‘सोळावं वरीस’ फेसबुकचं... 

Facebook has now been sixteen years old
Facebook has now been sixteen years old

     एखादी गोष्ट आपल्या सोयीसाठी केली जाते; मात्र तीच जगात भारी ठरते, असंच काहीसं जगातील सर्वांत लोकप्रिय सोशल नेटवर्क बनून असलेल्या ‘फेसबुक’च्या बाबतीत घडलंय. १६ वर्षांच्या प्रदीर्घ काळातही फेसबुकची अफाट लोकप्रियता कायम आहे. हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीतल्या मार्क झुकरबर्ग याच्यासह त्याच्या तीन वर्गमित्रांनी युनिव्हर्सिटीतल्या विद्यार्थ्यांना एकमेकांशी ऑनलाईन संवाद साधता यावा, या हेतूने ‘दि फेसबुक’ या नेटवर्कची फेब्रुवारी २००४ मध्ये सुरवात केली. त्याचे २००५ मध्ये ‘फेसबुक डॉट कॉम’मध्ये रूपांतर झाले. मात्र, या चौघांना याची जराही कल्पना नव्हती, की हे एक भन्नाट नेटवर्क पुढे जाऊन जगभरातील लोकांच्या गळ्यातील ताईत बनेल. एवढेच नाही, तर जगातील श्रीमंतांच्या यादीत घेऊन जाईल, असे स्वप्नातही मार्क झुकरबर्गला 
वाटले नसावे. 

फेसबुक आता १६ वर्षांचं झालंय. खरे तर सोशल नेटवर्किंग हा शब्दच ‘फेसबुक’मुळे माहीत झाला. ई-मेलसह स्वतःची माहिती, फोटो टाकून प्रोफाईल तयार केली आणि मित्रांना निमंत्रण (रिक्वेस्ट) पाठविले, त्यांनी ते स्वीकारले (ॲक्‍सेप्ट), की झाली फेसबुक मैत्री. अशा सहजसोप्या पद्धतीमुळे हे नेटवर्क वाऱ्याच्या वेगाने अल्पावधीतच जगभर पसरत गेले. एका युनिव्हर्सिटीतल्या कॅम्पस्‌मधून सुरू झालेला फेसबुकचा प्रवास थक्क करणारा आहे. 

जगभरातील विविध जाती-धर्म, श्रीमंत-गरीब अशी दरी मिटवत सर्वांना एकत्रित संवादाचे व्यासपीठ या नेटवर्कने सत्यात उतरवले. आज जगभरातील तब्बल दोन अब्ज लोक फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहेत. सुरवातीला केवळ मजकुरातून सुरू झालेला संवाद आता फोटो, व्हिडिओ असा विस्तारला आहे. अगदी एखाद्याचा वाढदिवसही फेसबुकमुळे समजतो. आयुष्यात कधीही न भेटणारे लोकही यामुळे संपर्कात आलेत, हे या नेटवर्कचे वैशिष्ट्य बनले आहे. 
फेसबुकच्या लोकप्रियतेचे सर्वांत ठळक कारण आहे ते म्हणजे सातत्याने केले जात असलेले बदल. यूजर्सना उपयुक्त ठरतील अशा नवनवीन सुविधा देण्याचा फेसबुककडून प्रयत्न होत राहिला आहे. ‘मेसेंजर’, ‘व्हिडिओ स्ट्रिमिंग’, ‘फेसबुक लाइव्ह’ या अलीकडच्या सर्वांत लोकप्रिय सुविधा म्हणाव्या लागतील. हे करताना फेसबुकचा व्यावसायिक दृष्टिकोनही लपून राहिलेला नाही. फेसबुकने जाहिरात प्लॅटफॉर्म सुरू करून व्यावसायिकतेची चुणूकही जगाला दाखवून दिली. फेसबुकने व्यावसायिकांसाठी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘फेसबुक पेज’चा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि तोही प्रचंड यशस्वी ठरला. ‘मार्केट प्लेस’द्वारे ऑनलाईन वस्तू खरेदी-विक्रीचा प्लॅटफॉर्मही उपलब्ध केला आहे. इंटरनेटजगताचा वाटाड्या असलेल्या ‘गुगल’कडून फेसबुकला टक्कर देण्याचे अनेक प्रयत्न झालेत; मात्र त्यात यश आल्याचे दिसत नाही. गुगलने फेसबुकला टक्कर देण्यासाठी ‘गुगल प्लस’ तसेच अन्य सुविधाही  सातत्याने आणल्या; मात्र त्यांचा प्रभाव पडला नाही.

एका बाजूला अशी घोडदौड सुरू असताना यूजर्सचा डाटा लीक करण्यासारख्या गंभीर आरोपांना फेसबुकला सामोरे जावे लागले. अनेक प्रकरणांत कंपनीला कायदेशीर कारवाई तसेच दंडालाही सामोरे जावे लागले. काही देशांनी बंदीही घातली. केम्ब्रिज ॲनालेटिक डाटा लीक प्रकरण फेसबुकला सर्वाधिक त्रासदायक ठरले. असे असले तरी फेसबुकची लोकप्रियता अजून तरी कमी झालेली नाही, हे विशेष.
फेसबुकने स्वतःचा जगभर विस्तार केलाच; पण जगातील अन्य लोकप्रिय नेटवर्कही विकत घेऊन आपला व्यावसायिक दबदबा अधिकच मजबूत केलाय. जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे ‘व्हॉट्‌स ॲप’ हे मेसेंजर फेसबुकने विकत घेतले, त्याचबरोबर फोटो, व्हिडिओ शेअरिंगसाठी वेगाने लोकप्रिय होत असलेले ‘इन्स्टाग्राम’ही खरेदी केले. त्यामुळे आज तरी सोशल मीडिया जगतात केवळ आणि केवळ फेसबुकचाच बोलबाला दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com