आत्महत्या रोखूया, चला बांधू मानसमैत्रीचे पूल

Depression
Depression

कोणतीही आत्महत्या ही मनाला वेदना देणारीच असते. पण, सर्वांत जास्त अस्वस्थ करून जाते ते तरुण मुला-मुलींचे आत्महत्या करणे. ज्या वयात आयुष्य रसरसून अनुभवायचे. त्या वयात जर आत्महत्या करावी वाटत असेल तर ती खूपच गंभीर गोष्ट आहे. समाजमनावर होणारा परिणाम पाहता युवांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी तातडीचे प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. या आत्महत्यांमागची कारणमीमांसा नीट समजून घेतली आणि सुनियोजित प्रयत्न केले तर यामधील अनेक आत्महत्या आपण रोखू शकतो. त्यासाठी युवा आणि संतुलित जीवनामध्ये भावनिक प्रथमोपचाराचे पूल बांधणारे मानस मित्र-मैत्रिणी तयार झाले पाहिजेत.

आपल्या समाजात मानसिक आरोग्याचे प्रश्न हे कायमच दुर्लक्षित राहिलेले आहेत. जातीच्या उतरंडीची तुलना करायची झाली तर मधुमेह, उच्च रक्तदाब हे तथाकथित उच्चवर्णीय आजार आणि क्षयरोग, मानसिक आजार हे तथाकथित नीचवर्णीय आणि कायमच गावकुसाबाहेर राहिलेले आजार अशी करता येईल. याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये मनाच्या प्रश्नांबद्दल घोर अज्ञान, मानसिक आजार आणि अंधश्रद्धा यांची अभद्र युती, आजारांशी जोडली गेलेली कलंकाची भावना, नानाविध कारणांनी वाढणारे ताणतणाव आणि मानसिक अस्वास्थ्य व अत्यंत तोकड्या प्रमाणात असणारी मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील तज्ज्ञांची संख्या अशा अनेक गोष्टी येतात. यातील प्रत्येक गोष्ट हा स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. पण, थोडक्‍यात तरी आपण ते समजून घेतलेच पाहिजे.

मानवी मनाच्या विषयीचे आपल्या समाजातील अज्ञान पराकोटीचे आहे. माणसाचे शरीर कुठे असते, असा प्रश्न विचारणे किती हास्यास्पद वाटते ना? पण, माणसाचे मन कुठे असते, या प्रश्नाचे उत्तर अनेक डॉक्‍टर, शिक्षक, वकील, पत्रकारांनादेखील नसते. मग सामान्य माणसाची काय बात! मनाचे चित्र काढा, असे म्हटले तर आपल्याकडे अनेकदा हृदयाचे चित्र काढले जाते. मेंदू ही एक रचना आहे आणि मन हे त्या रचनेचे कार्य आहे. इतके मूलभूत वास्तव आपल्यातील अनेकांना माहीत नसते. त्यामुळे मन हे आजारी पडू शकते, त्याचे उपचार होऊ शकतात, हे तर फारच पुढचे झाले.

दुसरा भाग आहे मानसिक आरोग्य आणि अंधश्रद्धा यांच्या संबंधांचा. परभणी जिल्ह्यातील उदाहरण अंगावर शहारे आणणारे आहे. परभणीमध्ये एका मानसिकदृष्ट्या आजारी महिलेला भुताने झपाटले आहे, असे म्हणून मांत्रिकाने सगळ्या गावासमोर बेदम मारले आणि त्यामध्येच त्या महिलेला जीव गमवावा लागला. अगदी साध्या औषधोपचारांनी जो आजार बरा होऊ शकला असता त्यासाठी केवळ अज्ञान आणि अंधश्रद्धेमुळे त्या महिलेला जीव गमवावा लागला. या आजारांशी जोडली गेलेली कलंकाची भावनादेखील उपचारांमधील एक मोठा अडथळा ठरते. आपले शरीर आजारी पडले तर आपण पटकन उपचार घेतो. पण, मन आजारी पडले तर ते अंगावर काढतो. मनोविकारतज्ज्ञांच्याकडे जाणे म्हणजे ठार वेडे होणे, असा एक गैरसमज आपल्या समाजात खोलवर रुजलेला आहे. लोकांना आपण मानसिक उपचार घेत असल्याचे कळले तर लोक काय म्हणतील, या विचाराने देखील अनेक जण उपचार घ्यायचे टाळतात. मानसिक आजाराशी जोडल्या गेलेल्या या कलंकाच्या भावनेमुळे योग्यवेळी उपचार घेतला जात नाही व त्यामुळे आजार बळावतो.

