एक नवी सुरवात ; गणेशोत्सवाचे सकारात्मक बळ!

विजय वेदपाठक
Monday, 24 August 2020

कोरोनाचे आव्हान एकदा स्वीकारल्यानंतर भीती दूर होण्याची शक्‍यता अधिक आहे. रुग्णालयांची अपुरी संख्या, बेड उपलब्ध न होणे यांसह कोविड सेंटर किंवा क्वारंटाईन सेंटरमधील गैरसुविधा असे प्रश्‍न आजही आहेतच.

नवचैतन्याने गणेशोत्सव सुरू झाला आहे. पहिल्या दोन दिवसांत लोकांनी कोरोनाची भीती दूर सारून उत्सवाला सुरवात केली. कोरोनाबरोबर जगायचं आहे, याची खूणगाठ लोकांनी बांधल्याचे दिसून येत आहे, ही सर्वांत मोठी जमेची बाब. राज्य शासन आणि केंद्र शासन त्याच पद्धतीची सकारात्मक पावले टाकत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी केंद्र सरकारने प्रवासी आणि माल वाहतूक रोखू नका, असे निर्देश सर्व राज्यांना दिले. लॉकडाउननंतर ‘अनलॉक’ सुरू झाल्यापासून हा सर्वांत मोठा टप्पा म्हणावा लागेल. 

प्रवास सुरू झाला, की आपोआप उलाढाल सुरू होईल. बाजार हलतील आणि अनेकांचे अर्थचक्र मूळ पदावर येण्यासाठी मोठा बूस्टर मिळणार आहे. लॉकडाउनमध्ये आणि अनलॉकच्या काही टप्प्यांतही अर्थचक्र गतिमान होण्याच्या दिशेने पावले पडत नव्हती. आता केंद्र आणि राज्य शासन याचा गांभीर्याने विचार करीत आहे. अर्थचक्र गतिमान होऊ लागेल तसा दैनंदिन अडचणींचा सामना करणाऱ्या लाखो लोकांना दिलासा मिळेल. पगार कपात, नोकरीची नाकारलेली संधी, व्यापारासह अनेक क्षेत्रांना बसलेला फटका, अशा नानाविध धक्‍क्‍यांतून समाजमन सावरायला लागेल. 

या सर्व पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या आव्हानाला लोक तयार आहेत की नाही, असा प्रश्‍न येणे साहजिकच आहे; पण गणेशोत्सवाने त्याचे उत्तर दिले आहे. कोल्हापूरचे उदाहरण त्यासाठी पुरेसे आहे. उत्सवासाठीच्या खरेदीसाठी गर्दी झाली; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला हे वास्तव आहे; पण लोकांनी मूर्ती घरी आणताना आणि त्या संदर्भातील इतर व्यवहार करताना दाखविलेला समंजसपणाही पुरेसा बोलका आहे. हा निष्कर्ष कोल्हापूर पोलिस दलाने काढला आहे. त्यांनी लोकांच्या या सुज्ञपणाचे कौतुक केले आहे. कोरोनाबरोबर आणखी किती काळ जगावे लागेल, याचा अंदाज आज घडीला कोणीही बांधू शकत नाही. त्याचा उद्रेक तर झालाच आहे; पण त्या संदर्भातील नियम अतिशय कटाक्षाने पाळूनच या मोठ्या संकटातून मार्ग काढता येऊ शकतो, हे सत्य सर्वांनीच जाणले आहे. आता कोरोनाच्या साडेचार-पाच महिन्यांच्या कालावधीनंतर ते अंगवळणी पडू लागले आहे. ही सकारात्मक बाब म्हटली पाहिजे.

कोरोनाचे आव्हान एकदा स्वीकारल्यानंतर भीती दूर होण्याची शक्‍यता अधिक आहे. रुग्णालयांची अपुरी संख्या, बेड उपलब्ध न होणे यांसह कोविड सेंटर किंवा क्वारंटाईन सेंटरमधील गैरसुविधा असे प्रश्‍न आजही आहेतच. त्याविरोधात आवाजही उठविला जातो आहे आणि त्याच वेळी कमतरता दूर करण्यासाठी प्रशासनासह सर्व जण प्रयत्नही करत आहेत. हे सर्वांनीच जाणून घेतले तर कोरोनाबाबतची भीती मोठ्या प्रमाणात आणखी घटणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापेक्षा ही भीती अधिक चिंतादायक आहे, असे वास्तव अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी यापूर्वीच मांडले आहे. भीती न बाळगता संकटाला भिडण्यासाठी समाज जागृत होत आहे. त्यातूनच एसटी सुरू झाली, आता प्रवासी आणि माल वाहतूक कायम ठेवावी, असेही निर्देश आले आहेत. एक नवी सुरवात आपल्या प्रत्येकाला करावी लागणार आहे. त्यासाठी गणेशोत्सवासारखा दुसरा चांगला मुहूर्त नसावा. गणरायाने हे बळ सगळ्यांनाच दिले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या