एकोहं...

EKAANTA Article By Sandeep Prabhakar Kulkarni
EKAANTA Article By Sandeep Prabhakar Kulkarni

तसा तर माणूस येतोही एकटाच आणि जातोही एकटाच. पण जीवनाच्या या प्रवासात सखे-सोबती जमा करण्याचा त्याचा हट्ट काही जात नाही आणि अनेक नातेसंबंधांच्या जंजाळात तो स्वतःला अडकवून घेतो. ‘अडकवून घेतो’ म्हटल्यापेक्षा अडकतो म्हणणे ठीक राहील. गेल्या काही दिवसांत क्वारंटाइन हा यापूर्वी कधीही न ऐकलेला आणि अवघड शब्द आता सर्वज्ञात झाला आहे. एकांतवासाच्या जवळ जाणारा हा शब्द. 

एकांत... खरेच या शब्दातच एक समाधान दडलेले असल्याचे आपल्याला जाणवते. (एकदा उच्चार तर करून पाहा). प्रत्येकाने अनुभवावी अशी एकांताची स्थिती माणसाला आयुष्याच्या विविध टप्प्यांवर हवीहवीशी वाटते. घरात एकच गलका सुरू असला की अनेकदा अस्वस्थ होते आणि आपण कुठेतरी दूर निघून जातो. एकांतात अनेक गोष्टी सापडतात. अनेक कल्पना सुचतात. समस्यांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या आपल्या मनाला अनेकदा त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही एकांतातच सापडतो. आजवरच्या आयुष्यात केलेल्या विविध कर्मांचा हिशेब अनेकदा एकांत अवस्थेतच आपले अंतर्मन मांडत असते. आयुष्यात झालेल्या चुका भविष्यात तरी हातून घडू नयेत, असा मनाचा पक्का निर्धारही याच काळात आपण करीत असतो. what I get and what I loose या सगळ्याचा उलगडा एकांतात होतो. कोरोनाच्या संकटामुळे सध्या सर्वांचेच Social Life संपुष्टात आले आहे. सुनसान रस्ते, रिकामी मैदाने, बंद दुकानांचे शटर अशी शांतता या काळात अनुभवता आली. सोशल मीडियावर जो तो सक्रिय असला तरी प्रत्यक्षात मात्र तो एकटाच असतो. मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारे मित्र-मैत्रिणींचे डीपी, फेसबुकच्या लिस्टमध्ये दाखविलेली संख्या हजाराच्या घरात असली तरी त्या अवस्थेतही तो स्वतः एकटाच असतो. आयुष्य घडविण्याच्या प्रक्रियेत माणसाला त्याचे विचार सोबत करीत असतात. त्यामुळे खरेच एखादे ध्येय साध्य करायचे असेल तर एकटेपणाचा स्वीकार करण्याची तयारी करायला हवी. 

‘जे काही करायचे असेल ते मी करणार, कोणी सोबत येणार असेल तर ठीक, नसेल येणार तर त्यापेक्षा बेहत्तर...’ अशी धमक बाळगून आयुष्यातील या टप्प्याचा स्वीकार करूनच क्रांतीची अनेक बीजे पेरली गेली आहेत. मानवी समूह, सामाजिक जीवन, नातेसंबंध या गोष्टी जशा सुखकारक आहेत, तशाच त्या अनेकदा तुमच्या प्रगतीत अडथळा करणाऱ्याही ठरू शकतात. जीवनाचा सिनेपट अनुभवत असताना फ्लॅशबॅक पाहिला की कदाचित तुमच्याही ते लक्षात येईल. त्यामुळे कुठल्याही ध्येयाकडे वाटचाल सुरू करताना तुम्ही किती मैल चाललात याला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच किंवा त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे ठरते ते तुमचे पहिले पाऊल. तुमची ती मानसिक स्थिती, ज्यावेळी तुम्ही हे दमदार पाऊल उचलले होते ती. Best Luck and Be Alone... for Achievement.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com