
गोफण| थू..थूS..थूSS...!
सर्वसामान्यांचं शासन
सांस्कृतिक कार्य विभाग
शासन निर्णय क्रमांकः अति-तातडीचा
वाचाः- थूथू..थूथूथू.S..थूथूथूSS
प्रस्तावनाः- विद्यमान परिस्थितीत महाराष्ट्रदेशी सर्वसामान्यांचं सरकार विराजमान झालेलं आहे. त्यामुळे सदरील मुलूखात कुणीही कुणाचा उपमर्द केलेला खपवून घेतला जाणार नाही. मागच्या काही काळापासून राज्यात एकमेकांवर थुंकण्याचे प्रकार घडतांना दिसत आहेत.
या सर्वसामान्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, महिलांच्या, तरुणांच्या, तरुणींच्या आणि अबालवृद्धांच्या राज्यात कुणीही कुणावर थुंकता कामा नये, असे शासनाच्या विचाराधीन आहे. जर असा कुणी थुंकतांना अगर थूS.थूSSS.. करतांना आढळला तर शासनस्तरावरुन त्याची गंभीर दखल घेण्यात येईल. या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
शासन निर्णयः- प्रस्तूत शासन निर्णयाद्वारे राज्यामध्ये थुंकण्यास मनाई करण्यात आलेली आहे. कुणीही, कुठल्याही कारणाने, कुठेही, कुणावरही, कसंही आणि केव्हाही थुंकण्यास प्रतिबंध असेल. तसे केल्यास सदरील व्यक्तीस मग तो राजकीय पक्षाचा प्रवक्ता असेल, खासदार असेल अगर एखादा यत्किंचित पत्रकार-संपादक असेल; त्याची गय केली जाणार नाही.
अ. प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष थुंकण्यावर मनाईः-
१. एखाद्या राजकीय पक्षाचा (गटाचा) प्रवक्ता, खासदार, पत्रकार-संपादक अथवा कुणीही- प्रत्यक्षपणे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवर, वस्तूवर, रस्त्यावर, घरात (स्वतःच्या आणि इतरांच्या), पाण्यात अगर हवेत थुंकण्यात मनाई करण्यात येत आहे.
२. एखाद्या राजकीय पक्षाचा (गटाचा) प्रवक्ता, खासदार, पत्रकार-संपादक अथवा कुणीही- अप्रत्यक्षपणे जसे की, एखाद्या इसमाचं नाव घेऊन, नाव न घेता, फक्त नाव ऐकून किंवा केवळ कॅमेऱ्यासमोर थुंकण्यास प्रतिबंधित करण्यात येत आहे.
i)राज्य शासनातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीच्या मुलाचं नाव घेऊन थुंकण्यास तातडीने मज्जाव करण्यात येत आहे.
ब. जीभ दाताखाली आल्यानंतरही थुंकण्यात मनाईः-
१. एखाद्या राजकीय पक्षाचा (गटाचा) प्रवक्ता, खासदार, पत्रकार-संपादक अथवा राज्यातील कुणीही व्यक्ती दाताखाली जीभ आली म्हणून थुंकता कामा नये. कुणाचंही नाव समोर येताच दाताखाली जीभ जावून थुंकी बाहेर येते, अशी लंगडी, निराधार सबब चालणार नाही.
२. एखाद्या राजकीय पक्षाचा (गटाचा) प्रवक्ता, खासदार, पत्रकार-संपादक अथवा राज्यातील कुणीही व्यक्ती जीभेला त्रास झाला अगर नाही झाला किंवा थुंकावं वाटलं तरी थुकलेलं चालणार नाही.
क. कठोर शिक्षेची तरतूदः-
१. सदरील शासन निर्णयाद्वारे राज्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे थुंकण्यास मनाई करण्यात आलेली असून वरील एकाही कारणाने कुणीही/कुठेही थुंकता कामा नये, शासनास राजकीय सभ्यता अपेक्षित आहे. मात्र असे गैरकृत्य केल्याचे प्रत्यक्षपणे आढळून आल्यास अगर अप्रत्यक्षपणे (उदा. कॅमेऱ्यासमोर) आढळून आल्यास सदरील थुंक्या व्यक्तीची तातडीने उच्चस्तरीय चौकशी लावण्यात येईल.
i) थुंकण्यामागचं कारण देण्यासाठी योग्य त्या डॉक्टरने (कंपाऊंडरने नव्हे) प्रमाणित केलेलं प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारण असेल.
ii) जागतिक दर्जाच्या डॉक्टरांना (संघटनेला) नुसते सल्ले देणारा डॉक्टर चालणार नाही.
२. थुंकणारा व्यक्ती शासनाच्या नजरेत दोषी आढळून आल्यानंतर त्यास पत्राचाळीतील नामांकित डॉक्टरांकडून इंजेक्शन देण्यात येईल. तथापि, कोकणस्थ वैद्य नारायणगुरु राणबोके यांच्यासह त्यांच्या कुटुंबाकरवी तयार झालेला अस्सल घरगुती काढा पाजून थुंकी रोगावर रामबाण इलाज केला जाईल.
३. थुंकणाऱ्या व्यक्तीस दावोसला पाठवून पाठीवर 'नमो विरोधक' असं लिहून सोडून देण्यात येईल. दावोसदेशीच्या तमाम भक्तमंडळींकडून होणाऱ्या शारीरिक, मानसिक जाचास राज्य शासन जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी.
करिता हा शासन निर्णय जारी करण्यात येत आहे. या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ किंबहुना पूर्वलक्षी प्रभावाने करण्यात येईल, याची (संबंधिताने) नोंद घ्यावी.
स्वाक्षरित
सर्वसामान्यांच्या सरकाराचे अधिपती
प्रतिः-
१. मातब्बर-श्री गडपती (तूर्त परदेशी)
२. सिल्व्हर पॉवर महल