Depression
प-पत्रकारांचा, म-मरणाचा...

एकूण मानसिक आजाराच्या व्याप्तीबद्दलदेखील आपल्याला पुरेशी माहिती नसते. खुद्द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने असे नोंदवले आहे की, जगभरात प्रत्येक पाच व्यक्तींच्या मागे एका व्यक्तीला त्याच्या/तिच्या आयुष्यात कधी ना कधी, कोणत्या तरी मानसिक आजाराला सामोरे जावे लागते. केवळ भारतात एक लाखापेक्षा अधिक लोक स्वत:च्या हाताने आयुष्य संपवून घेतात. हे सर्व झाले केवळ मानसिक आजारांच्या विषयी. मानसिक ताणतणाव म्हणजे आपल्या बोली भाषेत ‘टेन्शन’. हे न येणारी व्यक्ती सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सापडणे दुर्मिळ झाले आहे. आत्तापर्यंत नोंद केलेल्या सर्व गोष्टी कमी म्हणून की काय, भारतामध्ये सगळे मिळून चार हजारदेखील मनोविकार तज्ज्ञ नाहीत. जागतिक मानकांच्यानुसार एक लाख लोकसंख्येला एक मनोविकारतज्ज्ञ असणे आवश्‍यक आहे. म्हणजे भारतामध्ये जवळजवळ १२ हजार मनोविकारतज्ज्ञांची गरज आहे. समुपदेशक, मनोसामाजिक कार्यकर्ते आणि मानसिक क्षेत्रातील तज्ज्ञ नर्स यांची संख्या तर याहीपेक्षा वाईट आहे. पण, ही स्थिती केवळ भारतामध्ये आहे असे नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे मानसिक आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. शेखर सक्‍सेना असे म्हणतात की, मानसिक आरोग्याचा विचार करताना जगातील प्रत्येक देश हा विकसनशील देशच आहे.

Mental Health
Mental Health

तरुण मुला-मुलींच्या संदर्भात बोलायचे झाले तर या वयातील वाढत्या आत्महत्यांविषयी बोलायलाच हवे. कोणतीही आत्महत्या ही मनाला वेदना देणारीच असते. पण, सर्वांत जास्त अस्वस्थ करून जाते ते तरुण मुला-मुलींचे आत्महत्या करणे. ज्या वयात आयुष्य रसरसून अनुभवायचे, त्या वयात जर आत्महत्या करावे वाटत असेल तर ती खूपच गंभीर गोष्ट आहे. परीक्षेचा हंगाम सुरू झाला की जवळजवळ रोज वृत्तपत्रात तरुण मुला-मुलींच्या आत्महत्या झाल्याच्या बातम्या येऊ लागतात. हे आत्महत्यांचे सत्र आता सहावी, सातवीच्या शालेय मुलांपर्यंतदेखील पोचले आहे. काेराेनाच्या संसर्ग झाल्याने भीतीमुळे देशासह महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. लान्सेट या जगप्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधाचा दाखला द्यायचा तर, भारतात दरवर्षी होणाऱ्या एक लाख आत्महत्यांमधील ५० हजारांपेक्षा अधिक आत्महत्या या १५ ते ३५ वयोगटातील असतात. कुठल्याही तरुण मुलाची आत्महत्या ही त्या संपूर्ण कुटुंबाच्या उर्वरित आयुष्यावर एक खूप मोठा नकारात्मक परिणाम करते. अनेकदा या आत्महत्यांच्या मागची करणे ही दैनंदिन जीवनातील असतात. त्याचा परिणाम म्हणून, या वयोगटात मुले असलेल्या पालकांच्या मनावर, ‘आपले मूल तर असे काही करणार नाही ना?’ या विचाराचा मोठा ताण राहतो. युवांच्या आत्महत्यांचा समाजमनावर होणारा परिणाम पाहता ते थांबवण्यासाठी तातडीचे प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. नागरी समाज म्हणून आपण या आत्महत्यांच्या मागची कारणमीमांसा नीट समजून घेतली आणि सुनियोजित प्रयत्न केले तर यामधील अनेक आत्महत्या आपण रोखू शकतो.

