आई, मला मोबाईल हवाय गं...!

गायत्री तांदळे 
Sunday, 4 October 2020

कोरोनामुळे 'डिजिटल इंडिया' या संकल्पनेला बळ मिळालं. ऑनलाइन शिक्षण पद्धती बहरली. ज्या मुलांकडे मोबाइल आहेत. अशी मुले ऑनलाइन तासासाठी सहभागी होऊ लागली, पण ज्यांना मोबाईल घेणं शक्‍य नाही त्यांच काय?

साताऱ्यातील एका मुलीने ऑनलाइन अभ्यासासाठी आपल्या आईकडे मोबाईलची मागणी केली. आई थोडे पैसे जमा झाले की घेऊ असं म्हणत असतानाच त्या मुलीने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. ही बातमी वाचली अन्‌ काळजात एकदम चर्रर्रर्र झालं. साक्षी हे एक उदाहरण आहे जे की दुर्देवी घटनेमुळे पुढे आलेले...पण महाराष्ट्रातील ग्रामीण भागात अशा लाखो साक्षी आहेत, ज्या शिक्षणासाठी धडपड करताहेत. घरातील परिस्थिती बिकट असली तरी त्यातून खंबीरपणे मार्ग काढून त्या शिक्षण जातात. अनेकदा घरातील अन्‌ शेतातील काम सांभाळून त्यांचे शिक्षण सुरू असते. शाळेसाठी मैलोन मैल पाय तुडवत प्रवास करत त्या जातात. त्यांचा संघर्ष येवढ्यावरच थांबत नाही. ऊन, वारा, पाऊस सारं झेलत त्या शिक्षणाची उर्मी कमी होऊ देत नाहीत. यंदा कोरोनाने सर्वांसमोरच संकटांचा डोंगर उभा करून ठेवलाय. त्यातून या सावित्रीच्या लेकी तरी कशा सुटतील. कोरोनामुळे 'डिजिटल इंडिया' या संकल्पनेला बळ मिळालं. ऑनलाइन शिक्षण पद्धती बहरली. ज्या मुलांकडे मोबाइल आहेत. अशी मुले ऑनलाइन तासासाठी सहभागी होऊ लागली, पण ज्यांना मोबाईल घेणं शक्‍य नाही त्यांच काय? तर दुसरीकडे मोबाइल असला तर रेंज नाही अशी परिस्थिती आज अनेक ठिकाणी आहे. 

कोण पाहतो ‘तो’ टीव्ही?

'मुलगी शिकली अन्‌ प्रगती झाली' असे आपण वारंवार म्हणत असतो, पण हे फक्त म्हणण्यापुरतच बरं का? आजही ग्रामीण भागातील असो किंवा शहरी भागातील असो मुलगी जास्त शिकतीये म्हटलं तरी अनेकांचे डोळे विस्फारतात. मुलगी आहे ती शिकून काय करणार असं सर्रास म्हणलं जातं. परंतु सावित्रीबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अनेक मुली शिक्षण घेण्यासाठी झटत असतात. सध्याच्या परिस्थितीत ऑनलाइन शिक्षणाचा निर्माण झालेला पेच दुर्गम भागातील एका कन्येने रेंज असलेल्या ठिकाणी झोपडी बांधून सोडविला, पण एकीचा प्रश्न सुटला असला तरी हजारो जणी शिक्षणाच्या प्रवाहापासून अजूनही दूर आहेत. मोबाइल मिळाला नाही म्हणून साक्षीने उचललेलं टोकाचं पाऊल हे चुकीचं आहे, पण आपल्या शिक्षण व्यवस्थेला चपराक देणारं सुद्धा आहे. आमच्याकडे मोबाईलच नसेल, तर आम्ही ऑनलाइन शिक्षण घेणार कसे? असा विचार अनेक साक्षींच्या मनात येत असेल. साक्षीप्रमाणे इतर मुलींनी चुकीचे पाऊल उचलू नये असे वाटत असेल, तर शासकीय पातळीवर आणि सामाजिक संस्थांच्या पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील मुलींसाठी सायकलींचा जसा उपक्रम राबविण्यात आला होता. त्याप्रमाणे मोबाइल किंवा टॅब उपलब्ध झाल्यास या मुलींना त्यांची शिक्षणाची आवड जपण्यास मदत होईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)

इतर ब्लॉग्स