समाजव्यवस्थेला प्रश्‍न विचारणारा लेखक

Elder writer Madhav Kondvilkar pass away
Elder writer Madhav Kondvilkar pass away

ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार माधव कोंडविलकर यांच्या निधनाने कोकणातील वेगळे समाजजीवन शब्दांकित करणारा मोठा लेखक आपण गमावला. कोंडविलकर एका अर्थाने लोकप्रिय लेखक कधीच नव्हते. कारण लोकानुनयासाठी त्यांनी लिहिले नाही. तळागाळातील घटकांवर होणारा अन्याय, वंचितांचे जगणे, सामाजिक व्यवस्थेत संवेदनशील माणसाची होणारी कुचंबणा आणि फरफट, जातीयतेचे चटके भोगणाऱ्याच्या वाट्याला येणारे दाहक जीवन असे सारे त्यांनी भोगले होते. अत्यंत स्पष्टपणे; परंतु कोठेही आक्रस्ताळेपणा न करता किंवा मी काही विद्रोह करतोय, असा अभिनिवेश न आणता त्यांनी लेखन केले. अशांच्या वाट्याला कौतुक आले तरी लोकप्रियता नसते. अर्थात, कोंडविलकर यांना त्याबद्दल फारशी खंत नव्हती.

 कादंबऱ्या, कथासंग्रह, नाटक, शोधग्रंथ, बालसाहित्य, सम्राट अशोकाचे चरित्र अशी विपुल ग्रंथसंपदा असलेल्या कोंडविलकर यांचे ‘मुक्काम पोस्ट देवाचेगोठणे’ हे उत्कृष्ट पुस्तक. ते लेखन म्हणजे त्यांच्या जगण्याचा लेखाजोखा होता. त्यात स्वकियांकडून आलेले अनुभवही होते. सामाजिक भेदाभेद आणि विषमता याचे चित्रण अस्सल कोकणातले होते. कोंडविलकर त्यांना आलेल्या अनुभवाशी नेहमी प्रामाणिक राहिले. आक्रस्ताळेपणाच्या वाट्याला त्यांची लेखणी कधीच गेली नाही. तिने समाजाला आरसा दाखवला. त्यात कोकणी समाजाचा विद्रुप चेहराही दिसला; पण ते कधीच कडवट झाले नाहीत. विपुल लेखन करूनही कोंडविलकर यांना कोकणातच म्हणावे तसे कौतुक वाट्याला आले नाही. कोकणातील साहित्य वर्तुळात असलेला साचलेपणा आणि कोंडाळ्यात रमणारे लेखक यात कोंडविलकर कोठेच बसत नव्हते. कोकणातील सामाजिक वास्तव त्यांनी चितारले. लाल मातीला अशीही काळी बाजू आहे, हे समोर आल्यावर अनेकांना ते डाचले. त्यामुळे कोकणच्या लाल मातीचा लेखक म्हणून कौतुकाचा वर्षाव तो कोंडविलकरांच्या वाट्याला आला नाही. प्रतिगामी लोकांनी त्यांच्या वाट्याला घर नाकारण्यापासून अनेक छळांत सहभाग घेतला. उत्तम साहित्यिक म्हणून मान्यता देताना खळखळ केलीच; मात्र कोंडविलकर स्वतः अत्यंत विवेकी आणि संयत व्यक्तिमत्त्वाचे. त्यांनी स्वतःच्या पुरोगामित्वाचे ढोल बडवले नाहीत. ते सभासंमेलने गाजवत बसले नाहीत. बोलघेवडे पुरोगामित्व दाखवत स्वतःची पुस्तके गाजवण्याची गरज त्यांना भासली नाही. कोकणातील कृषी संस्कृती, जातीयता, कनिष्ठ म्हणवणाऱ्या जातींमधीलही अंतर्विरोध, कष्टकऱ्यांची अवस्था याचे चित्रण त्यांच्या पुस्तकांत आहे. नांगरण्यासाठी जनावरे नाहीत, म्हणून नवरा-बायकोनेच शेत बैलांप्रमाणे नांगरले, या घटनेमध्ये कोंडविलकरांना कादंबरीची बीजे दिसली. यावरून त्यांची सामाजिक दृष्टी काय होती, हे लक्षात येते. कोकणात राहून कसदार लेखन करणारे कोंडविलकर आणि कोकणाबाहेर जाऊन लेखन करीत स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या उर्मिला पवार ही कोकणातील तथाकथित साहित्य संस्थांच्या व्यासपीठावर अपवादानेच दिसली वा दिसलीच नाही. यात कोकणी वृत्ती अधोरेखित होते. कोंडविलकरांसारख्या लेखकाला प्रतिगामी जवळ करीतच नाहीत आणि उथळ पुरोगामी म्हणवणाऱ्यांना कोंडविलकर जवळ करीत नसत. त्यामुळे दीर्घकाळ दर्जा राखून लेखन केल्यानंतरही त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली. आपल्या लेखनामुळे आणि वृत्तीमुळे आपल्या वाट्याला काय, याची त्यांना जाणीव होती; मात्र कोकणी समाजाचे खुजेपण त्यांच्या मृत्यूनंतरही अधोरेखित झाले. समाजव्यवस्थेला प्रश्‍न विचारणारा लेखक-कवी त्रासदायक वाटतो. कोंडविलकर असे प्रश्‍न विचारणारे होते.


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com