एखाद्या व्यक्तीचे आत्महत्या करण्यामागचे कारण कोणतेही असले, तरी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्यापैकी ९० टक्‍केहून अधिक लोक हे तशी कृती करण्याआधीच्या आठवड्यात त्यांच्या जवळच्या व्यक्तीशी थेट अथवा अप्रत्यक्षपणे आपल्या मनातील भावना व्यक्त करीत असतात. कोणतीही आत्महत्या थांबवण्यासाठी बरोबर या प्रसंगी संबंधित व्यक्तीला मदत मिळणे अत्यंत आवश्‍यक असते. जवळचा नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, शेजारी अशी कोणतीही व्यक्ती या स्वरूपाची मदत करू शकते. ज्या पद्धतीने हृदयविकाराचा झटका आल्यावर पहिल्या तासात मदत मिळाली तर बरे होण्याची शक्‍यता अनेक पटीने वाढते, त्याचप्रमाणे आत्महत्येचे विचार जेव्हा ती व्यक्ती पहिल्यांदा व्यक्त करते, तेव्हा जर योग्य मदत मिळाली तर त्या मधून मोठ्या प्रमाणात आत्महत्या टाळता येऊ शकतात. जसे शारीरिक प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेता येते तसेच आत्महत्येचे विचार मनात येत असलेल्या व्यक्तीला भावनिक प्रथमोपचार कसे द्यावेत, याचे देखील प्रशिक्षण कोणीही घेऊ शकते.

