गोफण | ती म्हैस सुरतवरुन गुवाहाटीला कशी गेली?

गलगले नावाचे गृहस्थ म्हशीला घेऊन आधी सुरतला गेले, मग त्यांनी गुवाहाटी गाठली.. पण चौकशीत ते काहीच थांगपत्ता लागू देत नव्हते...
Gofan Article
Gofan Articleesakal

गावातून म्हैस चोरीला गेली म्हणून ग्रामसभा भरली होती. गलगले नावाचे गृहस्थ आरोपीच्या सतरंजीवर बसले होते. गावचे पोलिस पाटील रावसाहेब कायदेकर शांतपणे निवाडा ऐकत होते. रावसाहेब म्हणजे कर्तव्यकठोर, जबाबदार, कायद्याला ऊसाच्या चरख्यात घालून शांतपणे त्याचा रस पिणारा मुरब्बी पोलिस पाटील. तेच या प्रकरणात निवडा देणार होते. गलगलेंची उलटसाक्ष सुरु होती-

पंचः गलगले सांगा, म्हैस कुणी चोरली?

गलगलेः मला काय म्हाईत? मी नाय चोरली

पंचः मग कुणी चोरली? आळ तर तुमच्यावरचय.. तु्म्ही ती म्हस घेऊन सुरतला गेल्ते

गलगलेः मी कशाला तिला घेऊन जाऊ? माझा मीच गेलो.. ती मागनं आली

पंचः कशी काय माग्नं आली.. तिला कसं काळलं तुम्ही त्याच हाटलात थांबलेलेय मनून?

गलगलेः तिजा प्रश्न तिला इचारा ना! माझा मी सुरत बघायले गेल्तो.

पंचः मग तिच्यासोबत तुमी पुढं गुवाहाटीला गेल्ते, हे खरंय का?

गलगलेः हां.. (चीभ दाताखाली चावत) नाय-नाय अर्धवट खरंय!

पंचः तुमी म्हशीच्या पाठीवर बसून गेले का, म्हस तुमच्या पाठीवर बसून गिली?

गलगलेः मी मपला माज्या पैशाने गेलो, ती तिज्या पैशानं ग्येली असल... मला काय माहिती?

पंचः पण म्हशीनं तर तुमाला फोन केल्ता, ह्यो घ्या पुरावा

गलगलेः (तेवढ्याच साळसुदपणे) ह्यो फोन नंबर माझा न्हाई..

पंचः मग कुणाचाय? ह्याच नंबरवरुन तुमी त्याच्याआधी म्हशीला व्हॉट्स्याप मॅसेज केल्ते की!

गलगलेः त्यो माज्या मित्राचा नंबरय. माझा बटनाचा मोबाईल असल्याने व्हॉट्स्याप वापरायला मी मित्राचा मोबाईल घेत अस्तो.

पंचः कोणता मित्रय त्यो? नाव काय? कुठं ऱ्हातो?

गलगलेः त्याजे न् माजे भांडणं झालेत. त्याजं नावबी मी घेत नसतो. डिलिट केलाय त्याला डोक्यातून.

पंचः गुवाहाटीला जावून तुमी म्हशीचं काय केलं?

गलगलेः मी माझा देवीच्या दर्शनाला गेल्तो. देवीच्या गाभाऱ्यात डोकं टेकवलं- वळून बघतो त् काय म्हस बाजूलाच उभी.

पंचः मग तुमी तिला तिथून चोरली का? की तिच तिज्या इच्छेनी तुमच्यासोबत चोरी झाली?

गलगलेः ते मला नेमकं आठवत नाय. पण मी तिला शब्दही बोललो नाय. फकस्त तिला मेल केला की, इथं काय करतीस... गावातून आलीस तर गावात माघारी जा नाहीतर माझ्यावर आळ येईल.

पंचः (विजयी मुद्रेने) तुमच्याकडं तर बटनाचा मोबाईल व्हता ना? मंग कसाकाय केला मेल?

गलगलेः (जराही न गांगरता) तिच्याच मोबाईलवरुन! तिला म्हटलं एक मिनिट मोबाईल द्येती का? तिनं दिला.

पंचः मग म्हस काय म्हटली?

गलगलेः मला असं वाटतंय की, तिनंही मला मेल केला. पर माज्याकडं बटनाचा मोबाईल असल्यानं त्यो मेल मला मिळाल न्हाई. मी जवा मोबाईल घिईन तवा तुमाला सांगन.

पंचः पण तुमी तिज्याच मोबाईलवर बघायचं ना?

गलगलेः तिनं मोबाईल दिला नाही, चार्जिंग संपली म्हटली.

पंचः मग म्हस कुठं ग्येली? तुमीच तिजा सौदा केला दिल्लीच्या बादशासोबत, हे खरंय का?

गलगलेः हे खोटंय. दिल्लीच्या बादशाला मी वळखत नाय. मी फक्त बादशाचा वतनदार देवाभाऊ फडफडेंना वळखतो.

पंचः बरं..असंय का? कसाय त्यो मानूस?

गलगलेः लै दिलदार.. मला कोट शिवून दिलाय त्यांनी-

पंचः (मोठ्याने हसत) हाहाहा..हाहा.. पर म्हस तर सध्या त्यांच्यात गोठ्यातय.. तिथं कशी गेली? तुमी त्यांना ईकली ना?

गलगलेः माझा काय संम्मंध? ते त्यांना इचारा की, त्यांनी कुणाकून इकत घ्येतली ते बघा.

पंचः कोटाच्या बदल्यात म्हैस ईकली का तुमी? खरं सांगा? तुमच्या कोटाला म्हशीच्या मैमुत्राचा वास येतोय.

गलगलेः ह्याज्यापुढं मला काय आठवत न्हाई. तुमाला जे काय इचारायचंय ते मेलवर इचारा.. खरंय ना पोलिस पाटील सायेब?

तेवढ्यात पोलिस पाटील रावसाहेब कायदेकर भानावर आले. त्यांना चांगलीच तंद्री लागली होती. 'हो..हो खरंय खरंय!' असं म्हणून त्यांनी पुढची ग्रामसभा मेलवर होईल, असं फर्मान सोडलं. शेवटी त्यांनासुद्धा जी पोलिस पाटिलकी मिळाली होती, त्यात त्या म्हशीचाच वाटा होता म्हणे.

समाप्त!

santosh.kanade@esakal.com

Gofan Article
गोफण | दादांचं उलट टपाली उत्तर! म्हणाले, देवाभाऊ...
Gofan Article
गोफण | जावळाचा कार्यक्रम अन् काका-पुतण्याची गुप्त भेट
Gofan Article
गोफण | गुगलीने घेतली विकेट!
Gofan Article
गोफण | बंद दाराआडची गुपितं
Gofan Article
गोफण | जंगलाचाही एक कायदा असतो, पण इथे...
Gofan Article
गोफण| गद्दार, खोके, लाचार, खंजीर... अन् मुलाखत संपली!
Gofan Article
गोफण| नमोभाईंची 'ही' खेळी दादारावांना पटली नाही
Gofan Article
गोफण| काका चिडले पण नमोभाईंपुढे करणार काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com