावा असे वाटते. 

- ऋत्विज चव्हाण 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

महाराष्ट्र 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com