mental challenge
mental challengee sakal

महाराष्ट्र ‘अंनिस’ने शेतकरी आत्महत्या रोखण्यसाठी असे काही शेतकरी मानसमित्र प्रशिक्षित केले आहेत. युवा वर्गाच्यासाठी आत्महत्येचे विचार मनात येणारे युवा आणि संतुलित जीवन यांच्यामध्ये भावनिक प्रथमोपचाराचे पूल बांधणारे मानस मित्र-मैत्रिणी तयार करणे अजिबात अवघड नाही. एक दिवसाच्या प्रशिक्षणात आपण ही कल्पना आत्मसात करू शकतो. या प्रशिक्षणामध्ये आत्महत्येचे विचार मनात येत असलेली व्यक्ती कशी ओळखावी? आत्महत्येच्या विचार विषयीचे समाजातील गैरसमज, एखाद्या व्यक्तीने आपल्या जवळ असे विचार व्यक्त केले तर त्याला/तिला भावनिक प्रथमोपचार कसे द्यावेत? अशा व्यक्तीला मनोविकारतज्ज्ञाकडे अथवा समुपदेशकाच्याकडे कधी न्यावे, अशा गोष्टी आपण शिकू शकतो. खास करून करिअर व प्रेमाच्या नातेसंबंधात आलेले अपयश पचवायला आजच्या तरुण पिढीला अवघड जाते आहे. प्रेम व आकर्षण या संकल्पनांमधील गोंधळ, एकदा प्रेमात अपयश आले म्हणजे आयुष्य संपले अशी मनोधारणा आजच्या तरुणाईत मोठ्या प्रमाणात दिसून येते. बदलत्या कुटुंब व्यवस्थेचा देखील एक महत्त्वाचा संदर्भ या आत्महत्यांना आहे. आयुष्यात टोकाच्या ताणाच्या प्रसंगी जवळचे नातेसंबंध आपल्याला भावनिक आधार देण्याचे काम करीत असतात. बदलत्या कुटुंब व्यवस्थेमध्ये अशा आधाराच्या जागा झपाट्याने कमी होताना दिसतात. त्याचा सगळ्यात मोठा फटका मुलांना व तरुणांना बसताना आपल्याला दिसत आहे. आयुष्याच्या प्रचंड वाढलेल्या वेगामुळे शांतचित्ताने समोरच्या प्रसंगाचा विचार करण्याचे कौशल्यदेखील कमी होत आहे की काय, अशी शंका येते. आपल्या बहुतांश लोकांच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग कधी ना कधी तरी येतो की दैनंदिन जीवनाचे त्रास सहन करण्यापेक्षा नसलेले बरे, असा विचारदेखील मनामध्ये चमकून जातो. अशा परिस्थितीत त्या विचारावर उतावळेपणाने कृती करण्याऐवजी आपण आयुष्यातील सकारात्मकतांचा विचार करून स्वत:ला सावरतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाची परीक्षा पाहणाऱ्या या क्षणांना सामोरे जाण्याचे कौशल्य आपल्या तरुण पिढीमध्ये कमी पडल्यामुळे तर अशा घटना घडत नाहीत ना? अशी शंका मनामध्ये येत राहाते.

आपल्याला जर मानस मित्र/मैत्रीण व्हायचे असेल तर आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की आत्महत्येचे विचार व्यक्त करणे हे दुबळेपणाचे लक्षण नाही किवा ती व्यक्ती नाटकदेखील करीत नाही. त्या व्यक्तीचे मन आजारी आहे आणि हे विचार व्यक्त करणे म्हणजे त्या व्यक्तीने मदतीसाठी मारलेली हाक आहे. काही वेळा डिप्रेशनसारख्या आजाराचेदेखील हे लक्षण असू शकते. योग्य समुपदेशन आणि काही वेळा औषधे यामधून हे विचार दुरुस्त होऊ शकतात. युवा वर्गात करिअर आणि प्रेम संबंधात आलेले अपयश ही आत्महत्येमागची महत्त्वाची करणे असतात. मानसमित्र म्हणून आपण जर त्यांचे दु:ख समजून घेऊ शकलो आणि आयुष्यात अपयश हे येत असते, त्यामधून आपले खूप शिक्षण होते, हा साधा सोपा विचार त्यांच्यापर्यंत पोचवू शकलो तरी अनेक लोकांना आपण योग्य मदत पोचवू शकतो.

खरे तर अनेक तरुण मुले-मुलीच पालक आणि वडिलधाऱ्या माणसांपेक्षा हे काम अधिक चांगले करू शकतात. आपल्या समवयस्कांशी मनमोकळे व्यक्‍त करणे अधिक सोपेदेखील असते. आत्महत्येच्या विरोधी जनजागृती करणे यासाठी हे युवा मानस मित्र/मैत्रिणी हे सोशल मीडियावर मोहीम चालवू शकतात. मोठ्या प्रमाणत तरुण सोशल मीडियावर सक्रिय असल्याने त्याचा फायदा या विषयीचे गैरसमज दूर होण्यासाठी आणि युवा वर्गाला योग्य वेळी मदत मिळण्यासाठी होऊ शकतो. शेतकरी आत्महत्येबाबतीत शासनाने केलेला खेळखंडोबा पाहता युवा आत्महत्या रोखण्यासाठी शासन फार काही करेल, अशी अपेक्षा करणे चुकीचे होईल. नागरी समाज, सुजाण पालक आणि विवेकी युवा ह्यांनी एकत्र येवून मानसमैत्रीचे पूल मनामनातून बांधायचे ठरवले तरच ही ऐन ‘वसंतातील पानगळ’ थांबू शकेल, असे वाटते.

