
कसा सोडणार मोह...कसे आणणार भावनांवर नियंत्रण?
कुठलेसे चॅनेल सुरू होते. कुठलेसे महाराज जगण्याविषयीचं तकलादू तत्वज्ञान समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते. महाराजांसमोर अनेकजण हात जोडून भक्तिभावाने बसले होते. चहा घेत चॅनेल सर्फींग करताना सहज त्या चॅनेलवर पोचलो आणि काही सेकंद थांबलो...संसार एक मोह आहे. या मोहामध्ये फारसे अडकू नका....भावनांवर नियंत्रण ठेवा. तरच भले होईल...ही दोन वाक्ये संपता संपता वीज गेली आणि टीव्ही बंद झाला. मोबाईल हातात घेतला आणि वॉटस्ऍपवरील मेसेज वाचू लागलो. त्यावरही असल्याच आशयाचे काही फॉरवर्डेड विचार धपाधप येऊन आदळलेले होते. एक-दोन वाचले आणि मोबाईल ठेवून दिला. अशा भाषणांचा, मेसेजचा परिणाम करून घेणे म्हणजे जगणे विसरणेच. हे वाचून, ऐकून नेमके कशामुळे भले होणार...संसारातून बाहेर पडल्यानंतर की, भावनांवर नियंत्रण ठेवल्यानंतर...विचार झटकायचा प्रयत्न केला...पण विचार थांबेनात. सुटीचा दिवस असल्यामुळे दुसऱ्या कामातही मन गुंतवता येईना आणि विचारही थांबेनात. मोह सोडा...भावनांवर नियंत्रण ठेवा...म्हणजे काय सगळेच सोडून जायचे...काय कटकट, कशाला असले ऐकावे, वाचावे...
माणूस सतत काहीतरी मिळवण्याच्या मागे लागलेला असतो. दुचाकी असेल तर चार चाकीसाठी, चारचाकी असेल तर आणखी भारीतली कधी घेता येईल...वन बीएचके घेतला, दोन बीएचके कधी...दोन बीएचके झाला, बंगला कधी...घरातील विविध उंची वस्तू.....वेगवेगळे दागिने......शेतीचा एखादा तुकडा मिळेल का...आहे तो पगार आणखी कसा वाढणार...सरकारी खर्चाने परदेश दौरा कसा काढता येईल...पोरांचे शिक्षण महागड्या शाळेत कसे करणार...त्यासाठी किती पैसे खर्च करायचे...हे सगळे करताना आपले सगळ्यांनी ऐकलेच पाहिजे हा अट्टहास आहेच. नाहीतर इगो दुखावणार....यातून बाहेर पडण्यासाठी मोह सोडला पाहिजे...भावनांवर नियंत्रण आणले पाहिजे...
...पण कसा सोडणार मोह...कसे आणणार भावनांवर नियंत्रण...कसला विचार करताय...या प्रश्नाने भानावर आलो. म्हणालो, मोहातून बाहेर कसे पडणार...भावनांवर नियंत्रण कसे ठेवणार...ती हसली...म्हणाली, टीव्हीवर काही ऐकलंय आणि वॉटस्अपवर काही वाचलंय का.....आहो त्या टीव्हीवर सांगणारे आणि वॉटस्अपवर फिरणाऱ्या अशा मेसेजसकडे लक्ष द्यायचे नसते...त्या महाराजांना रोजची जगण्याची लढाई थोडीच करावी लागते....त्यांनी बाजार मांडला आहे आणि कमकुवत मनाची माणसे त्यांच्या आहारी जात आहेत...तसेच फॉरवर्ड केलेले मेसेज वाचून सोडून द्या...तेही रिकामटेकड्यांचे उद्योग असतात....काढून टाका डोक्यातून....
तसे नाही...पण असे विचार वाचले, ऐकले की, मनात उलथापालथ होतेच की आणि मग विचार सुरू होतातच.
ती म्हणाली, हे पाहा...असे मेसेज, अशा संदेशांकडे पाहण्यापेक्षा...ज्ञानोबा माऊली, तुकोबाराया, एकनाथ महाराज, रामदास स्वामी यांचे विचार लक्षात घ्या. त्यांनी खूप आधीच जगण्याचं सार सांगून ठेवलेले आहे. ते वाचले की, तुम्हाला अनेक प्रश्नच पडणार नाहीत. समर्थांनी तर ईश्वरसेवेबरोबरच बलोपासनेला महत्त्व दिल्याचे दिसते...बलोपासना करण्यापूर्वी त्यांनी संसार त्यागा, भावनांची घुसमट करा...असे सांगितलेले नाही. माणूस हा माणसासारखाच जगणार. त्याला मोह, माया, प्रेम, मत्सर, भावना यांतून बाहेर पडताच येणार नाही. त्यातून त्याने बाहेर पडूच नये, तर त्यावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करावा. जेथे शक्य आहे तेथे गरजूंना मदतीचा हात द्यावा...दुःख वाटून घेण्याचा आणि सुख वाटण्याचा प्रयत्न करावा. भावनांच्या उर्जेचा उपयोग करून जीव लावावा, माणूस जोडावा, जिव्हाळा जपावा...माणसांतील माणूस शोधावा...माणसाला माणूस म्हणून वागणूक द्यावी. माणुसकीला तिलांजली द्यायची आणि रोज परमेश्वरापुढे माथा टेकायचा असा दुटप्पी कारभार करू नका...असेच सांगत आले. त्या पुढेही जाऊन समर्थ म्हणतात, आधी संसार करावा नेटका...संसार नेटका करणे ही देखील तपस्याच आहे की. प्रपंच नेटका करताना मोह बाजूला ठेवता येतोच, भावनाही जपता येतात...पाहा प्रयत्न करून जमते का...