भावा...काय मजा नाय येत ! 

lalbagcha raja.jpg
lalbagcha raja.jpg

दहीहंडी झाली की एक-दोन दिवसांत गल्लीतली पोरं-पोरी मिळून एक मस्त मिटिंग व्हायची. अप्पाच्या ओट्यावर. कशासाठी, तर गणपतीची तयारी... सर्वात पहिला मुद्दा यायचा तो ढोल प्रॅक्टिसचा. शाळेच्या ग्राउंडवर ३५ ढोल आणि १५ ताशे घेऊन किश्‍या पुढं असायचा. भाऊ, मागच्या टायमाला आपल्याला सेकंड प्राईज भेटलं होतं. या टायमाला असा काही जोर लावला असता की, पहिला फश्‍ट नंबर आपलाच आला असता... दिप्या अप्पाला सांगत होता. अप्पा वयानं मोठा असला तरी पोरासोरांची आन त्याची चांगलीच शेटिंग. पोरायला काय पाहिजे काय नको, हे अप्पाला चांगलं माहीत होतं. गल्लीतल्या पोरींना कुठल्याच प्रकारचं टेन्शन घ्यायचं काम नव्हतं. आप्पानं तशी सेटिंगच लावून ठेवली होती मंडळात. इकडं थोडा अंधार पडायला लागला की, सगळी जमायची ग्राउंडवर. आधी लायनी लागायच्या. ढोलवाले बाहेरच्या साईडला. ताशावाले मध्ये. त्याच्याही आत दीप्या आणि छोट्या. ते झांजीवर असायचे. ताशावाल्यानं एकदा का ताल पकडला की अप्पा एका हातात टिपरू घेऊन ढोलवाल्या पोरांकडं पाहायचा. हवेतच एक-दोनदा हात वर केले की, जो दणदणाट व्हायचा की अख्खं ग्राउंड हलतंय का काय, असं फील यायचं. साधारण एक र्हिदम पकडायची आन पुढं पंचवीस-तीस मिनिटं नुसती बदडाबदड. अल्लग अल्लग ताल धरून अप्पानं पोरायला ट्रेंड करून टाकलं होतं. पोरीपण झक्कास वाजवायच्या. यंदाच्या टायमाला गणपतीत काय मजा नाय राव... दीप्या बोलला. 

काय सुंदर मूर्ती बनवली गं तुझ्या मुलीनं... अगं परवा तू टाकलेला स्टेटस मी माझ्या पार्थला दाखवला. तर म्हणतो कसा, अगं मम्मी, मी काही केलेलं तुला आवडतच नाही.... आमची सौ. तिच्या जिवलग मैत्रिणीशी बोलत होती. मी गॅलरीत उभं राहून ते ऐकत होतो. सौ. पुढं पंधरा-वीस मिनिटं मोबाईल कानाला लावून होती. माझी मुलगीही आईजवळच उभी होती. फोनवरच मैत्रिणीचं कौतुक सुरू होतं. नंतर मोर्चा वळला तो आमच्याकडे... काय हो... मागच्या वर्षी रांगोळीत आपल्या रियाला प्राईज मिळालं तर खालच्या तीन नंबरवालीचे डोळे कसे झाले होते... आठवतं का तुम्हाला. काय गं रिया, बेटा ती ट्रॉफी ठेवलीय ना तू नीट. मी नुसतं हं केलं. आणि काय हो, सगळ्यांनी आरती केली; पण माझ्या हातच्या मोदकांची चव कुणाच्याही मोदकांना नव्हती. तुम्हाला तर आवडलेच होते, सात नंबरवाले काकाही कौतुक करत होते. आपल्या ए, बी, सी या तिन्ही विंगमध्ये ‘होम मिनिस्टर’ची पैठणीही मागच्या वर्षी मलाच मिळाली होती. मी पुन्हा हं म्हणालो. काय गं रिया, आपल्या गणपतीचे सगळे फोटो ग्रुपवर टाकलेस ना... पाहा बरं कुणाचा रिप्लाय आलाय का... आणि हो फेसबुकलाही टाक. यावर्षी मेलं हे कोरोनाचं संकट काय आलं... सार्वजनिक गणपती मंडळ नाही की कुठल्या ॲक्टिव्हिटीज, कॉम्पिटिशन्स पण नाहीत. रिया, बेटा आपल्या सगळ्या ग्रुपवर अपलोड कर गं बाई फोटो... अहो, तुम्हीसुद्धा! 


कॉलनीतल्या मंदिरासमोरची हिरवळ आणि तिथे टाकलेले बेंचेस हा आसपासच्या ज्येष्ठ नागरिकांचा गप्पाटप्पा करण्याचा फेव्हरेट स्पॉट होता. एका हातात छोटी पिशवी आणि दुसऱ्या हाताने नाकावर असलेला रुमाल सांभाळत वसंतराव समोरून येत होते. बँकेतून रिटायर झालेले आणि सर्वात आधी स्पॉटवर हजर होणाऱ्या पाटील काकांनी वसंतरावांची होणारी तारांबळ दुरूनच हेरली. या... वसंतराव, सांभाळून या... - पाटीलकाका. हिरवळीवर टाकलेल्या या बेंचेसवर बसताना या ज्येष्ठ मंडळींनी सोशल डिस्टन्सिंग मात्र पुरेपूर पाळले होते. रोज जमणाऱ्या या ग्रुपमध्ये गप्पाटप्पांना मात्र विषयांचे कुठलेही बंधन नसायचे. हसत-खेळत आयुष्याचा उत्तरार्ध घालविणारी ही मंडळी आपापली दुःखे काहीशी लपवून एकमेकांना आनंद देण्याचा प्रयत्न करीत होती. आज विषय होता अर्थातच गणपती उत्सवाचा. ‘‘यंदाच्या उत्सवात एक मात्र फार छान झालं बरं का... अहो गेल्या वर्षी रस्त्यातच टाकलेल्या मांडवामुळे मी अगदी पडता पडता वाचलो. दिवाकरने सांगितल्यानंतर मांडवाचा तो थोडा भाग हटवला गेला,’’ वसंतराव. ‘‘अहो दिवाकर आधी मला बोलला होता. काय आहे की, सगळी कॉलनीतली पोरं... त्यांचा उत्साह... पण त्यांनी नंतर व्यवस्था केली की नाही... अहो, आपल्या काळात आपण काय करीत होतो, हेही आठवा ना...!’’ 
पाटीलकाकांनी टाकलेला बाउन्सर. वसंतरावही मग काहीसे शांत झाले. यंदाच्या गणपती उत्सवावरून ज्येष्ठ नागरिकांचे हे मंडळ फिफ्टी-फिफ्टी बिस्किटांसारखे होते. पाटीलकाका म्हणतात, ‘‘कसं आहे वसंतराव, अहो, सहा महिने झाले. आपण नेहमीच भेटत आलो आहोत. यापुढेही असेच भेटत राहू... कोरोनाचं हे जागतिक संकट दूर सारायचं तर करू यंदा घरातल्या घरात आरती. बाप्पा नक्कीच दूर करतील हे संकट... अहो, पुढच्या वर्षी करूया की धूमधडाक्यात...!’’ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com