social media
social media

या परिस्थितीत, ‘सर्वांच्यासाठी भावनिक प्रथमोपचार’, ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशने सुरू केलेली मोहीम खूप महत्त्वाची ठरू शकते. त्याची करणे आपण समजून घेवूया. पहिले कारण म्हणजे भावनिक प्रथमोपचार हे टेन्शनच्या पहिल्या टप्प्यावर दिले जातात. त्यामुळे अनेक वेळा ते छोट्या-मोठ्या टेन्शनचे मानसिक आजारांच्यामध्ये रूपांतर होणे टाळू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावनिक प्रथमोपचार देण्यासाठी काही खूप मोठ्या प्रशिक्षित व्यक्तीची गरज नाही. महाराष्ट्र ‘अंनिस’तर्फे राबवण्यात येणाऱ्या मानसमैत्री या मोहिमेत ज्याची इच्छा असेल अशा कोणत्याही नागरिकाला भावनिक प्रथमोपचाराचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्यामधून अनेक व्यक्ती आणि कुटुंब यांच्यापर्यंत मानसिक आरोग्याच्या सुविधा पोचवता येतात, असा अनुभव आहे. केवळ तेवढेच नाही तर शास्त्रीय भावनिक प्रथमोपचार मिळाले तर अनेक रुग्ण आणि कुटुंबीय हे अंधश्रद्धांच्या कचाट्यातून सुटू शकतात आणि योग्य मानसोपचार तज्ज्ञाकडे गेल्याने त्यांचे अनेक त्रास वाचतात, असे देखील अनुभवला येते. पण, भावनिक प्रथमोपचार देताना एक पथ्य पाळणे मात्र आवश्‍यक आहे. ते पथ्य आहे आपल्या मर्यादांचे. प्राथमिक पातळीवरील भावनिक ताण कोणते आणि मानसिक आजारात रूपांतर झालेली लक्षणे कोणाची याचे प्रशिक्षण घेतल्याशिवाय हे करणे धोकादायक ठरू शकते. चांगली बाब अशी की ही पथ्ये शिकणे हे अजिबात अवघड नाही.

Depression
हळू चालणारेच दूरपर्यंत जातात

शेवटी प्रश्न उरतो भावनिक प्रथमोपचार कार्याचे म्हणजे नक्की काय करायचे? याचे उत्तरदेखील फार जटिल नाही. आपल्या दैनंदिन आयुष्यात तणावाच्या प्रसंगाला सामोरे जाताना आपण जाणते-अजाणते यामधील काही गोष्टी करतच असतो. भावनिक प्रथमोपचारामध्ये ते अधिक जाणतेपणाने आणि शास्त्रीय पद्धती वापरून करणे अपेक्षित असते. त्यामधील पहिली गोष्ट आहे मानवी मन आणि त्याचे आजार या विषयी शास्त्रीय माहिती करून घेणे. ही योग्य माहितीदेखील अनेक वेळा जीव वाचवणारी ठरू शकते. उल्हासनगर येथे भुताने झपाटले आहे म्हणून मांत्रिकाने केलेल्या मारहाणीत एका मानसिक आजारी व्यक्तीचा मृत्यू झाला. या ठिकाणी ‘भुताने झपाटणे असे काही नसते हा एक मानसिक आजार आहे आणि त्याला उपचार असू शकतो,’ हे सांगण्याचा भावनिक प्रथमोपचारदेखील त्या व्यक्तीचे आयुष्य वाचवू शकला असता हे समजून घेतले पाहिजे. ही माहिती देताना भावनिक प्रथमोपचार देणाऱ्या व्यक्तीची भूमिका फार महत्त्वाची असते. ही भूमिका ही समोरच्याला शहाणपणा शिकवणे, अशी असण्यापेक्षा मित्रत्वाच्या नात्याने माहिती देणे अशी असेल तर त्याचा जास्त प्रभाव पडतो.

