नॉस्ट्रॅडेमस यांची भविष्यवाणी ‌

महेश गावडे
Wednesday, 7 October 2020

अनेक जण नॉस्ट्रॅडेमस यांनी केलेल्या भविष्यवाणी, त्यातील उल्लेखनीय बाबी यांचा आपल्या तर्कानुसार अर्थ लावतात आणि वर्तमानस्थितीत घडणाऱ्या घटना आणि भविष्यवाणी यांचा संदर्भ जोडू पाहतात.

आपलं भविष्य आपल्या हाती असतं, असं म्हणतात. असे असले, तरी भारतात भविष्य हा संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. अनेकांना भविष्यात काय होईल, जगभर काय होईल, याविषयी औत्सुक्‍य असते. त्याचा विविध मार्गांनी ते धांडोळा घेत असतात. नॉस्ट्रॅडेमस हे सोळाव्या शतकातील प्रसिद्ध भविष्यवेत्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी केलेल्या अनेक भविष्यवाणी तंतोतंत खऱ्या ठरल्या आहेत. यामध्ये प्रिन्सेस डायनाचा मृत्यू, ॲडॉल्फ हिटलरचा उदय, अणुबॉम्ब, दुसरे महायुद्ध, वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील ९-११ चा हल्ला यांचा समावेश होतो. याशिवाय २०१२ ते २०२५ या काळात तिसऱ्या महायुद्धासारखी स्थिती बनणार असून, या परिस्थितीत भारत शांती स्थापण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणार असल्याचे सांगितले आहे. अस्तिक विरुद्ध नास्तिक यांच्यात तिसरे महायुद्ध होईल.

या भविष्यकथनात चीन, पाकिस्तान, भारत, इस्राईल, फ्रान्स व अमेरिका या शक्तिशाली देशांविषयी सांगितले गेले आहे. या युद्धाची सुरुवात चीन करेल, असा दावा यामध्ये केला आहे. नॉस्ट्रॅडेमस यांनी केलेली भविष्यवाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या भारत व चीन सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आहे. याशिवाय आर्मेनिया आणि अझरबैजान या दोन देशांत गेल्या काही दिवसांपासून भीषण युद्ध सुरू आहे. या लढाईत आर्मेनियाच्या बाजूने रशिया उभा आहे, तर अझरबैजानच्या मदतीसाठी टर्की व पाकिस्तानने पाठिंबा देऊ केला आहे. त्यामुळे नॉस्ट्रॅडेमस यांनी तिसऱ्या महायुद्धाच्या अनुषंगाने केलेली भविष्यवाणी आणि सद्यःस्थिती यांचा परस्पर संबंध जोडून ही भविष्यवाणी खरी ठरते की काय, ही शक्‍यता पडताळली जात आहे.

नॉस्ट्रॅडेमस यांनी भारताविषयीही अनेक भविष्यवाणी केल्या आहेत. त्यांच्या प्रोफेसीज (propheties) या पुस्तकात त्या नमूद आहेत. यात २०२० मध्ये जगात मोठी महामारी पसरेल, याचाही उल्लेख केला आहे. याच वर्षी देशभर अस्थिरता निर्माण होईल, धार्मिक कटुता वाढू शकेल. नागरिकांचे दुसऱ्या देशात स्थलांतर, याचाही उल्लेख केलेला आहे. अर्थात, तिसऱ्या महायुद्धाची तयारी २०२० मध्ये होईल, असेही म्हटले आहे. 

अनेक जण नॉस्ट्रॅडेमस यांनी केलेल्या भविष्यवाणी, त्यातील उल्लेखनीय बाबी यांचा आपल्या तर्कानुसार अर्थ लावतात आणि वर्तमानस्थितीत घडणाऱ्या घटना आणि भविष्यवाणी यांचा संदर्भ जोडू पाहतात. एक मात्र खरे, की सध्या व्हायरलच्या जमान्यात अशा विषयांना वाचक वाचत राहतात. या सर्व बाबी किती गांभीर्याने घ्यायच्या हे ज्याचे त्यानेच ठरवावे. काही गोष्टी तशाच घडत असतील तर त्या निव्वळ योगायोग मानाव्यात.

 संपादन - अर्चना बनगे

इतर ब्लॉग्स