अन्न हेच औषध ; आपल्या कामाचं मुळ सूत्र

Food is medicine tips health marathi news
Food is medicine tips health marathi news

सांगली :  मधुमेह, रक्तदाब, थायरॉईडस्‌ अशा विकारांच्या लांब यादीतील कोणत्या ना कोणत्या विकाराने सभोवती लोक त्रस्त आहेत. खरे तर यातले बहुतांश रोग आपल्या बदललेल्या जीवनशैलीने-आहारामुळे आपल्यावर लादले गेले आहेत. एकदा का हे रोग लागले की त्यासाठीची औषधेही आयुष्यभरासाठी कायमची मागे लागतात. मग डॉक्‍टर आपल्याला व्यायाम, आहार, जीवनशैलीतील बदल याबद्दल सतत सांगत राहतात मात्र आपण ते आजिबात मनावर न घेता फक्त औषधे घेत राहतो. यातल्या "आहार' या मुद्यांवर मुलभूत प्रयोगशील स्वरुपाचं काम देववाडी (ता.शिराळा) येथील डॉ.दिलिप खोत यांनी केलं आहे. 

डॉ.खोत यांनी पशुवैद्यक म्हणून वारणा डेअरीत काम केले. सुमारे वीस वर्षे विविध विभागात त्यांनी व्यवस्थापकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या. 2017 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. नोकरीच्या काळातच त्यांनी नेदरलॅन्डच्या वॅगेनिन्जन ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटीमध्ये एम. एस्सी. (आहारशास्त्र) पदव्युत्तर कोर्स पूर्ण केला होता. कारण हा त्यांच्या अभ्यासाचा आणि आवडीचा विषय. त्यांना जेव्हा मधुमेहाने गाठलं आणि इन्शुलिन घ्यायची वेळ आली तेव्हा ते या विषयाकडे अधिक गंभीरपणे पाहू लागले. त्यातूनच त्यांनी 2020 मध्ये वॅगेनिन्जन युनिव्हर्सिटी ऍन्ड रिसर्च या विद्यापीठाची "आहार व आजार' या विषयातील पदविका घेतली. ह्‌दयरोग, मधुमेह, कर्करोगांचा आहाराशी संबंध याविषयाचं त्यात सखोल अध्ययन होतं. त्यातून त्याचं यातलं संशोधन वाढतच गेलं. सांगलीतील सिस्टेड फाऊंडेशनचे प्रा. सुहास खांबे यांच्याशी त्यांचा संपर्क आला. फौऊंडेशनं या कल्पकतेला प्रोत्साहन दिलं. आता त्यांनी त्यांच्या त्या "आहार' पॅकिंगचं यशोदिन नावाने ब्रॅन्डींगही सुरु केलंय. 

वेगवेगळ्या विकारांसाठी अन्न हेच कसं औषध ठरू शकते याच्या रंजक माहितीचा त्यांच्याकडे साठा आहे. ते म्हणाले,"" आपल्या अन्नात तंतुमय पदार्थ, प्रथिने,स्निग्ध पदार्थ, क्षार व विशेष करून फायटोकेमीकल्स असे अनेक घटक असतात. ते योग्य प्रमाणात न मिळाल्याने व्याधी निर्माण होतात. त्याला कारण बदलती जीवनशैली ही आहे. आता हेच घटक आहारात योग्य संतुलित रुपात नियमितपणे मिळाल्यास ते अन्नच आपले औषध ठरु शकते. त्यातून व्याधीवर प्रतिबंध, नियंत्रण किंवा त्याचे निर्मुलन शक्‍य आहे. थोडक्‍यात "अन्न हेच औषध' हेच आमच्या कामाचं मुळ सूत्र आहे. 

एरवी डॉक्‍टर हे सारे सांगतातच. मात्र विकारानुसार संतुलित असा आहार रोज उपलब्ध करणं रुग्णांच्या कुटुंबियांना शक्‍य होत नाही. त्यामुळे आम्ही प्रत्येक रुग्णाचा आहारच विविध औषधी गुणधर्म व घटकांचा समावेश असलेलं पीठ स्वरुपात उपलब्ध करून देतो. रुग्णाच्या प्रकृतीनुसार त्याचे प्रमाण ठरवून देतो. ते नास्ता-जेवणातून खावं. रुग्णाने औषधोपचार बंद करावेत असं नाही मात्र हा औषधी आहार सुरु झाल्यानंतर काही दिवसात नियमित औषधांची मात्रा आपोआपच कमी होते. रक्तदाब, मधुमेहासह अनेक विकारग्रस्तांमध्ये असे आश्‍चर्यकारक असे बदल दिसून आले आहेत. व्यक्तीनिहाय आमच्या उपचाराचं स्वरुप बदलतं.''  

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com