दुसरी गोष्ट आहे, चांगले ऐकण्याचे कौशल्य. एका बाजूला संवाद करण्याच्या मध्यामांचा स्फोट होत असताना दुसरीकडे मात्र समोरच्या व्यक्तीचे म्हणणे आस्थापूर्वक ऐकून घेण्याचे आपल्याकडे खूपच दुर्मिळ होत चालेले आहे. टेन्शन आलेल्या व्यक्तीला एकदम सल्ला देण्यापेक्षा त्या व्यक्तीचे म्हणणे जरी आस्थापूर्वक ऐकून घेतले तरी त्यामधून समोरच्या व्यक्तीची अस्वस्थता कमी होते आणि ती व्यक्ती स्वत:चा स्वत: विचार करायला लागू शकते.

भावनिक प्रथमोपचारांमधील तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे मानसिक आधार देण्याचे कौशल्य. मानसिक टेन्शन आलेल्या व्यक्तीला अनेकदा खूप एकटे आणि आधारहीन वाटत असते. अशा वेळी कोणी तरी आपल्याला समजून घेवू शकते आणि आपल्याबरोबर आधार द्यायला आहे या भावनेने देखील आपण टेन्शनला पळवून लावू शकतो.

चौथे महत्त्वाचे कौशल्य आहे. समोरच्या व्यक्तीला योग्य माहिती देवून गरज असल्यास तज्ज्ञाची मदत घेण्यास उद्युक्त करणे. या सगळ्याच्या जोडीने आपण जर मानसिक आरोग्याची जनजागृती करण्यात पुढाकार घेवू लागलो तर आणखीनच चांगले. अशा प्रकारची जनजागृती काही फार मोठा कार्यक्रम करूनच व्हायला पाहिजे असे नाही तर आपल्या कुटुंबात, कामाच्या ठिकाणी किंवा समाजात आपण मानसिक आरोग्य आणि त्याचे उपचार याविषयी खुल्या मानाने बोलू लागलो तरी मोठा फरक पडू शकेल असे वाटते.

हे सगळे मिळून आपली भावनिक प्रथमोपचार पेटी तयार होते आणि गंमत म्हणजे ती ठेवायला जागादेखील लागत नाही. केवळ आपला दृष्टिकोन निकोप आणि सजग असला पाहिजे. जसे आपण शरीराचे प्रथमोपचार करायला शिकतो तसेच जर मनाचेही प्रथमोपचार करायला शिकलो तर आपला स्वत:चा आणि आपल्या कुटुंबाचा फायदा तर होईलच, पण समाजाचे मानसिक आरोग्य सुदृढ व्हयलादेखील मोठा हातभार लागेल, याची खात्री वाटते.

अगदी आर्थिक गणित मांडायचे झाले तरी वर्ल्ड बॅंकेने त्यांच्या प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात असे सांगतो की, मानसिक आरोग्याच्या प्रश्नात जर समाजाने एक डॉलर गुंतवला, तर त्यावर चार डॉलरचा परतावा मिळू शकतो. कारण सोपे आहे. व्यक्तीचे मन स्थिर राहिले तर स्वाभाविकपणे त्याची उत्पादन क्षमता वाढणार. दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर आता कुठे तांबडे फुटू लागले आहे. व्यक्ती, कुटुंब आणि समाज म्हणून आपण गांभीर्यपूर्वक याविषयी कृतिशील झाले पाहिजे, कारण मानसिक आरोग्याचा प्रश्न हा केवळ मानसिक आजारी व्यक्तींच्या पुरता मर्यादित नसून ज्यांना आपले मन सुदृढ ठेवायचे आहे, त्या सर्वांचा आहे.

(लेखक : डॉ. हमीद दाभोलकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, परिवर्तन संस्था, सातारा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com