बकरी ईद का साजरी करतात माहित आहे का ? जाणून घ्या....

histroy of bakri eid
histroy of bakri eid

इस्लाम धर्मात मुळ दोनच सण असतात, रमजान व बकरी ईद. अरबी कॅलेंडरनुसार जिलहज्ज व मदिना पवित्र मानला जातो. त्यागाची आठवण म्हणून ईद साजरी केली जाते. जिलहज्ज हा महिना वर्षाचा शेवटचा असतो. अखिल मानवजातीचा ईश्‍वर एकच आहे. सृष्टीचा पालनहार व तारणहार ईश्‍वरच आहे. ईश्‍वराचे हे ब्रीदवाक्‍य आचरणात आणण्यासाठी प्रेषित इब्राहिम (अ.) यांना पृथ्वीवर पाठविले होते. जेणेकरून मानवात सुख, शांती, मानवता, सत्य, सदाचार, सत्कर्म, दया, परोपकार या जीवनमूल्यांची जपणूक व्हावी. प्रेषित इब्राहिम (अ.) यांच्या अंगी लहानपणापासूनच चिकित्सावृत्ती होती. त्यांचा जन्म इराकच्या कदीम शहर ‘उर’ या ठिकाणी झाला. 

एका ईश्‍वराची भक्ती करा. यात दुसऱ्याला समाविष्ट करू नका. ईश्‍वरच मानवाला नफा, तोटा देतो. मानवाला तोच जन्म व मृत्यू देतो. 
तोच पालनहार व तारणहार आहे, असे विचार व आचरण प्रेषित इब्राहिम (अ.) यांचे होते. प्रेषितावर ईश्‍वराची कृपादृष्टी होती. म्हणून त्यांना ‘खलीलुल्लाह’ अशी पदवीदेखील ईश्‍वराने दिली होती. 

ईश्‍वर भक्ताकडून जीवनातील प्रत्येक क्षेत्रात त्यागाची अपेक्षा ठेवतो. यात गोरगरिबांच्या सेवेत स्वतःचे आयुष्य खर्ची करणे, त्याग करणे, आजारी गरजूंना औषध देणे, निराधार मुला-मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे, आपले घर, समाज, देशाच्या प्रगतीसाठी आयुष्य व्यतीत करणे ही उत्तम कुर्बानी आहे. प्रेषित इब्राहिम (अ.) यांनी स्वतःचे आयुष्य ईश्‍वराच्या आज्ञेनुसार व्यतीत केले. प्रेषितांच्या निष्ठेस व त्यागास सलाम करण्याचा दिवस म्हणजेच बकरी ईद होय. या ईदद्वारे सामाजिक एकता आणि समाजकल्याणाची प्रेरणा मिळते व त्यात मानवजातीचे ऐक्‍य अबाधित राखण्याचे महान कार्य पार पाडले जाते. कुर्बानीचा अर्थ आपला वेळ, संपत्ती इतकेच नव्हे, तर स्वतःचाही त्याग असा आहे. प्रेषित इब्राहिम (अ.) यांनी ईश्‍वराच्या प्रेमाखातर स्वतःच्या मुलाचाही त्याग करण्याचा संकल्प केला.  समाजकल्याण हाच ईदचा मुख्य उद्देश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे श्रद्धावंतांनी बकरी ईद घरीच साध्या पद्धतीने साजरी करावी. यावर्षी हज यात्रा रद्द झाल्यामुळे हजचा खर्च गोरगरिबांना, गरजूंना दान, गरजू-नातेवाईकांवर करावा. मानवसेवा हीच ईश्‍वरसेवा आहे, हे ब्रीदवाक्‍य लक्षात ठेवून हजचा खर्च मानवावर, हजला इच्छुक होते त्यांनी करावा.

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com