गोफण | काका बारामतीकरांची कुजबुज अन् संभ्रम

Gofan sakal
Gofan sakal esakal

भोंग्यातून जोरजोरात आवाज येत होता.. वाढेSS..वाढेS..वाढपीSS.. कुठं तडफडले. पळा..पळा... पाहुण्याच्या पंगतीत बघा कमी-जास्त. मम्ताअक्काला काय पाह्यजेल बघा.. पाय उचला चलाS.. आदिनाथ डरकाळेSS.. कुठं डरकाळ्या फोडायला लागले?? पात्तळ भाजी..पात्तळ भाजीSS तिसऱ्या पंगतीत बटाटा भाजी फिरवा.

सगळ्या मंडपात धुमाकूळ सुरु होता. वाढपे तीनपट अन् खाणारे अठ्ठावीसपट झाले होते. तिघे यजमान हरेक पंक्तीत जातीने फिरत होते. उधारराजे डरकाळेंचा फुल तामजाम होता. बगलेत नाजूकशी शबनम घेऊन हात जोडत ''पोटभर जेवा, जेवा पोटभर.. जेवलंच पाहिजे'' अशा काहीतरी किरकोळ कोट्या करत पुढे-पुढे चालत होते.

बाजूच्या पंक्तीत नानाजी नागपूरकर जॅकेटमध्ये हाताची बोटं सरकावून हळूवारपणे चालत होते. या खास जेवणावळीसाठी देशाच्या कोनाकोपऱ्यातून जनसागर लोटला होता. नानाजी नागपूरकर चंट माणूस. त्यांनी फक्त आपले पाहुणे हेरुन काय हवं-नको ते बघायला सुरुवात केली. सोबत एक जामूनवाला हाताशी ठेवला होता. दिसला जवळचा की वाढ जामून, असा सपाटाच त्यांनी लावला.

भोंग्यावर जोरजोरात ओरडणाऱ्या बेरक्या माणसाने हे हेरलं होतं. ''नानाजी नागपूरकर..नानारावSS.ओय.. हिकडं-हिकडं.. चौथ्या पंक्तीत बघा काय कमी-जास्त.'' माईकवर दुसरं-तिसरं कुणी नव्हतं. उधारराजेंचे जिवश्च-कंठश्च मित्र बोलभांडे रौत होते. त्यांच्यासाठी आजचा दिवस म्हणजे २०१९ ला तीन पक्षांची गाठ मारल्याच्या श्रेयापेश्रा मोठा होता. हे सगळं आपल्यामुळेच जुळतंय, असा त्यांचा पुन्हा एकदा समज झालेला...

सर्वात शेवटच्या रांगेत काका बारामतीकर उभे होते. काय हवं-नको बघण्याच्या निमित्ताने ते एकाच ठिकाणी उभे राहून कुजबुज करीत होते. बराच वेळ काका बारामतीकर तिथल्या तिथेच पाहुण्यांशी गप्पा मारीत असल्याचं काहींच्या ध्यानात आलं. संभ्रम निर्माण झाल्याने नानाजी नागपूरकर उधारराजेंना सोबत घेऊन तिथे धडकले. नानाजींनी थेट जेवत्या पाहुण्यांनाच सवाल केला-

''कोण आपण?'' जेवणारे दोघे एकसुरात बोलले, ''पाहुणे!'' नानाजी नागपूरकरांचा संशय बळावला. ''कुणाचे पाहुणे? कुठून आले? कोणता पक्ष?'' तसे पाहुणे चपापले. त्यातला एकजण धीर एकवटून बोलला, ''आम्ही तुमचेच पाहुणे... आत्ता तुमच्या सोबत आलोय. याच बैठकीपासनं..''

नानाजी नागपूरकर काही बोलणार तेवढ्यात उधारराजे मध्येच बोलले, ''अरे वावा..वा! स्वागत आहे तुमचं? आपली ताकद आता वाढतेय.. काय पाहिजे तुम्हाला? भरपूर खा म्हणजे लढायला बळ येईल.. लाजू नका बरं.. पोटभर जेवा, जेवा पोटभर.. जेवलंच पाहिजे-''

''थांबा जरा!'' नानाजींनी उधारराजेंना मध्येच थांबवलं.. चिडून म्हणाले, ''पण तुमचा पक्ष कोणता?'' नानाजी नागपूरकरांच्या या थेट प्रश्नाने भंबेरी उडालेल्या एकाने कबुलीच द्यायचं ठरवलं होतं.. अडखळत बोलू लागला ''भाS'' त्याच्या तोंडातून 'भा' येताच एवढ्या वेळ गप्प असलेले काका चटकन् बोलले. ''भात हवाय का? तसं सांगा ना.. लाजू-बिजू नका.. भात आणा..भातSS..भात-भातSSS''

काका बारामतीकरांनी 'भात' हा शब्द एका हाताचं बोट उंचावून अशा पद्धतीने उच्चारला, ''एवढी सगळी फूट पडलेली असताना तुमच्या गटाचा आश्वासक चेहरा कोणता?'' असा प्रश्न विचारल्यानंतर ज्या स्टाईलमध्ये त्यांनी उत्तर दिलं होतं त्याच स्टाईमध्ये मोठ्याने खणखणीतपणे 'भात!' हा शब्द तोंडातून फेकला. तसे चार-पाच भातावाले पळतच पंक्तीत आले.

तिकडे बोलभांडे रौतांनीही भोंग्यावरुन आरोळी ठोकली, ''भात.. भातSS.. मसाला भात.. कुठं तडफडले रेSS तीन-तीन यजमान एका पंक्तीत उभायत... दिसत नाहीत का? भात-भाजी-पुरी-जामून-पापड-मीठ-पाणी सगळं तिकडं पाठवा..'' मग काय? सगळ्या वाढप्यांनी एकाच पंक्तीन येऊन गोंधळ घातला.

''आम्ही बघतो..आम्ही बघतो. तुम्ही जावा'' असं म्हणून तिन्ही यजमानांना जवळपास ढकललंच. काका बारामतीकरांनीही स्वतःला ढकलून घेतलं अन् इतरांना स्वतःला सावरायला लावलं. नानाजी नागपूरकर गोंधळून गेले. उधारराजेंनी भात वाढल्याची खात्री करुन घेतली अन् पुढच्या रांगेत गेले.

तिकडे बुंदीच्या ढिगाऱ्याजवळ उभे असलेले मुंबईचे राजपुत्र आदिनाथ डरकाळे आणि दिल्लीचे राजपुत्र कूलबाबा गप्पा मारत होते. ''चांग चुंग''चा उच्चार कसा स्पष्टपणे केला.. आजकाल शब्द उच्चारांची प्रॅक्टिस कशी सुरुय? यावर कूलबाबांनी स्वतःचं कौतुक केलं. स्वतःच स्वतःचा मुका घेण्याची सोय नव्हती. नाहीतर त्यांनी तेही केलं असतं. तिकडे पंक्तीत काहीतरी कमी पडलं होतं पण नंतर सगळं ठीक झालंय, असं समजून या दोघांनी त्या गोंधळाकडे साफ दुर्लक्ष केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com